जिथे शब्द संपतात...
नजर, दृष्टी, नेत्रपल्लवी, डोळ्यांची भाषा, सिंहावलोकन, तपासणी वगैरे वगैरे सारे शब्द डोळे व त्यामुळे आपल्याला मिळालेल्या पाहण्याच्या शक्तीभोवती फिरतात. सजीव सृष्टीत या पाहण्याच्या शक्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याला डोळे, त्वचा, नाक, कान व जीभ या पंचेंद्रियांच्या माध्यमातून सभोवतालचे आकलन होते. या साऱ्यात डोळ्यांचे महत्व पहिल्या क्रमांकाचे. आपल्या दैनंदिन जीवनातील पन्नास टक्क्यांहुन अधिक माहिती, आकलन, ज्ञान, संवेदना, जाणीवा या डोळ्यांच्याच माध्यमातून आपल्याला होत असतात.
आता तर सोशल मिडियाचा जमाना आहे. जरा कल्पना करा की आपण सोशल मिडिया डोळ्यांविना अनुभवत आहोत म्हणून! आताच्या ‘मोबाईल ॲडिक्ट' पिढीचे शिलेदार तासभर जरी मोबाईलपासून, वायफायपासून, मोबाईल डाटापासून दूर राहिले तर पाण्यातून बाहेर काढलेल्या माशांसारखे कसे कासावीस होतात हे आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असेलच. अशावेळी मला विख्यात दिवंगत गीतकार संगीतकार रविंद्र जैन यांनी लिहुन संगीतबध्द केलेल्या ‘गीत गाता चल' चित्रपटातील शीर्षक गीताच्या ओळी आठवतात. त्यात त्यांनी म्हटलंय की ‘खुला खुला गगन ये हरी भरी धरती जितना भी देखूॅं तबियत नही भरती!' यातील ‘देखूँ' शब्द अति महत्वाचा. कारण पाहण्यासाठी रविंद्र जैन यांना नजरच नव्हती. ते जन्मापासूनच अंध होते. तरीही त्यांनी इतक्या संस्मरणीय गाण्यांना शब्दरुप तर दिलेच; पण त्यांना अवीट चाली लावून ती गाणी अजरामर केली. ज्या माणसाने प्रकाशाऐवजी केवळ अंधारच अनुभवला त्याने ‘खुला खुला गगन, हरी भरी धरती' वगैरे शब्दरचना कशी केली असेल? याच रविंद्र जैन यांनी ‘चोर मचाए शोर' चित्रपटासाठी ‘घुँगराेंकी तरह बजताही रहा हु मै' या गीतातही मानवी जीवनसंघर्षातील विविध घटनाप्रसंगांचे चित्रण हुबेहुब करुन तुम्हा आम्हा डोळस दर्शकांना एक जिवंत रसरशीत अनुभुती दिली आहे. काहीही पाहिले नसताना या अनुभवांना शब्दरुपात उतरवणे किती कठीण असते याची केवळ कल्पनाच केलेली बरी! अनेकांना ‘नरडे' असते ते केवळ खाण्यासाठी. गायकांना ‘गळा' असतो तो गाण्यासाठी. रविंद्र जैन हे चांगले गायकही होते. रामानंद सागर दिग्दर्शित ‘रामायण' या महामालिकेचे संगीत देताना त्यांनी गायनही केले होते. देव, नियती, निसर्ग, मातापित्यांकडून मिळालेल्या सगळ्या चांगल्या स्वरुपात मिळालेल्या इंद्रियांचे काही डोळस लोक काय करतात? दारु पिऊन गटारात पडणाऱ्या, तंबाखू-गुटखा खाऊन कॅन्सरचे दुखणे ओढवून घेतलेल्या, घाणेरडी व्यसने लावून घेत टीबी झालेल्या काही लोकांच्या जीवनाकडे जरा बारीक नजरेने पाहा, मी काय म्हणतोय ते लगेच लक्षात येईल.
संगीत संयोजन, गीत सादरीकरण या उच्च प्रतिचे कौशल्य आवश्यक असणाऱ्या कला आहेत. भले भले डोळस लोक हाती माईक दिला की गळपटतात. बोलणे, गाणे सादर करणे तर दूरच राहिले. दोन कडव्यांच्या मध्ये संगीत वाजते. दुसरे कडवे सुरु होताना मधल्या संगीतानंतर गाण्याच्या पुढील ओळींना कुठे सुरुवात करायची याचा अनेक डोळेधारकांनाही कधी कधी गंध नसतो. तिथे अंध गायकांचे काय होत असेल? पण त्यांचे अंतःचक्षू विलक्षण ताकदीचे असतात. त्यांची प्रॅक्टिस खडतर व परिपूर्ण असते. त्यामुळे ते कुठेही बिचकत नाहीत, चुकतही नाहीत हे मी स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय, घराडी-मंडणगड, जि. रत्नागिरी येथील गायक, वादक यांच्या प्रत्यक्ष सादरीकरणाचा अनुभव घेतल्यावरुन सांगू शकतो. तर ते असो.
