सुवर्णमंदिर राखणारे सेनानी!
हरबक्ष सिंग यांनी भारतीय सैन्यदलात अनेक महत्त्वाच्या जबाबदा-या पेलल्या. इंग्लंडमध्ये जाऊन विशिष्ट सैन्य अधिकारी प्रशिक्षण पूर्ण केले.जर्मनीमध्ये विशेष कामगिरीसाठी ते निवडले गेलेले पहिले भारतीय अधिकारी ठरले होते. चीनने केलेल्या आक्रमणात त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडली. हरबक्ष सिंग साहेबांनी आपल्या सैन्याला आक्रमण करायला प्रेरित केले...जिंकण्याची सवय पुन्हा अंगीकार करायला लावली. आपल्या अलौकिक कार्यकाळात भारतीय लष्करातील जनरल या अतिशय उच्च पद खालोखाल असलेल्या, लेपटनंट जनरल पदावर पोहोचून हरबक्ष साहेब सेवानिवृत्त झाले होते.
अमृतसर म्हणजे अमृताचं सरोवर...या सरोवराच्या जलाशयात सुवर्णमंदिराच्या सोनेरी कळसांची प्रतिबिंबे जणू फुललेली कमलदलं! सुवर्णमंदिर..आदि ग्रंथ साहेबांचे पवित्र स्थान..त्या दिवशीही मत्था टेकवायला येणा-या भाविकांची संख्या काही कमी नव्हती. पण मनात भलतीच भावना ठेवून काही हजार पावलंही अमृतसर शहराकडे आगेकूच करीत होती...त्यांच्या माथ्यांवर रुमाल नव्हते...लष्करी शिरस्त्राणे होती आणि हातात बंदुका...सोबत रणगाडे....ते सुवर्णमंदिरात माथा टेकवायला नव्हते येत...अमृत कायमचे सर करायला येत होते...एखाद्या टोळधाडीसारखे! काही वेळातच ते अमृतसरच्या वेशीवर धडकतील आणि सारं शहर त्यांच्या चामडी बुटांच्या खाडखाड आवाजाने दुमदुमून जाईल यात शंका नव्हती.
लढाईच्या पटावर प्यादी, वजीर, हत्त्ती, घोडे, उंट इत्यादी गरजेनुसार स्थानांतरीत करावी लागतात...तात्पुरती माघार हीसुद्धा एक चालच असते युद्धात काहीवेळा. बुद्धिबळात पटावर राजा असला तरी त्याने कुठे जायचे हे बुद्धिबळ खेळणारा गडी ठरवतो..आणि हा खेळाचा नियमच आहे. पण माणसांच्या लढाईत प्रत्यक्ष आघाडीवर तळहातावर शीर ठेवून उभा असणारा सेनानीच राजा...आपत्कालीन परिस्थितीमध्ये या सेनानीला स्वतःचा विवेक, कर्तव्यपरायणता, मनगटातील बळावर विश्वास आणि सैनिकांच्या काळजातील अग्नि यांची सांगड घालून निर्णय घ्यावा लागतो.....!
मागे सरका...दुस-या दिशेला जा....तिथे थांबून तयारी करा...शत्रू तुमच्या समशेरीच्या आवाक्यात आला की तुटून पडा...असा सेनानीस आदेश प्राप्त झाला होता असे म्हणतात...पण वयाची पन्नाशी पार केलेल्या, अनेक युद्धे लढलेल्या, शत्रूच्या काळकोठडीत कित्येक महिने मृत्यूशी गोष्टी करीत सूर्योदयाची प्रतिक्षा करीत जगलेल्या आणि तिथून परतून पुन्हा देशाच्या सेवेत तितक्याच तडफेने परतलेल्या सेनानीस...हे कसे पटावे! आपले शहर, आपले मंदिर शत्रूच्या जणू हवाली करून गेल्यासारखे माघारी फिरायचे...न लढता? संघर्षात एकच जिंकणार...यावेळी कदाचित तो जिंकणारा म्हणजे आपण नसू...पण लढणारा तरी आपणच असावे...सेनानीने मनाशी निर्धार केला...अवज्ञा करायची वरिष्ठांची...परिणामांना सामोरे जाऊ नंतर...पण आता माघार नाही...ते फिरता बाजूस डोळे..किंचित ओले...सरदार सहा सरसावून उठले शेले...रिकिबीत टाकले पाय...झेलले भाले! अशी स्थिती झाली आणि कृतीही.
