जन्माअगोदरची लिंगसाक्षरता..!

चार-पाच वर्षांपासून सुरू असलेली केस न्यायाधीशांच्या संपूर्ण लक्षात दोन-तीन आली होती. त्या दिवशी ती अंतिम सुनावणी होती तेव्हा हे सगळं  XY गुणसूत्रांचं गणित धनाजीच्या अगदी अंगलट आली. शेवटी कोर्ट सरळसरळ निर्णय शेवंताच्या बाजूने दिला अन्‌ सोबत चांगलं वागवायची तंबीपण भरली. म्हणूनच धनाजी त्यादिवशी कोर्ट संपल्यावर मुकाट आपल्या बायकोला  सोबती घरी घेऊन आला. म्हणूनच धनाजीला आज जास्त काही सुचत नव्हतं

"कुठं चालला धनाजी? मला तरी सांग ना.” वयस्कर म्हादु अगदी कळकळीने पोराला विचारत होता. दोन दिवसांपासून घरात सारखीच कटकट सुरू होती. शेवंता नुकतीच नवीन संसार सुरू झाल्यागत खाली मान घालून अंगणात झाडलोट करत होती अन्‌ धनाजी तिला सारखासारखा घालूनपाडून बोलत होता. तीही खाली मान घालून ऐकत काम करत होती. बापाने आवाज देऊनही धनाजी एक शब्द देखील प्रत्युत्तरादाखल बोलला नाही म्हणून म्हादुबी भिरभिरत्या बाहुल्यांनी पाहिलं न पाहिलं असं म्हणून ओट्यावर बसून काय होतंय ते बघत होता. तिची सासू रखमाबाईसुद्धा पस्तावल्यागत हातात सूप घेऊन तिथं बाजूलाच दळणाची निसवपासव करत होती. बहुतेक तिलाही मागं झालेल्याचा पश्चाताप होत असावा; वर्ष चार-पाच वर्षाखाली असंच एकदा रणकंदन झालं होतं.

 धनाजीचं शेवंताशी लग्न होऊन आठ नऊ वर्षे उलटले असतील. त्यांना एकामागून एक सारख्या चार पोरीच होत गेल्या. म्हणून तो आता वैतागून तिच्याशी रोज रोज काही ना काही कुरापती काढून भांडत होता. तेव्हाही त्यांचं असंच काहीतरी झालं होतं. लहानलव पोरी आईला चिटकून रडत होत्या. एकीचं तर अंगावरच पिणं चाललेलं; बाकी तिघी तिच्यापेक्षा एक सव्वा वर्षाने अंतराने मोठ्या! पहिल्यापासून धनाजीला पोराची अपेक्षा; पण शेवंताला अजूनही मुलगा झाला नव्हता. म्हणून घरात सारखा भांडणतंटा व्हायचा. बा म्हादु अन्‌ आई रखमा यांचीही मोठी पंचायत झाली. रखमाबाईपण त्याच्याच बाजूने बोलायची, "कधी व्हैन ह्या बाईला प्वार एकदाचं काय माहित? नही तं धनाजीचं एखादं दुसऱ्या ठिकाणी पुन्हा.?” असा मनातल्या मनात विचार करायची. त्यांची कुरबुर बऱ्याचदा व्हायची; पण चुकी कोणाची हेच कळत नव्हतं. खेड्यातलं वातावरण म्हणजे थोडं आडमुठेपणाचं म्हणून मायलेकाचा आतल्या आत शेवंताला सोडचिट्ठी द्यायचा कट शिजला! म्हादुला तेव्हा झालेलं हे कारस्थान माहितपण नव्हतं. तसं पाहिलं तर तो पहिल्यापासूनच सुनेच्या बाजूने होता. कारण आजपर्यंत तिचं काही चुकलं असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. उगाच लोकाच्या लेकराला कशाला दोष देत बसायचं? म्हणून तो कायम तिला उभारी द्यायचा. बऱ्याचदा भांडण कसं मिटेल हे त्याच्या डोक्यात पहिल्यांदा यायचं परंतु इकडून मायलेकांचा जोर जास्त असायचा म्हणून त्याला पण पडती बाजू घ्यावी लागायची. शेवटी तेव्हा संध्याकाळी अंधार पडायच्या वक्ताला शेवंताशी धनाजीची  चांगलीच खडाजंगी झाली म्हणून तो चांगलाच तापला होता. दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यानं तिला दोनदा बजावलं होतं, "आवर तुझं लवकर, जा निघून तुह्या बापाच्या घरी! इथं अजिबात थांबायचं काम नाही.” ती त्याला लहान लहान पोरींकडे बघत तिन्तीन्दा हात जोडून म्हणायची, "कुठं जाऊ घेऊन या लहान लेकरांना? लागलं तर इथेच शेजारी वसरीत चुल मांडून ऱ्हाते. पण मला इथून हाकलू नका!” म्हादुच्या बी पोटात लई तुटायचं; पण करणार काय? शेवटी तेव्हा धनाजीनं तिला चांगलीच हाणमार करून रस्त्याला लावलं. रखमाबाईच्या अगदी मनासारखं झालं. म्हादु बिचारा आहे त्याच जागेवर काठी आपटत तंतन करीत बसला..अन्‌ शेवटी त्यानं तिला तिच्या माहेरी धाडलं. पुढं तो दुसरीच्या शोधाला लागला.! अन्‌ कोर्टात हिला मुलगा होत नाही हे कारण टाकून घटस्फोटाचा दावा दाखल केला!