अंध व्यक्ती प्रेम कसे करत असतील? प्रेमाची कबुली कसे देत असतील, प्रेमाचा स्वीकार कसे करत असतील, त्यांचे प्रियाराधन कसे होत असेल? एखादी व्यक्ती प्रियकर किंवा प्रेयसी म्हणून आवडण्याचे त्यांचे निकष काय असतील बरे? हा एक फार मोठा अभ्यासाचा विषय आहे. आपण डोळसांकडे येऊ या. तोंडातील, शब्दातील, पुस्तकातील, रेडिओतील भाषेबरोबरच दुसरी एक भाषा सतत काम करत असते. ती म्हणजे ‘डोळ्यांची भाषा'. ही भाषाही आपल्याला आईच शिकवत असते किंवा आपण डोळस लोक जन्मापासूनच सोबत घेऊन येतो. पाहाना, जन्मल्यानंतर काही महिने तरी बाळ नीट बोलू शकत नसते; पण पाहात मात्र असते. आपण बोबड्या बोलांनी त्याचे लाड करतो. ते नजरेने प्रतिसाद देते. ते आईला ओळखते, वडिलांना ओळखते. नेहमी जोजवणाऱ्या आजी-आजोबा, काका, मामा, मामी, मावशी यांना बरोबर ओळखते. बाळाला बोलता येत नसले तरी ते ‘ओळखीचे' हसुन प्रतिसाद देते. वाणी हे त्या बाळाचे इंद्रीय विकसित व्हायला काही काळ जाऊ द्यावा लागतो, पण तोवर ‘डोळ्यांनी' काम केलेले असते. आईने डोळे वटारले की ते बाळाला बरोबर समजते. ताईच्या नजरेतील मिश्किलपणा बाळ जाणून त्याला प्रतिसाद देते. ही झाली डोळ्यांची भाषा. जी जन्मानेच आपल्याला आपसुक लाभते व शेवटी जेंव्हा आपले डोळे ‘कायमचे' मिटतात आणि आपण वैकुंठाच्या व परत न येण्याच्या यात्रेला निघतो तेंव्हा आपल्या मिटल्या डोळ्यांबरोबरच कायमची मिटून जाते. बाळ जन्माला येते तेंव्हा सारेजण त्याला पाहायला उत्सुक असतात, कसा दिसतो, कशी दिसते? आईसारखी/खा... की वडिलांसारखी/खा वगैरे प्रश्नांची सरबत्ती होते व कौतुकभरल्या डोळ्यांनी सर्वजण बाळाला ‘पाहतात'. ...आणि सारी कर्तव्ये पार पाडल्यावर जेंव्हा एखादी व्यवती शेवटचे ‘डोळे मिटते' तेंव्हाही लोक अंत्य‘दर्शना'साठी जमतात. आयुष्य म्हणजे जन्म ते मृत्यु म्हणजेच ‘डोळे उघडणे व ते कायमचे मिटणे' या दोन टोकांदरम्यानचा प्रवास आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये.
