मुशाफिरी

जेवण...घरचे आणि बाहेरचे

 एक काळ असा होता की गावोगावी क्षुधा-शांती गृहे, उपहार गृहे नव्हती. लांबच्या गावी जायचे म्हटले की घरची भाजी भाकरी सोबत न्यावी लागे किंवा कुठल्यातरी नातेवाईकाचा ठावठिकाणा शोधावा लागे. बाहेरचे खाणे त्याज्य नव्हे.. तर शक्य नव्हते. त्यामुळे घरच्या जेवणाला अनन्यसाधारण महत्व होते. आज शहरी, निमशहरी भागात अशी परिस्थिती आहे की घरचे खाण्याची कितीही इच्छा असली तरी व्यवहारात ते शवय होईलच असे नाही. ‘वर्क फ्रॉम होम' चे वास्तव समोर आल्याने तर घरचा निवांतपणा, खासगीपणाही हरवला. आठवडाभर कार्यालयात काम करताना तेथील महिलांना किंवा नोकरी न करणाऱ्या महिलांनाही अधूनमधून बाहेरचे काही चवदार, खमंग, चटपटीत खावेसे वाटणे यात गैर काहीच नाही.

   नुकताच दसरा पार पडला असून आता सर्वांना वेध दिवाळीचे लागले आहेत. श्रावण महिन्यात सुरु झालेला सणांचा सिलसिला इतक्या झटपट येऊन जातो की आपले आपल्यालाच कळत नाही. दसरा-दिवाळी म्हटले की गोडधोड, तिखट, कुरकुरीत, खमंग, चवदार फराळाचे दिवस! याच काळात नकली, बनावट, आरोग्याला अपायकारक असा खवा, मावा शेकडो किलो स्वरुपात कसा काय अचानक उपलब्ध होतो ते कळतही नाही. मग अन्न आणि औषध प्रशासनाच्या छाप्यांमध्ये एवढा किलो जप्त, तेवढा किलो जप्त अशा बातम्या आपण वाचायच्या! आज परिस्थिती अशी आहे की अनेकदा "बाहेरचे पदार्थ' अजिबात तोंडात घेऊ नये असे काहीजणांना कितीही वाटत असले तरी ते व्यवहारात शवय नाही. शहरी भागात तर प्रत्येकाच्या घरी गोधन नाही, त्यामुळे दूध, ताक, दही, लोणी, खवा, मावा या साऱ्या वस्तू बाहेरुन घेण्यावाचून गत्यंतर नाही.

   हे तर झालेच..पण अनेकांसाठी ‘घरकी मुर्गी दाल बराबर' असेही सूत्र असते. घरच्या सुगरणीने कितीही श्रमून चवदार पदार्थ बनवले तरी कित्येकांना ‘बाहेरचे' काहीतरी हवेच असते. त्यांचे काय करणार? दिवाळीच्या सणाबाबत म्हणाल तर दिवाळीचा फराळ अनेक गृहिणी अजूनही ( हे महत्वाचे!) स्वतः घरीच बनवतात. घरातील पुरुषही त्या कामी (हे कमी पाहायला मिळते!) मदत करतात. घरच्या सुगरणीने मेहनतीने बनवलेला पदार्थ घरचे सारे जण आनंदाने आस्वादताहेत आणि त्यावेळी त्या सुगरणीच्या चेहऱ्यावर दाटलेला आनंद न्याहाळणे ही मोठी अनोखी बाब आहे. घरची सुगरण जर कामकाजी महिला असेल तर तिच्यासमोरील अडचणी वाढतात. तरीही कामावर जाणाऱ्या अनेकजणी तारेवरची कसरत करुन रात्री जागून, सकाळी लवकर उठून फराळ बनवतातच! पूर्वीच्या एकत्र कुटुंबात अशी अडचण येत नसे. आजी, काकी मंडळी, चुलत बहिणी, घरातील अविवाहित आत्या हे सदस्य आईच्या, बहिणीच्या मदतीला धावत असत. त्यामुळे दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदाची होत असे. काळाने कूस पालटली. एकत्र कुटुंब पध्दती अनेक ठिकाणी जवळपास मोडीत निघाली.  परिवारातील अनेक सदस्य शहराच्या दिशेने पैसे कमवायला, स्वतःची प्रगती करायला निघून गेले. ...आणि गावची घरे ओस पडली. गणपती नंतर कोकणातील अशा घरांचे चित्रण, वर्णन विविध प्रसारमाध्यमांतून पाहायला मिळू लागले. केवळ कोकणच नव्हे, देशातील अनेक गावांची स्थिती याहुन काही वेगळी नाही. अलिकडे एकट्या पडलेल्या कामकाजी महिलांच्या मदतीसाठी महिलांचे बचतगट, काही मंडळे पुढे सरसावली आहेत. सहकारी तत्वावर त्या फराळ बनवतात व किलोच्या दराने वितरणासाठी ठेवतात. देशात विविध दूरच्या ठिकाणी किंवा परदेशातही आता फराळ कुरियरने पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे खरी..पण त्या सुविधेचे दर पाहिले की तोंडाची चव जाण्याची आणि डोळे पांढरे होण्याची शक्यता वाढते.