सलग चार मुली झाल्यावर धनाजीने शेवंताला फक्त मुली होतात याच धर्तीवर घटस्फोट घ्यायचा दावा दाखल केलेला होता! वकिलांनी फार विचार करून कोर्टाला शेवंतीची बाजू पटवून दिली. "मिलॉर्ड, लग्नानंतर वर्ष - दीड वर्ष पहिलं मुल व्हायला लागतात; त्यानंतर चौथ्या मुलापर्यंत साधारणता दीड वर्षाच्या अंतराने सहासात वर्ष म्हणजे एकूणच लग्नानंतर या संसाराची अंदाजे नऊ दहा वर्ष लक्षात घ्या. असंच शेवंताच्या बाबतीत घडलं. धनाजीसारख्या पुरुषांना आपली संपत्ती, वारस हे सगळं टिकवण्याच्या नादात त्यांना फक्त मुलगाच हवा या निखळ हेतूने शेवंतासारख्या स्त्रीला उपभोगाची वस्तू म्हणून वापरणारे या समाजात तिच्या नवऱ्यासारखे अनेकजण बघायला मिळतात. आता तिला एका मागून एक अशा झालेल्या या चार मुली म्हणजे या गोष्टीचं कुणालाच सोयरसुतक असायचं काहीच कारण नाही अशी समाजभावना आपल्यात आपोआप रूढ झालेली आहे. त्यामुळे "नवऱ्याने कोर्टात दाखल केलेला दावा योग्यच असल्याचा निर्वाळा समाजसुद्धा अशा नवरोबांना  देऊन मोकळा झालाय.” कोर्टालापण वकिलांचं इथपर्यंत म्हणणं पटलं. ते पुन्हा आपला युक्तिवाद सांगू लागले, अशा शेवंतासारख्या स्त्रियांनी कुणाकडे दाद मागायची? आणि एकदा का कोर्टात प्रकरण गेलं म्हणजे आयुष्य कधी कडेला गेलं हेसुद्धा कळत नाही. आपल्याच विचारांची तुंबळ लढाई आपल्याच दुसऱ्या विचारांशी सुरू होते आणि मग पराभवही शेवटी आपल्याच कोणत्यातरी विचारांना स्वीकारावा लागतो! हे मात्र खूप वेळ निघून गेल्यावर लक्षात येतं! विज्ञानाचा आधार घ्यायचा म्हटलं तर स्त्रीपुरुष समागमातून होणारी उत्पत्ती कोणाच्या हातात असते तर ती निसर्गाने जो खऱ्या अर्थाने स्वतःला प्रधान समजतो त्याच पुरुषाच्या हाती असते!” कोर्टसुद्धा एकदम हा बचावात्मक युक्तिवाद अगदी मन लावून ऐकत होतं. आतापर्यंतची वकिलांनी सांगितलेली जन्माअगोदरची लिंगसाक्षरता उपस्थित सर्वांनाच भावली. ते पुन्हा कोर्टाला सांगू लागले,"पुरुषांच्या XY गुणसूत्रांचं जर स्त्रीच्या XX गुणसूत्रांची बंध जुळताना पुरुषांचा X कामी आला तर  XX चा म्हणजेच मुलीचा जन्म व जिथे पुरुषांचा Y कामी आला तिथे XY म्हणजेच मुलाचा जन्म ! याचाच अर्थ मुलगा किंवा मुलगी जन्माला घालणे हे फक्त आणि फक्त पुरुषावरच अवलंबून असते. अनेकजण या नावाखाली पुनर्विवाह करू पाहतात किंवा अनेकांनी केलेतसुद्धा! शेवटी एवढा सगळा खटाटोप कशासाठी? असा प्रश्न जर अशांना विचारायला गेलं तर त्यांनासुद्धा उत्तरं सापडणार नाहीत आणि जर सापडलीच तर ती निश्चितच यापेक्षा वेगळी असतील. जगाला जन्म देणाऱ्या स्रीची आतापर्यंत झालेली उपेक्षा सोडा..परंतु यापुढे तरी सजग जेव्हा व्हाल तेव्हाच जगातल्या अनेक अशा भांडणांवर पडदा पडेल फक्त जन्माअगोदरची लिंगसाक्षरता तेवढी समजून घेतली तर बरं होईल..”

