वळवाचा पाऊस
आमच्या लहानपणी या पावसाला वळवाचा पाऊस म्हणत पण आजकाल या ऊन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाला सर्वच अवकाळी पाऊसच संबोधतात. असो. माझे अन् या पावसाचे नाते तसे इमोशनल आहे ! आज हा वळवाचा पाऊस पडला...आनंदीत झालो आणि जुन्या आठवणी सांगाव्याशा वाटल्या.
दोन चार दिवसांपासून पुण्यात पावसाळी वातावरण आहेच. काहींना ते गुदमरल्यासारखे जाणवायचे, तर माझ्या सारख्याला असे वातावरण जरा जास्तच ऊल्हासित वाटायचे. आज दुपारच्या सुमारास काळा कुट्ट अंधार पसरला आणि सुरवातीला टपटप करीत पावसाचे थेंब टपकायला लागले. सुरूवातीला एका लयीत पडतांना गंमत वाटायची नंतर अकस्मात पावसाने जोर धरला आणि जोरदार पावसाचे तुफान सुरू झाले.
ढगांच्या गडगडाटाने तर धडकीच भरायला लागली, विजेचा लपंडावही साथीला सुरू झाला व मी बाहेर येऊन बगिच्यातील झाडांवर पडणाऱ्या छोट्या मोठ्या पावसाच्या थेंबांच्या पानांवर पडणाऱ्या हालचाली टिपू लागलो. पानांवर पडणारे थेंब वेगवेगळ्या पानांना हालवूनन, मान तुकवायला लावून, वरच्या पानांवरील पाण्याचा थेंब खाली सरकवून, त्या मोत्यांशी, पावसाच्या आवाजाच्या लयीत एकरूप व्हायला लागली होती व एक मोत्यांचा खेळच जणु खेळत होती व मी त्यातच गुंग होतो.
खरंतर अवकाळी पाऊस अचानक येतो, हवामान बिघडवतो आणि शेतीचं अतोनात नुकसानही करत असतो. पण त्याचबरोबर, तो अनोखी आठवणही बनत असतो. अवकाळी पावसाच्या आठवणींमध्ये, पावसाच्या थेंबांची सर, ओल्या मातीची सुगंध आणि अचानक येणाऱ्या बदलांची भावना साठलेली असते.
मला तर तो पावसाचा आवाज आणि मातीचा सुगंध खूप आकर्षीत करत असतो. एक सांगू, बाहेर खिडकीतून पहातांना खिडकीच्या काचेवर पडलेल्या पावसाच्या थेंबांचे प्रतिबिंब फारच आकर्षक वाटत असते.
आता पाऊस कमी झालाय, सोसायटीतील लहान मुले अर्ध्या चड्डीत व बनियनवर बाहेर नाचत, बागडत आली व रिमझीम पावसात नाचू लागली, जागोजागी साचलेल्या पाण्याच्या डबक्यात फेर धरून ऊड्या मारू लागली व पायाने ऊडणाऱ्या पाण्याचा आनंद घेऊ लागली. पण एक गोष्ट मला जाणवली ती अशी की कोणीही मुलं आमच्या सारख्या कागदाच्या होड्या करून वाहत्या पाण्यात सोडून ‘रेस खेळत नव्हती ! अचानकपणे लहानपणीच्या या खेळाची आठवण झाली अन् त्या वेळेच्या आठवणींचीपण.
आमची शाळा ३री ४ थीत पत्र्याची होती. असा अचानक शाळा सुरू असतांना पाऊस आला की आम्ही वर्गातील मुलं एकमेकांकडे पाहून व मनातल्या मनात हासून आनंदीत होत असायचो ! कारण जागोजागी पत्र्यावरून येणारे पाण्याचे ओघळ आमचा आनंद द्विगुणीत करत असत आणि मग शाळा सुटल्याची घंटा वाजली की आनंदाने ऊड्या मारत, पावसात, भिजत, साचलेले पाणी तुडवत घरच्या रस्त्याला लागत असू.
अजून एक...मला नोकरीला लागून चार पाच दिवस झाले होते. फॅक्टरीने NES कडून Water Supply Scheme ताब्यात घेतली होती. चोवीस तास Plant चालवणं भाग होतं. पण रात्रपाळी करायला कोणीच तयार नव्हतं .मी तेंव्हा संटाफकीरच होतो. मी तयार झालो ,रात्री अकराला घरून निघालो आणि अचानक वळवाचा पाऊस सुरू झाला . ओला चिंब तर झालोच पण Plant वर गेल्यावर वीजही पळाली, मी नवखा, आजुबाजूस काळाकुट्ट अंधार, दिवसा येणारे वेगवेगळे आवाज बंद, अगदी भयाण शांतता.
मनातून मीही घाबरलेलो, कारण रात्रीच्या त्या टेकड्या वरील Plant वर निरनिराळ्या पक्षांचे दिवसा कधीही न ऐकलेले आवाजाने माझीही पांचावर धारण पोहोचली होती . हिंमत केली, जीव एकवटला ( साहेब होतो ना तिथला !) Security ला फोन लावले. पाहिजे ती मदत मिळायला लागली. Torch व इतर सामग्री मिळाली. योग्य त्या सुचना देवून मी विश्रातींचा दीर्घ श्वास घेतला. खरंतर आयुष्यातील एक भयावह रात्र होती व आठवणीत राहील असा प्रसंगही होता. अजून एक सांगावेसे वाटते...आमच्या लहानपणी या पावसाला वळवाचा पाऊस म्हणत पण आजकाल या ऊन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाला सर्वच अवकाळी पाऊसच संबोधतात. असो. माझे अन् या पावसाचे नाते तसे इमोशनल आहे !
आज हा वळवाचा पाऊस पडला...आनंदीत झालो आणि जुन्या आठवणी सांगाव्याशा वाटल्या.
अजून पावसाला १५-२० दिवस बाकी आहेत, हा आनंद ऋतु सगळ्यांनाच आनंद देतो, बळीराजा तर याची आतुरतेने वाट पहातच असतो. येणारा पहिला पाऊस त्याचा तो धुंद करणारा मृद्गंध आणि बेडकांचे आनंद गीत सगळंच डोळ्यासमोर यायला लागलंय; पण सध्या येथेच थांबु या ! - अनिल देशपांडे