   हे झाले दिवाळीच्या फराळापुरते! आज शहरी, निमशहरी भागात अशी परिस्थिती आहे की घरचे खाण्याची कितीही इच्छा तरी व्यवहारात ते शवय होईलच असे नाही. नोकरदार महिलांना कामाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या, घरच्या मुलांची, सासू-सासरे, घरचे काम यांची जबाबदारी हे सारे सांभाळताना तारांबळ उडते. त्यामुळे मनात असो नसो..‘बाहेरचे खाणे' घरी वेगवेगळ्या मार्गांनी येतेच! एक काळ असा होता की गावोगावी क्षुधा-शांती गृहे, उपहार गृहे नव्हती. लांबच्या गावी जायचे म्हटले की घरची भाजी भाकरी सोबत न्यावी लागे किंवा कुठल्यातरी नातेवाईकाचा ठावठिकाणा शोधावा लागे. बाहेरचे खाणे त्याज्य नव्हे.. तर शक्य  नव्हते, उपलब्धही होत नव्हते. त्यामुळे घरच्या जेवणाला अनन्यसाधारण महत्व होते. शैक्षणिक क्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली, शहरीकरण, व्यापारीकरण झाले आणि आता माहिती तंत्रज्ञानाच्या विस्फोटाने तर सारीच समीकरणे पालटून गेली. वर्षेनुवर्षे तेच ते आणि तेच ते करणाऱ्यांच्या आयुष्यात चेंज आला. गाव सोडून अन्यत्र जाणे आले. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, पणन, पर्यटन अशा अनेक कारणांनी घरचा कर्ता पुरुष, मुलगा, मुलगी, महिला यांना घराबाहेर वारंवार जाण्याची, ववचित प्रसंगी शिक्षण-नोकरी-व्यवसायानिमित्त तेथेच राहण्याची वेळ येऊ लागली. येथे खऱ्या अर्थाने क्षुधा-शांती गृहे, उपहार गृहे, खानावळी, पोळी भाजी केद्रे अशा लोकांच्या मदतीला धावून आली. कुणा नातेवाईकाचा शोध घेत, त्याच्या मेहरबानीवर राहण्याची-जेवणाची वेळ संपली. हॉटेलांचा सुळसुळाट झाला, त्यांच्या जोडीला मासिक तत्वावर राहायला मिळतील असे हॉस्टेल, वसतीगृहे, लॉजेस हे काळाची गरज बनले. अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कामगार-अधिकाऱ्यांसाठी स्टाफ ववार्टर्स उभारले, जोडीला तिथे  कॅन्टीन्सही आल्या आणि  घरच्या जेवणाला समर्थ पर्याय काळाची गरज म्हणून उभा राहिला. लोकांनी त्याचे स्वागतही केले. पण तरीही घरची चव ती घरची चवच हे खरे! पण ती पुरी करायला घरच्या महिलेला उसंत तर मिळायला हवी?

   आज मी अनेक ठिकाणी पाहतो की काही कामकाजी महिला कार्यालयातून परतताना भाजी घेतात, ट्रेनमध्ये जागा मिळाल्यास ती निवडतात आणि घरी आल्यावर ती कुटुंबासाठी बनवतात. पण अनेक घरी हे शवय नसते. कामाच्या वेळा, करोनानंतरची स्थिती, आर्थिक स्थिती या साऱ्यात बदल झाला आहे. ‘वर्क फ्रॉम होम' चे वास्तव समोर आल्याने तर घरचा निवांतपणा, खासगीपणाही हरवला. आठवडाभर कार्यालयात काम करताना तेथील महिलांनाही अधूनमधून बाहेरचे काही चवदार, खमंग, चटपटीत खावेसे वाटणे यात गैर काहीच नाही. त्यामुळे कार्यालयाजवळची हॉटेले, खाऊच्या हातगाड्या, टपऱ्या, वडा पाव केंद्रे, खाऊ गल्ल्या यांना चांगले दिवस आले.

यांच्या जोडीला आईस्क्रीमची दुकाने, उसाचा रस देणारी दुकाने, लस्सी-ताक-दही-फळांचे रस-सोलकढी-पन्हे-निरा-ताडी वगैरे विकणारी दुकाने यांचीही भर पडली. सोबत पैशांखेरीज काहीही घेतले नाही तरी बाहेरच्या बाहेर ‘पोटोबा' होऊ लागल्याने अनेकांना तर ते सोयीचेही पडू लागत असल्याचे चित्र आहे. नवी मुंबई, मुंबई, पुणे अशा महानगरांच्या मोठ्या भूभागांवर आय टी कार्यालये उभारली गेली आहेत. नवी मुंबईत ऐरोली, महापे, शिरवणे, वाशी भागांत यांचे प्रस्थ अधिक आहे. तेथे काम करणाऱ्या मुलामुलींचे मासिक वेतन चांगले लठ्ठ असते. अनेक मुली आपापल्या घरापासून दूर येऊन दोघीतिघींच्या सोबतीने भाड्याची घरे घेऊन महानगरांत, उपनगरांत राहतात. आय टी कार्यालयाच्या अवतीभवती असलेल्या वडापाव, समोसे, भजी, पॅटिस, सॅण्डविच, पोहे, उपमा, डोसे, मेदू वडे हे व असे अनेक पदार्थ जिथल्या तिथे गरमागरम झटपट बनवून देणाऱ्या गाड्या, टपऱ्या, हॉटेले यांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. त्यांचा लाभ या मुलामुलींनी घेतला नसता तरच नवल! त्यांच्यासाठी बाहेरचे जेवण, नाश्ता हे असे वरदानस्वरुपी ठरले आहे. रोज रोज भाज्या, तांदुळ-गहु निवडा, दळून आणा, डब्यांत भरा, गॅसची सोय करा, तेल, मीठ, तिखट हे सारे भरत राहा या झंझटमारीत अडकायची या पिढीतील अनेकांची/अनेकींची इच्छा नाही हे स्पष्ट आहे. तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक हे आपला जोडीदार देवाघरी निघून गेल्यानंतर एकटे आहेत. काही ठिकाणी दोघेही आहेत; पण जेवण रांधण्याची ताकद त्यांच्यात आता उरलेली नाही, काहींना त्यांच्या मुलामुलींनी स्वतः परदेशात डॉलर कमावण्यासाठी जाऊन इकडे एकाकी सोडले आहे, पैसे भरपूर पाठवतात..पण लक्ष देत नाहीत..त्यांच्यासाठी ‘बाहेरचे जेवण' मदतीला धावते.

   हे झाले गरजेपोटीचे! पण याही परिघाबाहेर अनेकजण आहेत, ज्यांना घरचे चांगले, ताजे, चवदार, भरपूर आणि नित्यनेमाने जेवण मिळत असूनही बाहेरचे खमंग, झणझणीत, तिखटजाळ किंवा आंबट-गोड अशा प्रकारचे काहीतरी सतत खायला आवडते. खाऊच्या गल्ल्या, टपऱ्या, स्ट्रीट फूड, हॉटेले यांचे ते खरे पोशिंदे ! आता तर उबेर इटस, स्विगी, झोमॅटो, अमेझॅान अशांचे ऑनलाईन प्रस्थ आहे. ‘बाहेरचे जेवण' जेवायला बाहेर जाण्याचीही गरज नाही. अनेक नामांकित हॉटेले एका फोनवर घरपोच जेवण पाठवतात. शिवाय माझ्यासारखे काहीजण हटके जेवणासाठी, चवीसाठी आसुसलेले आहेत. जर पर्वत मोहम्मदाकडे येत नसेल तर मोहम्मदाने पर्वताकडे जावे असा साधा नियम आहे. मग ठाण्याच्या मामलेदारांची मिसळ असो, तेथीलच कुंजविहारचे बटाटेवडे असोत, महंमद अली रोडवरचे स्ट्रीट फूड, कल्याणचे खिडकी वडे असोत, मुंबईच्या चेंबूर कॅम्प येथील वजडी पाव-कलेजी पेटा असो, कोल्हापूरातील तांबडा पांढरा रस्सा असो, मुवकाम पोस्ट मालवण मधील चिंबोरीचे कालवण असो की सिंधुदुर्ग-गोव्याच्या कुठल्याशा हॉटेलातील सुरमई, पापलेट फ्राय असो.. त्या त्या पदार्थांचा तिथल्या तिथे जाऊन मी वेळोवेळी आस्वाद घेतला आहे. पुण्याच्या पुढे सासवडजवळ काळे फार्म येथे रोजच्या रोज म्हणे चारशे किलो मटण बनवले जाते आणि ते फस्त करायला लांबलांबून जातिवंत खवय्ये येतात, त्याचा मी नुकताच व्हिडिओ पाहिला आणि वेळ येताच तिकडे रवाना होऊन त्या मटण भाकरीवर ताव मारीत रसनेची तृप्ती केली. संगमनेरच्या समनापूरचा अन्सार चाचा यांच्या नसीब वडापाव सेंटरचा वडापाव आणि ‘येथे पेता, खाता की घरी नेता' छाप भाषेच्या अगत्याचा अनुभव अजून घ्यायचा आहे, ठाणे पूर्वेतील भट्टी समोसे, पाया सूप यांचीही चव घ्यायची आहे. अशी एकापेक्षा एक चवीची ठिकाणे, एकापेक्षा एक चवदार व्यंजने आणि इतकेसेच आयुष्य ! कसा बरे मेळ बसायचा?

 - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक दै. आपलं नवे शहर.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

डॉ. अभिजित सोनवणे लेख -