जो बोले सो निहाल...सतश्री अकाल! या घोषणा अमृतसरच्या सीमेवर घुमल्या...या सीमेकडे येणारी पावले त्यांच्याच सीमेत जाऊन तिथल्या तिथे छाटली पाहिजेत.....गुरु गोविंदसिंह साहेबांचे शब्द खरे करून दाखवण्याची आणखी एक संधी दैवाने दिली आहे...सव्वा लाख शत्रूंशी केवळ एकटा वीर लढू शकतो...हा विश्वास त्यांनी दिला होता...तो या सेनानीने आणि त्याच्या आदेशापुढे प्राण म्हणजे कःपदार्थ मानणा-या वीरांनी सार्थ ठरवला....१९४७ मध्ये नानकाना साहिब गुरुद्वा-याचे रक्षण करताना काहीशी अशीच स्थिती उत्पन्न झाली होती..असं म्हणतो इतिहास. १९६५ मध्ये अशाच प्रकारची स्थिती उत्पन्न झाली होती...यावेळी स्थितीला उत्तर मात्र अस्सल मिळाले होते....शत्रूला पायांत शेपूट घालून वाट फुटेल तिकडे पळावे लागले!
सुवर्णमंदिराच्या जलाशयात शत्रूच्या हल्ल्याचा एक साधा तरंगही उमटू दिला नाही नरबहाद्दरांनी...सेनानी होते हरबक्ष सिंग! वरिष्ठ आरंभी नाराज झाले होते...परंतु यश प्राप्त झाल्यावर नाराजीची धार कमी झाली असावी...आणि खुद्द लाल ‘बहादूर' पंतप्रधान महोदयांनी या महावीराची पाठ थोपटली...देशाने पद्मभूषण पुरस्काराने गौरवले...पुढे पद्मविभूषण पुरस्कारावरसुद्धा नाव कोरले गेले! हरबक्ष या नावाचा अर्थ आहे...देवाची देणगी..बक्षीस! ही देणगी पंजाबमधील एका अत्यंत श्रीमंत शेतकरी घराण्यात एका मुलाच्या जन्माच्या रूपाने अवतरली. त्यांचे पिताश्री डॉक्टर हरनाम सिंंग हे त्या गावात डॉक्टर झालेले पहिले तरुण ठरले होते. त्यांनी जिंद इन्फंट्री नावाच्या सैन्य पलटणीमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा बजावताना, पहिल्या महायुद्धात सहभाग घेतला होता. १९५२ मध्ये जिंद इन्फंट्री स्वतंत्र भारताच्या सैन्यात पंजाब रेजिमेंट म्हणून जोडली गेली. हरबक्ष सिंग हे डॉ. हरनाम सिंग साहेबांच्या सात अपत्यांतले शेंडेफळ! शालेय जीवनात हरबक्ष हे अभ्यासात आणि खेळांत अतिशय निष्णात होते. हॉकी हा त्यांचा आवडीचा खेळ. १९३३ मध्ये हरबक्ष देहरादूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले आणि १९३५ मध्ये अधिकारी झाले. पहिल्या वर्षी ब्रिटीश सैनिक असलेल्या तुकडीत सेवा बजावल्यानंतर त्यांना भारतीय सैन्य तुकडीत पाठवले गेले. काहीच वर्षांत ते दुस-या महायुद्धात सहभागी झाले आणि जखमीसुद्धा आणि दुर्दैवाने एके दिवशी जपानी सेनेच्या तावडीत सापडून युद्धबंदी झाले. भयावह छळ, उपासमार अवस्थेत त्यांनी जपान्यांच्या कोठडीत काही महिने काढले. त्यातच त्यांना टायफाईड आणि पुढे बेरीबेरी नावाचा अत्यंत दुर्धर आजार झाला. यातून केवळ दैव बलवत्तर म्हणून ते बचावले आणि १९४५ मध्ये अंबाला येथील सैन्य रुग्णालयात आणले गेले. त्यांचे मोठे बंधू लेपट.जन.गुरुबक्ष सिंग हे त्यावेळच्या Indian National Army मध्ये commander होते. हरबक्ष साहेब पुढे १९४७ मध्ये क्वेट्टा येथील स्टाफ कॉलेजमध्ये पुढील प्रशिक्षणासाठी रुजू झाले. भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर अगदी काहीच दिवसांत हरबक्ष सिंग साहेब ईस्टर्न कमांड मध्ये आले. काश्मिरात पाकिस्तानचे सैन्य टोळीवाल्यांच्या वेशात शिरले आणि त्यांनी प्रचंड गोंधळ माजवायला आरंभ केला...अगदी नवख्या असलेल्या भारतीय स्वातंत्र्याला सामोरे जावे लागणारा हा पहिला संघर्ष होता. यातील एका लढाईत आपले Commanding Officer लेपट. कर्नल दिवाण रणजीत राय धारातीर्थी पडले. अशा नाजूक परिस्थितीत हरबक्ष सिंग साहेबांनी commander म्हणून स्वयंस्फूर्तीने जबाबदारी मागून घेतली. परंतु त्यांची १६१, Infantry Brigade चे deputy commander बनवले गेले. आणि ही नवीन जबाबदारी हरबक्ष सिंग साहेबांनी मोठ्या प्रभावीपणे पार पडून दाखवली...अशी की यामुळे त्या युद्धाचे पारडे भारताच्या बाजूस झुकले.
एखादे सैन्याधिकारी जसजसे पदोन्नत होत जातात, तसतसे त्यांच्या गणवेशावर सन्मान-अधिकार दर्शक चिन्हे लावली जातात...त्याला stars म्हणतात...एक ते पाच तारे. ब्रिगेडीअर साहेबांना एक तारा, मेजर जनरल साहेबांना दोन तारे, लेपटनंट साहेबांना तीन,जनरल साहेबांना चार सितारे असतात. आणि फिल्ड मार्शल या सर्वोच्च मानद पदावरील साहेबांना Five stars असतात. अर्थात यातील पहिला सितारा प्राप्त करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते, शौर्य गाजवावे लागते, उत्कृष्ट कामगिरी करावी लागते...पुढील सितारा मिळवायला त्यापेक्षाही जास्त कामगिरी जरुरीची असते... पुढे कारकीर्दीत हरबक्ष सिंग साहेब three stars पर्यंत पोहोचले होते....पण एका प्रसंगामुळे त्यांनी त्यावेळी त्यांनी कमावलेल्या एका सिता-याचा स्वतःहून त्याग केला...ते एक पायरी खाली उतरले...पण त्याला कारणही तसेच घडले...! १२ डिसेंबर, १९४७...१, शिख बटालियनचे सैनिक काश्मीरमध्ये पाकिस्तानी हल्ल्यात मोठ्या प्रमाणात गमावले गेले, फार मोठे नुकसान झाले! हे समजताच हरबक्ष साहेब मोठ्या त्वरेने उरी येथे पोहोचले आणि स्वयंस्फूर्तीने त्यांनी त्या बटालियनचे commander हे पद स्वीकारले...बटालियनचे नेतृत्व करण्यासाठीची अर्हता निराळी असते....म्हणजे उच्चपदस्थ अधिका-यांना खाली येऊन नेतृत्वपदी येता येत नाही बहुदा.....यासाठी त्यांनी आपल्या उच्चपदाचा एक तारा कमी केला असावा, असे वाटते....आणि ते त्या बटालियनचे अधिकारी झाले...हा फार मोठा त्याग समजला जातो...आपल्या सैनिकांसाठी वरिष्ठ पदावरून कनिष्ठ पदावर येणारे अधिकारी विरळाच!
साहेबांनी ती बटालियन श्रीनगर येथे आणली...आणि त्या बटालियनचे पुनर्वसन सुरु केले...एखाद्याच्या पित्याच्या आग्रही, निग्रही आणि प्रेमळ कार्यपद्धतीने त्यांनी ही बटालियन पुन्हा आपल्या पायावर उभी करायला प्रारंभ केला...पण त्यांचे हे काम जेमतेम पूर्ण होते न होते तोच.....हंडवारा खो-याजवळची बर्फाच्छादीत ‘फारकीया की गली ओलांडून पाकिस्तानी सैन्याने हंडवारावर कब्जा केला असल्याची खबर आली! बटालियन संख्येने निम्म्यावर आलेली होती...संख्याबळ अतिशय तोकडे होते...तशाही परिस्थितीत हरबक्ष साहेबांनी शत्रूवर चाल केली...सैनिकांमध्ये स्वतःच्या नेतृत्वाच्या बळावर,स्वतः प्रत्येक मोर्चावर गोळीबाराच्या वर्षावाची पर्वा न करता भेटी देत देत प्रचंड उत्साह निर्माण केला...सवा लाख से एक लडाऊ...हे गुरु गोविंदसिंग साहेबांचे शब्दच जणू त्यांनी आचरणात आणले....हंडवारामधून त्यांनी शत्रूला हुसकावून लावले! ही मोठीच कामगिरी मानली जाते! एक STAR कमी झाला असला तरी युद्धाच्या आकाशात भारताचा विजयी तारा प्रकाशमान झालेला दिसत होता!