  चार-पाच वर्षांपासून सुरू असलेली केस न्यायाधीशांच्या संपूर्ण लक्षात दोन-तीन आली होती. त्यादिवशी ती अंतिम सुनावणी होती तेव्हा हे सगळं XX, XY गुणसूत्रांचं गणित धनाजीच्या अगदी अंगलट आली. शेवटी कोर्ट सरळसरळ निर्णय शेवंताच्या बाजूने दिला अन्‌ सोबत चांगलं वागवायची तंबीपण भरली. म्हणूनच धनाजी त्यादिवशी कोर्ट संपल्यावर मुकाट आपल्या बायकोला  सोबती घरी घेऊन आला. म्हणूनच धनाजीला आज जास्त काही सुचत नव्हतं. धनाजी  बापाचं बोलणं काही एक न ऐकता कोर्टात सांगितलेल्या जन्माअगोदरच्या लिंग साक्षरतेबाबत विचार करत वावरात निघाला होता. पुन्हा लांबून म्हादुनं आवाज दिला, "झालं ते झालं, पोरा आता तरी ऐक माझं.” बापाचं सांगितलेलं एकदम शांतपणे ऐकून तो बहुतेक स्वतःशीच पश्चाताप करत पुढं चालला होता. रखमाबाईचं दळण झालं होतं तरी तीही खाली मान घालून सुपात राहिलेले मुके दाणे घोळत होती. काय बोलावं ? म्हणून न बोललेलं बरं; असं तिला वाटत असावं. स्वतःच्या सुखी संसाराची धनाजीनं जवळपास पाच वर्षे वाया घातली होती! कदाचित त्याला हे सगळं पाच वर्षांपूर्वी भांडण कोर्टात घालायच्या अगोदर ऐकलं असतं अन्‌ पोरी होण्यामागे दोष तिचा नाही असं लक्षात आलं असतं तर शेवंताला दिलेल्या वागणुकीत त्यानं नक्की स्वतःच्या मनानेच बदल केला असता; पण घटना घडून गेल्या होत्या म्हणून तो चिंता करत बऱ्याच वेळापासून वावरातल्या कामाला बिलगला होता. ऊन चटकायला लागलं तेव्हा शेवंता मागून पोरीला कडेवर अन्‌ डोक्यावरल्या पाटीत त्याची न्याहारी घेऊन आली . बांधावरच्या आंब्याखाली टोपलं टेकवत लांबूनच नवऱ्याला आवाज देत म्हणली, "आवं, चला भूक लागली आसंन घ्या येरवाळी न्याहारी करून.” त्यानं बी हातातलं काम पटकन संपवलं अन्‌ सावलीला आला. नवऱ्याच्या मातीमिश्रित घामानं हातांकडे बघत शेवंतानं कळशीतून तांब्याभर पाणी काढलं. त्यानंही हात धुवायला ओंजळ पुढं केली अन्‌ तिनं हातांवर पाण्याची धार सुरू केली. धनाजीला चांगलाच पश्चाताप झाला असं वाटू लागलं. नवऱ्याला जेवायला दिल्याशिवाय बायकोनं जेवायचं नसतं म्हणून तिनं पहिलं नवऱ्याला जेवायला   वाढलं. धनाजीचा पहिला घास पोटात गेला अन्‌ शेवंतानं कालवण तिला जेवायला ताटात कालवण घेतलं. ते अजून एकमेकांशी बोलत नसले तरी त्यांचं मन मात्र ‘झालं गेलं गंगेला मिळालं' असं म्हणत आतून बोलायला लागलं होतं.
- निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी, मंडळ कृषी अधिकारी, फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पुरी बाबा : आपलेपणाचा किमयागार!