या मिळालेल्या नजरेने आपण काय काय करतो? आपण प्रत्यक्षात कधीही न पाहिलेल्या देवतांच्या केवळ मूर्ती ‘पाहुन' त्यांच्याकडून आशीर्वादाची याचना करतो. देवांनी, निसर्गाने, नियतीने आपल्यावर ‘कृपादृष्टी' ठेवावी म्हणून करुणा भाकतो. महापुरुषांच्या तस्विरी ‘पाहुन', त्यांना वंदन करुन त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ पाहतो. पुस्तकांच्या मुखपृष्ठावर प्रेरणादायी व्यक्तींची छायाचित्रे, वर्तमानपत्रांतून गुणवंत, नामवंतांच्या छबी ‘पाहुन' आपण सुखावतो, कळत-नकळत उत्तेजन-प्रोत्साहन मिळवतो. त्यांना हात जोडतो. अनेकदा आपल्यासाठी ज्येष्ठ, समाजमान्य व्यक्तीची ‘नजर' मोलाची असते, तिच्या ‘कृपादृष्टी'साठी अनेकजण जिवाचे रान करीत असतात. तरुणाईसाठी तर ही ‘नजर' अतिमहत्वाची ठरते. त्याच्या किंवा तिच्या केवळ एका ‘दीदारासाठी, नेत्रकटाक्षा'साठी काहीजण/काहीजणी कित्येक दिवस झुरत असतात. आपल्या बाळाने चालण्यासाठी पहिले पाऊल टाकले की त्याच्याकडे पाहताना मातापित्यांच्या नजरेत जी झाक असते तिचे वर्णन करण्यात माझी लेखणी तोकडी पडते. पंजाबपासून जवळच्या वाघा बॉर्डरवर भारत-पाकिस्तानच्या जवानांमध्ये परस्परांविरुध्द केल्या जात असणाऱ्या कवायतप्रसंगीचा त्यांच्या ‘नजरेतील अंगार' पाहा. देशासाठी लढून शत्रुला नामोहरम करुन परतलेल्या सैनिकाकडे ‘पाहताना' त्याच्या मातापित्यांत दिसून येत असलेला अभिमान पाहा. तुम्हा आम्हा सिव्हीलियन्सना कदाचित तो समजणारही नाही. शत्रुशी लढताना वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकाच्या अंत्यसंस्कारप्रसंगी त्याच्या आई-वडिलांच्या, त्या वीरपत्नीच्या ‘नजरेला नजर' देण्याचे धाडस अनेकांमध्ये नसते. काहीही बोलायची गरज नाही, एक शब्दही उच्चारायची आवश्यकता नाही.. केवळ त्यांचे डोळे, त्यांची नजरच त्यावेळची विवशता, दुःख, वेदना आणि त्याचवेळी त्यांंच्या अभिजनाने केलेला देशासाठीचा अपरिमित त्याग दर्शवून जात असतात.
हेच डोळे नकारात्मकता, तुच्छता, अहंकार, बडेजाव, मोठेपणा, नाराजी, नापसंती, विकार, विषयवासना दर्शवण्यातही आघाडीवर असतात. अनेकदा अनेक महिला या काही पुरुषांची लंपट, वासनाविकाराने बरबटलेली ‘नजर' बरोबर ओळखतात व त्यांना दूर ठेवतात. कसलेच कष्ट न करता केवळ बाप, नवरा किंवा मुलाच्या संपत्तीवर मौजमस्ती करणाऱ्या काही महिलांच्या नजरेत असाच अहंकार, तुच्छता शिगोशिग भरलेली असते. आवडत्या पदार्थांवर ताव मारुन तृप्तीने ढेकर देत बडीशेप चघळत उंची हॉटेलच्या पायऱ्या उतरत नवऱ्याच्या गाडीकडे जाताना तेथील पार्किंग सांभाळणाऱ्या सुरक्षा रक्षकाकडे ‘तुच्छतेने पाहणाऱ्या' काही श्रीमंत बायकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आठवा. ‘दिवार' चित्रपटात बूट पॉलिश करणाऱ्या मुलाकडे पैसे फेकणाऱ्या खलनायकाची ‘अहंकारी नजर' आणि तोच मुलगा मोठा झाल्यावर विजय (अमिताभ बच्चन ) बनून ‘आज भी मै फेके हुए पैसे नही उठाता' म्हणताना त्याने नेमकेपणाने दर्शवलेला ‘नजरेतील विखार' पाहा. मला कुणी विचारले की तुम्हाला नेमकी कोणती नजर व्याकुळ, घायाळ करते? तर याचे उत्तर असेल की लाडाकोडात वाढवलेली आपली मुलगी जेंव्हा विवाहवेदीवरुन उतरुन सासरी जायला निघते तेंव्हा तिची आणि तिला सासरी पाठवणाऱ्या आईवडिलांची नजर! या नजरेची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. मला मुलगी नसल्याने या अनुभवापासून मी वंचित आहे खरा. पण २००२ साली माझ्या भाचीचे लग्न झाले व ती गुजरातमधील जुनागढ येथे जाण्यासाठी निघताना आम्हा साऱ्यांचा निरोप घेत असता तिने तिच्या घराकडेही ज्या स्नेहार्द्र, अश्रूभरल्या नजरेने पाहिले ती नजर मी आयुष्यात कधीही विसरु शकत नाही. तिच्या त्या नजरेच्या आठवणीने आजही माझ्या अंगावर काटा येतो. या प्रसंगाचे वर्णन करताना मला शब्दांची मोठी जमवाजमव करावी लागते तरीही तो अनुभव शब्दांत पकडता येत नाही हेच खरे! म्हणून म्हणतो ही नजर, ही दृष्टी हा सारा शब्दांपलिडचा, मूक... तरीही प्रचंड ताकदीचा मामला आहे. तो ज्याचा त्यानेच अनुभवावा!
--राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई