आयुष्याच्या जोडीदारातील एकजण सोडुन जातो तेंव्हा...
"नवरा होता तोवर सारे काही ठीक चालले होते. आता मुले-सूना-नातवंडे येतात, दिवसभर थांबतात, कधीकधी रात्री बारापर्यंतही सोबतीला असतात. त्यानंतर मात्र घर खायला उठते. मी एकटीच उरते. मुलं-सूना काही कमी पडू देत नाही, सारे काही पुरवतात, कामालाही बाई आहे. मला वेगळं असं काहीच करावं लागत नाही, पण खरं सांगते...एकदा का आपल्या आयुष्याचा जोडीदार निघून गेला ना...की संपलं सारं. त्याची कसर कुणीच भरुन काढू शकत नाही..” असे त्या महिलेने सांगितले.
खरंच असंच होत असतं का सगळीकडे ?
भेट तिची माझी स्मरते अजुन त्या दिसाची धुंद पावसाची होती रात्र पावसाची,
रिमझिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात प्रियाविण उदास वाटे आज,
ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता,
बरखा रानी जरा जमके बरसो मेरा दिलबर जा न पाये झुमकर बरसो
ही व अशी कित्येक गाणी महान गीतकारांनी या पावसावर लिहुन ठेवली आहेत. तुम्ही कुणीही असा..हा पाऊस तुम्हाला जेवढा आनंद देतो तेवढाच सोडुन गेलेल्या, दुरावलेल्या प्रियजनांच्या आठवणींनी व्याकुळही करुन सोडतो. प्रियजन म्हणजे केवळ प्रियकर, प्रेयसी नव्हेत. यात प्रेमळ आई, वडील, आजी-आजोबा, मामा-मावशी, आत्या, काका-काकी, भावंडे असे कुणीही असू शकतात. विशेषकरुन ते प्रियजन..जे आज तुमच्यासोबत नाहीत. पुन्हा केव्हाही परत न येण्याच्या वाटेवर ते कायमचे निघून गेले आहेत.
दोनच दिवसांपूर्वी मला अशाच माझ्या एका दूरस्थ ज्येष्ठ वहिनीचा व्हिडिओ कॉल आला. या प्रकारे व्हिडिओ कॉल करुन व्यक्त होण्याची तिची ही पहिलीच वेळ. दीड वर्षांपूर्वी माझ्या त्या दूरच्या भावाचे आजारान्ती निधन झाले होते. तो आणि त्याची पत्नी एका घरात; तर दोन्ही मुले त्यांच्या मुलांसह त्याच शहरात, जवळच..पण आपापले फ्लॅटस घेऊन वेगळे राहात होते. मात्र दिवसातून आपल्या आई-वडीलांकडे दोन तीन वेळा तरी त्यांच्या फेऱ्या होतच असत. अपुऱ्या जागेमुळे त्यांनी वेगळी घरे घेतली होती. माझ्या त्या वहिनीला पायांचे दुखणे लागून बरीच वर्षे झाली आहेत. त्यावर त्या परिवाराने लाखो रुपये संपवून ज्याने ज्याने सुचवले ते सारे उपाय केले; पण आराम पडला नाही. आता तिला काठीच्या आधाराशिवाय वावरता येत नाहीत असे दिवस आले आहेत. तिने मला सरळ व्हिडीओ कॉल लावला. ‘तुम्ही बऱ्याच दिवसात दिसला नाहीत, बोलला नाहीत, संदेश-चर्चा नाही म्हणून कॉल केला' अशी तिने प्रस्तावना केली. मी त्यावेळी कार्यालयीन कामात व्यस्त असूनही त्या वहिनीला व्यक्त व्हायला वेळ दिला. तिचे सारे म्हणणे ऐकून घेतले. त्या सगळ्या म्हणण्याचा मतितार्थ असा होता की नवरा होता तोवर सारे काही ठीक चालले होते. आता मुले-सूना-नातवंडे येतात, दिवसभर थांबतात, कधीकधी रात्री बारापर्यंतही सोबतीला असतात. त्यानंतर मात्र घर खायला उठते. मी एकटीच उरते. मुलं-सूना काही कमी पडू देत नाही, सारे काही पुरवतात, कामालाही बाई आहे. मला वेगळं असं काहीच करावं लागत नाही, पण खरं सांगते...एकदा का आपल्या आयुष्याचा जोडीदार निघून गेला ना...की संपलं सारं. त्याची कसर कुणीच भरुन काढू शकत नाही.
मला खूप वाईट वाटले. माझ्या त्या वहिनीचे दुःख मी समजू शकत होतो. पण या टप्प्यातून प्रत्येकालाच एक ना एक दिवस जायचेच आहे. जसं एखाद्याला जखम झाल्यास तो किंवा ती कितीही जवळची असली आणि आपल्याला लाख वाटले की तिच्या/त्याच्या वेदना आपण घ्याव्यात; तरीही त्या वेदना त्याच व्यक्तीने सोसायच्या असतात. त्यावर संवेदनेची फुंकर घालण्याव्यतिरिवत दुसरा कोणताही उपाय नसतोच. कारण अशा प्रकारचे अनुभवाचे बोल ऐकवणाऱ्या अनेक वयोवृध्द जोडप्यांमधील एकेकाला मी अनेकदा भेटलो आहे, त्यांचे दुःख जाणून घेतले आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस हे जग सोडायचेच आहे. तेही शक्यतो वृध्दावस्थेत! (तरुणपणी मरायला कुणाला आवडेल?) अशा वेळी जोडीदार आधी गेला व त्याचे आपल्यावर व आपले त्याच्यावर निरातिशय प्रेम असल्यास उरलेल्याची स्थिती शब्दांनी वर्णन करण्यापलिकडली होते याची जाणीव मला आहे. ‘नटसम्राट' मधील सरकार अर्थात पत्नीच्या निधनानंतर नटसम्राटाची झालेली अवस्था डोळ्यांसमोर आणा !
...मात्र याला पूर्णतः छेद देणारे एक उदाहरणही माझ्या पाहण्यात आहे. त्यातील जोडप्याचे एकमेकांवर किती प्रेम होते, याचे मोजमाप माझ्याकडे नाही. पण त्यातील नवऱ्याला मी सतत राबताना पाहिले आहे. स्वयंपाकघरातील काम असो, बाजारहाट असो, उचलमांड असो, घरची साफसफाई असो या व अशा प्रकारच्या कामात मी त्याला कायम व्यस्त राहिलेले पाहात आलो आहे. त्याची पत्नी मात्र बऱ्याचदा उशिरा उठणारी, आरामपसंद मानसिकतेची, घरकामात फारशी रुची नसलेली, ‘नवरा देतोय ना बसल्या जागी..मग करुया मजा' या वृत्तीची होती. बाथरुममध्ये आंघोळीला गेल्यावरही आतून आवाज देत कपडे, टॉवेल नवऱ्याकडे (रोमँटीकपणे नव्हे! त्याला राबवण्याच्या मानसिकतेतून) मागणाऱ्या काही विचित्र महिला असतात. हा त्यातलाच एक नमुना होता. एक दिवस अचानक छातीत कळ आल्याचे निमित्त झाले. त्या नवऱ्याला लागलीच ॲडमिट करावे लागले. काही दिवस इस्पितळातील उपचार घेतल्यावर त्याने तिकडेच अखेरचा श्वास घेतला. सारे संपले ! हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, एकटी झाली; आता पुढे काय, याची उत्सुकता काहींना होती. पण भलतेच घडले. त्याचा अंत्यविधी आटोपल्यावर काही वेळातच तिने टापटीप केशभूषा, वेशभूषा केली. पार्सलचे वडे, समोसे मागवले. घरात नेहमीप्रमाणे भगभगीत प्रकाशाच्या ट्युबलाईट्स जळत ठेवल्या. जणू काही घडलेच नाही असा चेहरा करत तिने नेहमी टीव्हीवर बघत असते त्या साऱ्या मालिका त्या संध्याकाळी-रात्रीही मनापासून पाहिल्या. आता यावर तुम्ही काय बोलाल?
