केगाव येथे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उदघाटन
उरण : जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत व लोकप्रतिनिधी यांनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजने अंतर्गत माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या अथक प्रयत्नाने महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, केगाव ग्रामस्थांच्या उपस्थितीत केगाव ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
केगाव वनवटी आशा दरणे यांच्या घरापासून ते देविदास पाटील यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे, केगाव वनवटी अमोल गावंड यांच्या घरापासून ते स्वप्नील म्हात्रे यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण, केगाव आवेडा येथील रस्ता काँक्रिटीकरण, केगाव आवेडा खालची आळी रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले त्याचे लोकार्पण सोहळा, केगाव प्राथमिक शाळा दुरुस्ती करणे, अंगणवाडी शाळेचे भूमीपूजन आदी विविध विकास कामांचे भूमीपूजन माजी आमदार मनोहरशेठ भोईर व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले. केगाव ग्रामपंचायत हद्दीत अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी मी नेहमी कटीबद्ध राहीन असे सांगत केगाव गावचा पाणी प्रश्न व डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्फत सोडविण्याचा माझा प्रयत्न आहे. लवकरच केगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व समस्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुटतील असा आत्मविश्वास मनोहरशेठ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.महाविकास आघाडीच्या माध्यमातून केगाव ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामे सुरु आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कोणतेही मतभेद न बाळगता गावच्या विकासासाठी एकत्र या. समस्या सोडविण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र या. समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करा असेही यावेळी मनोहरशेठ भोईर यांनी सांगितले. यावेळी उपस्थित माजी आमदार मनोहरशेठ भोईर, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांचे माजी पंचायत समिती सदस्य महेश म्हात्रे यांनी आभार मानले.