ऐरोली ते काटई मार्गातील १ भुयारी मार्ग डिसेंबर अखेरर्पयंत होणार सुरु
नवी मुंबई ः खासदार राजन विचारे यांनी २८ जानेवारी रोजीन ऐरोली-काटई या मार्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी ‘एमएमआरडीए’चे मुख्य अभियंता प्रकाश भांगरे, कार्यकारी अभियंता गुरुदत्त राठोड, नवी मुंबई महापालिका मुख्य अभियंता संजय देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख एम. के. मढवी, मनोज हळदणकर, शहरप्रमुख विजय माने, माजी नगरसेवक नवीन गवते, राजेश गवते, जगदीश गवते, ममित चौगुले, चेतन नाईक तसेच विद्युत वितरण महामंडळ आणि वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, आदि उपस्थित होते.
ऐरोली ते काटई असा १२.३ किलोमीटरचा प्रकल्प असून या प्रकल्पाचे कामचे भूमीपुजन २१ मे २०१८ रोजी झाले होते. पहिल्या टप्प्यामध्ये ठाणे-बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ असा ३.४३ किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्यामध्ये दोन भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये पहिल्या भुयारी मार्गात ३१ आणि दुसऱ्या मार्गात ३१ अशा मार्गिका करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पासाठी ३८२ कोटी खर्च करण्यात येणार असून त्याचे काम ६० टक्के काम पूर्ण झालेले आहे.
तर दुसरा टप्पा ऐरोली पुलापासून ठाणे-बेलापूर मार्ग भारत बिजली र्पयंत असणार आहे. त्याचा खर्च एकूण २७५ कोटी अपेक्षित धरण्यात आला आहे. या मार्गाचे ४० टक्के काम पूर्ण झालेले आहे. त्यामध्ये ऐरोली येथे रेल्वेमार्गावर ६५ मीटर लांबीचे २ रेल्वे गर्डर टाकण्याची परवानगी रेल्वेकडून मिळाल्यास डिसेंबर अखेरर्पयंत दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण होईल. या रेल्वे गर्डर परवानगीसाठी मध्य रेल्वे प्रबंधक शलभ गोयल यांची लवकरच भेट घऊन सदरचा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे खासदार राजन विचारे यांनी सांगितले.
तिसरा टप्पा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते कटाई नाका असणार आहे. त्यामध्ये ठाणे महापालिकेमार्फत जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरु आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन कुमार शर्मा यांच्याशी चर्चा करुन काम जलद गतीने मार्गी लावण्यास सांगितल्याचे खा. राजन विचारे म्हणाले.
दरम्यान, नवी मुंबई महापालिकेने सूचित केल्यानुसार ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहनांना या नव्याने होणाऱ्या ऐरोली-काटई मार्गाला जोडण्यासाठी भारत बिजली समोरील चौकातून नवीन मार्गिका तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये ६५० मीटरची २२ अशी मार्गिका ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून तयार करुन घणार आहेत.