यानंतर १९४८ मध्ये साहेबांना ब्रिगेडीयरपदी बढती मिळाली आणि १६३, Infantry मध्ये जबाबदारी दिली गेली आणि शत्रू जिथून आपल्याविरुद्ध कारवाया करतो ते तिथवाल हे ठिकाण ताब्यात घेण्याचे आदेश दिले...केवळ सहाच दिवसांत साहेबांनी फत्ते मिळवली...पण ही कामागिरी अत्यंत कठीण होती...शत्रू ताकदवान होता. साहेबांचे पायदळ सैन्य अत्यंत आवेशाने आणि वा-याच्या वेगाने, कठीण डोंगर पार करीत, अकरा हजार फूट लांबीची निमुळती खिंड रात्रीच्या अंधारात पार करून पाकिस्तानी सैन्याच्या उरात धडकी भरवणारी गर्जना करीत पोहोचले...शत्रूने स्वप्नातही कल्पना केली नव्हती की इतक्या वेगाने हल्ला होईल...शत्रू दाही दिशांना पळू लागला. पाकिस्तानी सैन्य सैरावरा झाले..माघारी पळाले. पण पुन्हा चालून आले. तोवर साहेबांनी मोर्चे अत्यंत मजबूत करून ठेवले...शत्रूच्या गोळीबाराची पर्वा न करता साहेब प्रत्येक सैन्य-खंदकात स्वतः पायी जात, प्रत्येक सैनिकाला प्रोत्साहित करीत...आपले इतके बडे अधिकारी प्रत्यक्ष लढाईच्या मोर्चावर सर्वांच्या पुढे उभे असलेले पाहून सैनिकांना त्वेष चढत असे! या कामगिरीसाठी हरबक्ष सिंग साहेबांना वीर चक्र पुरस्कार प्रदान केला गेला!
हरबक्ष सिंग साहेबांनी पुढे अनेक महत्त्वाच्या जबाबदा-या लीलया पेलल्या. इंग्लंडमध्ये जाऊन विशिष्ट सैन्य अधिकारी प्रशिक्षण पूर्ण केले. जर्मनीमध्ये विशेष कामगिरीसाठी ते निवडले गेलेले पहिले भारतीय अधिकारी ठरले होते. नंतरच्या काळात त्यांनी चीनने केलेल्या आक्रमणात त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडली. या युद्धाचा परिणाम भारतासाठी फारसा सकारात्मक ठरला नाही. सैन्याचे मनोबल काहीसे खालावलेले होते! हरबक्ष सिंग साहेबांनी आपल्या सैन्याला आक्रमण करायला प्रेरित केले...जिंकण्याची सवय पुन्हा अंगीकार करायला लावली...आणि ही सवय आजही कायम राहिली आहे आपल्या सेनेत. आपल्या अलौकिक कार्यकाळात भारतीय लष्करातील जनरल या अतिशय उच्च पद खालोखाल असलेल्या, लेपटनंट जनरल पदावर पोहोचून हरबक्ष साहेब सेवानिवृत्त झाले.
अमृतसर येथील सेन्ट्रल सीख संग्रहालयात शिखांचे सर्व गुरु साहेब, संत, शूरवीर इत्यादी अनेकांच्या तसबिरी, स्मृतीचिन्हे जतन करून ठेवली आहेत...या संग्रहालयातील एका भिंतीवर हरबक्ष सिंग साहेबांचे तैलचित्र मोठ्या सन्मानाने लावण्यात आले आहे...हा एक मोठा पुरस्कारच म्हणावा लागेल! १४ नोव्हेंबर, १९९९ रोजी साहेब ज्योती ज्योत सामावले गेले...गुरुंनी दाखवलेल्या शौर्याच्या मार्गावर चालत त्यांनी देशसेवा बजावली....भारत देश नावाच्या ‘सुवर्णमंदिरा ची राखण केली! वाहे गुरु दा खालसा...वाहे गुरु दी फतेह...जय हिंद, साहब! - संभाजी बबन गायके