शून्य प्लास्टिकचा प्रारंभ माझ्यापासून' अभियानात विद्यार्थ्यांकडून तुकड्यांच्या स्वरूपातील प्लास्टिकचे संकलन
नवी मुंबई : प्लास्टिकमुळे पर्यावरणाची आणि मानवी जीवनाची होणारी हानी लक्षात घेत सिंगल यूज प्लास्टिक प्रतिबंधविषयक धडक मोहीमा राबविण्याप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार व्यापक जनजागृतीही केली जात आहे. या विषयाचे गांभीर्य संस्कारक्षम विद्यार्थीदशेतच मुलांच्या लक्षात आणून द्यावे तसेच त्यांच्या सक्रीय सहभागातून प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेला गती मिळावी यादृष्टीने 'शून्य प्लास्टिकचा प्रारंभ माझ्यापासून (Zero Plastic Starts With Me)' हे विशेष अभियान विद्यार्थ्यांच्या माध्यमातून 18 ऑक्टोबर ते 6 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आले.
या विशेष अभियानात कोव्हीड काळात शाळा बंद असूनही 51 शाळांनी सहभागी होत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी चॉकलेटचे रॅपर्स, वेगवेगळ्या वेफर्सचे पॅकेट्स, वन टाईम यूज प्लास्टिक बॅग्ज अशा प्रकारचा अविघटनशील प्लास्टिक कचरा (Non Degradable Plastic Weast) हा एक लिटर पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बॉटलमध्ये एकत्र करून त्या बॉटल्स आपल्या शाळेमध्ये जमा केल्या व त्या नवी मुंबई महानगरपालिकेने संकलित केल्या.
या अभियानामध्ये 4134 विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभागी होत 11 हजार 484 प्लास्टिक बॉटल्समध्ये छोट्या तुकड्यांच्या स्वरूपातील प्लास्टिक जमा करून तब्बल 1281 किलो प्लास्टिक जमा केले. इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जमा करणा-या विद्यार्थ्यांचा व शाळांचा महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथील विशेष समारंभात प्रशस्तिपत्रे व मानचिन्हे देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या तुकड्यांच्या स्वरूपातील प्लास्टिक हे प्लास्टिकच्याच बाटल्यांमध्ये जमा करण्यासाठी जी अफाट मेहनत मनापासून घेतली त्याचे कौतुक करीत या माध्यमातून त्यांच्या पालकांपर्यंतही प्लास्टिक प्रतिबंधाचा संदेश गेला त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या कामाची प्रशंसा केली. दीड महिन्यांहून अधिक काळ प्लास्टिक संकलनाची विद्यार्थ्यांना लागलेली गोडी आता त्यांची सवय बनेल व यापुढे त्यांच्या मित्रांमध्येही याचा प्रसार होईल असा विश्वास व्यक्त करीत हा उपक्रम विद्यर्थ्यांच्या माध्यमातून राबविण्यासाठी कोव्हीड काळात शाळा प्रत्यक्ष भरणे बंद असले तरी शाळा व्यवस्थापनांनी पुढाकार घेऊन केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.