कानिफनाथ ट्रेक : कष्टाचा देव  

आम्ही कानिफनाथ गडाच्या शिखरावर पोहचलो होतो! नयन मनोहारी दृश्य डोळ्यात भरून घेत होतो! कठीण चालण्याच्या परिश्रमातून शांतीच्या भक्ती मंदिरात पोहचलो होतो! मन प्रसन्न झाले होते! ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी घाम गाळावा लागला होता! परिश्रम खूप असतात! आम्ही ऊर्जा भरण्यासाठी गेलो होतो!

  एप्रिल महिन्याचा सूर्यप्रसाद स्वीकारून वाटचाल सुरू होती! लाहीलाही, चटका, भाजणे, उन्हाचा कडाका हा सर्व प्रसाद आहें सूर्यदेवाकडून मिळालेला! आनंदाने, निमूटपणे प्राप्त झालेला हा प्रसाद ऋतुबदलाची ग्वाही देत असतो! पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हे प्राकृतिक आहेत! निसर्गाचा अविष्कार आहें! त्यातून गेल्यावरचं परिवर्तन कळत असतं! बदल कळत असतो! बदल निसर्गाचा नियम आहें! तिखट, खारट, गोड, आंबट चवीला जसे असतात, तसेंच जगण्यासाठी ऋतुबदलाची शृंखला जोडली आहें! माणूस या बदलांचा स्वीकार करून मार्गक्रमण करीत असतो! नैसर्गिक बदल सत्कृतीचा हिस्सा असतो! बदल चंचल मनाला व्यस्त ठेवणारी प्रक्रिया आहें! माणसाने आनंदाने, धाडसाने ही आव्हानं स्वीकारली तर जीवनात सुखकर मार्गक्रमण होत राहातं!

  १३ एप्रिल २०२५च्या ब्रम्हपहाटे उन्हाळ्यात हिवाळा अनुभवतं होतो! दिवसभर आग ओकणारा सूर्यदेव रात्रनिद्रेत होता! शांत, एकांत पहाट गारव्यात फिरण्यातील वेगळीच अनुभूती असते! स्वर्गानंद असतो! आम्ही पहाटे कानिफनाथ ट्रेकिंगसाठी घरून निघालो होतो! पुण्याच्या होळकरवाडीमार्गे आम्ही ट्रेकिंगला गेलो होतो! आदल्या दिवशी हनुमान जयंती असावी! चंद्र पश्चिमेंच्या उतारावर होता! आकाश निरभ्र होतं! चंद्र पूर्णतः गोलाकार होता! चंद्र प्रकाशाने पाहत उजळली होती! चंद्र धरतीला शीतलता प्रदान करीत होता!

 आम्हास मंद, धुंद चंद्रप्रकाशाला थंड गारव्याची साथ लाभली होती! आमची मोटरसायकल पळत होती कानिफनाथ ट्रेकसाठी! आश्चर्य म्हणजे गुलाबी थंडीचा सुखद अनुभव घेत कानिफनाथ गडाच्या पायथ्याला जाऊन पोहचलो होतो! उन्हाळ्याच्या पहाटे गुलाबी थंडीचां अनुभव म्हणजे वेगळाचं आनंद देऊन गेला होता! पायथ्याशी पोहचून आम्ही आमच्या नेहमीच्या शैलीत चढाईला सुरुवात केली होती! पूर्वेच्या झुंजूमुंजू उजेडाकडे पाहत होतो! पश्चिमेला चंद्र धरतीला स्पर्श करण्यास आतुर झाला होता! नेहमीपेक्षा चंद्रगोल मोठा होता!एकाच वेळेस दोन दिशा उजळू पाहत होत्या! पूर्व अन पश्चिम क्षितिज निसर्गदानास आतुर झाले होते! पायाखालचां खडकाळ रस्ता रखरखीत होता! चढाई मार्गावर दगडगोटे जागोजागी पडलेले दिसत होते! त्यांना टाळत कानिफनाथ गडाकडे निघालो होतो!

  चढाईला सुरुवात केली होती तशी थंडी आम्हाला सोडून दूर जाऊ लागली होती! दूर पोबारा करून जात होती! चालण्यामुळे घाम अंगाला चिकटू पाहत होता! दोन्ही पायांचें भाता पळत होतें! गूढघ्यानां जोर देत रस्ता चढाई सुरू होती! चालतांना दम लागत होता! हळूहळू चंद्र मावळतीला गेला! पूर्व क्षितिजाला पिवळा रंग उजळून निघाला होता! आमचं चालणं थांबलं नव्हतं! धमनीत श्वास भरून पायांचे यंत्रे पळत होती! नागमोडी वळणदार चढ घाम काढीत होता!

  उद्दिष्ट नजरेच्या टप्प्यात येऊ लागलं होतं! दुरूनच हळूहळू उद्दिष्ट शिखराचं दर्शन झालं होतं! चालणे अन अंगावर येणाऱ्या चढावरं चालण्यातून शरीराचं प्रचंड घुसळण होत असतं! त्यातून शरीर शुद्धीकडे वाटचाल सुरू होते! घुसळण मनाच्या, शरीराच्या आतील नकोसे तें सर्व काढून टाकण्यास मदत करीत असतं! घुसळण होण्यासाठीचं ट्रेकिंग साधन साध्याकडे नेत असतं! आम्ही घामाघूम होत साध्यापर्यंत पोहचत होतो! उन्हाळ्यात सूर्यदेव लवकर उगवत असतो! पूर्व क्षितिजातून लालसर ललिमा दिसू लागली होती! ती लालिमा हळूहळू वर येत होती! निसर्गाचा चमत्कार नजरेतून हृदयात ओढून घेत होतो! साक्षात सूर्यनारायणाचं दर्शन झालं होतं!

   आम्ही कानिफनाथ गडाच्या शिखरावर पोहचलो होतो! नयन मनोहारी दृश्य डोळ्यात भरून घेत होतो! कठीण चालण्याच्या परिश्रमातून शांतीच्या भक्ती मंदिरात पोहचलो होतो! मन प्रसन्न झाले होते! ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी घाम गाळावा लागला होता! परिश्रम खूप असतात! आम्ही ऊर्जा भरण्यासाठी गेलो होतो! आम्ही कानिफनाथ गडावर अमृतकुपी घेण्यास गेलो होतो! आरोग्य घुटी घेण्यास गेलो होतो! कष्टाचा देव देहांतरी ठेवून माघारी फिरलो होतो! - नानाभाऊ माळी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

शक्तीला भक्तीची जोड असेल, तर विजय निश्चित!