असेही जगात घडत असते. माझ्या परिचयातील एका महिलेचा पती दारुडा असल्याने तिने त्याची दारु सोडवण्याचे सारे प्रयत्न व्यर्थ ठरल्यावर मन कठोर करत निर्णय घेतला व दोन मुलग्यांसह सरळ माहेर गाठले. माहेरचेही संवेदनशील असल्याने त्यांनी तिचा सांभाळ केला. कालांतराने तिचा पति अतिमद्यपानामुळे लिव्हर खराब होऊन हे जग सोडुन गेला. पण ही खंबीर राहिली. तितकी कोसळली नाही. पण आयुष्य आणखी परिक्षा घेतच होते. तिचा मुलगा नोकरीत असताना एका विचित्र अपघातात मृत्युमुखी पडला. आता मात्र ही खचून गेली. कारण स्वतःचा पति गमावल्याचे दुःख तिने भोगले होतेच. पण हाताशी आलेला मुलगा जाणं व तरुण सूनेचं पांढरं कपाळ पाहणं आता तिच्या नशिबी आलं होतं. ती पार कावरीबावरी झाली. तिने अनेकांशी बोलणे टाकले. नीटनेटके राहणे सोडुन अजागळासारखी राहु लागली. एकाकाळी टापटीप राहणारी ती हिच का, असा प्रश्न पडावा इतकी ती आपल्याच कोषात राहणारी बनून गेली. मग कालांतराने तिच्या आयुष्यात तिच्या शालेय जीवनातील मित्र-मैत्रीणी पुन्हा आले. त्यांनी तिला समजावले, सावरले, आयुष्य म्हणजे सापशिडीचा, उनपावसाचा खेळ कसा असतो..ते पटवून दिले व आपला खेळ आपल्यालाच कसा सक्षमपणे खेळायचा असतो हेही तिच्या गळी उतरवण्यात ते यशस्वी ठरले. तिने ते मानले व नंतरच्या जीवनात ती आनंदाचा अनुभव पुन्हा नव्याने घेण्यात रमू लागली.
एकमेकांवर खूप प्रेम असलेल्या जोडप्यातील कुणी म्हणे आधी गेला तर उरलेलाही फारकाळ जगत नाही, असे ऐकवणारे अनेकजण मी पाहिले आहेत. पण माझे निरीक्षण काहीसे वेगळे आहे. अनेक स्त्रीपुरुषांचा आयुष्याचा जोडीदार मरण पावला तरी उरलेल्याने आपले राहिलेले आयुष्य केवळ त्याचा शोक करण्यात घालवण्याऐवजी त्या आयुष्याची योग्य ती मौज घेत व्यतीत केले आहे असे मी पाहात आलो आहे. माझ्या परिचयातील एका ज्येष्ठ महिलेचा पति निधन पावल्यानंतरही तिने उर्वरीत आयुष्य विविध विवंचनांवर मात करीत, छंद जोपासत आनंदात घालवले व पतीनिधनानंतरही सुमारे वीस वर्षे व्यवस्थित जगली. समवयस्कांची मंडळं, ज्येष्ठ नागरिकांच्या संस्था, तेथील विविध आयोजने व उपक्रम, प्रवास-भटकंती, मुले-सूना-जावई-नातवंडे यांच्यासमवेत उत्साही वावर यातून सावरणारे कित्येक एकल वृध्द माझ्या पाहण्यात आहेत. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी नवी मुंबईत वास्तव्याला असलेल्या एका मराठी डॉक्टर-साहित्यिकाशी माझा चांगला परिचय होता व आमचे एकमेकांच्या घरी येणे-जाणेही असे. येथील वास्तव्यात त्याची आणखी काही पुस्तकेही प्रकाशित झाली. कालांतराने त्याचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र त्या आधी काही वर्षे त्याचे त्याच्या पत्नी-मुलाशीही फारसे जमत नसल्याचे मी ऐकून होतो. त्याच्या निधनानंतर त्याच्या पत्नीचे सांत्वन करावे म्हणून त्यावेळी ती तिच्या वडीलांकडे राहात असल्याने मुंबईत जाऊन तिची भेट घेतली. पण तिच्या चेहऱ्यावर पतिनिधनाचे कोणतेही दुःख नव्हते. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी तिला बोलते केले. त्यावर ती म्हणाली, ‘जीवंतपणी मला तो प्रेम देऊ शकला नाही, माझ्या व माझ्या मुलाच्या पालनपोषणासाठी लागणारा खर्चही पुरवू शकला नाही. सारखा फिरतीवर असायचा व इकडे देणेकरी मला हैराण करायचे. पैसे परत करता येत नाही म्हणून मग त्या लोकांनी घरातील फ्रीझ, टीव्ही उचलून न्यायला सुरुवात केली. तरीही त्याच्यावर काही परिणाम झाला नाही..तो त्याच्याच बेहोशीत जीवन जगत होता साऱ्या जबाबदाऱ्या टाळून! मग मला आता सांगा अशा माणसाच्या मरणाचं दुुःख धरुन मी का बरे बसू?'
यावर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं.
--राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई