मॉडर्न स्कूल मध्ये आठवडा बाजार उपक्रम

नवी मुंबई ः ‘रयत शिक्षण संस्था'च्या वाशीतील मॉडर्न स्कूलच्या प्राथमिक मराठी विभागामार्फत २१ जानेवारी रोजी चिमुकल्यांचा आठवडा बाजार उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या चिमुकल्यांच्या बाजारात वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, कपडे, सुका खाऊ, चॉकलेट , खेळणी, फळे, स्टेशनरी, अशी विविध दुकाने थाटण्यात आली होती. आपल्याकडे असलेल्या पदार्थांची विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी आनंद ओसंडून वाहत होता. या बाजारातील उत्साह पाहून पालक आणि इतर विद्यार्थ्यांनीही आनंदाने खरेदी केली. या आठवडा बाजार उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळते. नोटा आणि नाणी यांची ओळख होते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारज्ञान कळते आणि बाजारात चालणारी कामे प्रत्यक्ष अनुभवास मिळतात. गणिती क्रिया स्वतः करता येते. त्यामुळे स्वावलंबन आणि चिकित्सक वृत्ती वाढीस लागते. प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळत असल्यामुळे ते आनंददायी आणि चिरकाल स्मरणात राहते.

शालेय जीवनापासून मुलांना व्यवहारज्ञान समजावे, गणितातील सोप्या संकल्पना समजाव्यात, व्यवहारातील प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी शाळेत सदर आठवडा बाजार भरविण्यात आला. विद्यार्थी  केवळ अभ्यासात नाही तर व्यवहारात सुध्दा हुशार असणे गरजेचे आगे. त्यामुळे सदर स्तुत्य उपक्रम असल्याचे प्राथमिक मराठी विभागाचे मुख्याध्यापक वाघ यांनी सांगितले.

याप्रसंगी प्राथमिक मराठी विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी सदर उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल संबंधितांचे अभिनंदन केले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त''मराठी भाषेचे संवर्धन' या विषयावरील कार्यक्रम