आंतरजातीय विवाहाबाबत कोकण आघाडीवर

शासकीय स्तरावर आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली गेली आहे. पण खोट्या प्रतिष्ठेला चिकटलेला समाज बुरसटलेली विचार श्रेणी सोडायला तयार नाही. महाराष्ट्रातील कोकण विभाग या बाबतीत काकणभर उर्वारित महाराष्ट्रातील विभागांना मागे टाकतो. कोकणात आंतरजातीय विवाहांना विरोध होतो, पण सौम्य प्रमाणात!  मुलामुलींची आवड जपण्याचा प्रयत्न होतो. मुंबईत कामधंदा नोकरी निमित्त एकत्र आलेले तरुण तरुणी ओळखीतील जोडीदाराला पसंती देतात. यामुळे सामाजिक सलोखा राखला जात आहे.  हे कोकणातील लोकांचे पुढचे पाऊल म्हणता येईल.

सोमवार, १९ मे २०२५ रोजी माझ्या विद्यार्थ्याच्या भावाचे व आमच्या समाजातील चळवळीत काम करणाऱ्या बौद्ध कुटुंबातील मुलाचे लग्न होते. सुट्ट्यांमध्ये लग्न असल्यानेकाहीही घाई नव्हती. पत्रिकेवर टाकलेली लग्नाची वेळ दुपारी १.०० वाजताची होती. उन्ह-पाऊसाचा खेळ चालू असल्याने गर्मी भरपूर प्रमाणात होती. लग्नस्थळ आमच्या घरापासून जास्त लांब नव्हते म्हणून टु व्हीलर वर मी व सौ. मीनाक्षी जायला निघालो. सावकाश गाडी चालवत बरोबर दहा मिनिटे अगोदर  हॉलच्या बाहेर पोहचलो. गाडी पार्क करतांना बऱ्याच गाड्यांचा ताफा दिसत होता. तसेच मोठी बस दिसत होती. यावरून आम्ही अनुमान काढले की वेळेत लग्न लागणार व आपण लवकर घरी जाणार. या विचारात हॉलच्या प्रवेशद्वारावर आम्ही पोहोचलो.

हॉलमध्ये खूप शांत वातावरण होते. पुढे स्टेज वर काही विधी चालू होत्या. हे दृश्य पाहून आम्हाला चुकीच्या ठिकाणी आलो की काय?  असे त्या क्षणी वाटले. तसा प्रश्न सौ. मिनाक्षीने मला विचारलाही. हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक होते. मी हॉलमध्ये इकडे-तिकडे नजर फिरवली तेव्हा काही मंडळी ओळखीची दिसली. पण बौद्ध परिवारातील कोणीही दिसत नव्हते. अशा अवस्थेत उभे असतानाच एक ओळखीतील मित्र भेटले व त्यांनी आमच्या मनात एवढा वेळ चाललेले  द्वंद्व थांबवले. त्यांनी सांगायला सुरुवात केली की, हे आंतरजातीय लग्न आहे. नवरी मुलगी हिंदू कुटुंबातील असल्याने त्यांचे हिंदू धर्मानुसार दु. १२.०० वाजता लग्न लागले आहे. त्यांच्या प्रथेनुसार हा कन्यादान करण्यासाठीचा विधी चालू आहे. त्यामुळे आपण बसून घ्यावे, असा सल्ला त्यांनी आम्हाला दिला. आमच्याकडे बसण्यापलिकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. कारण बाहेर कडक उन्ह होते. हॉलचे छत खूप उंच असल्याने पंख्याची हवा खाली पोहचत नव्हती तरीही गप्प बसणे पसंत केले.

थोड्याच वेळात हा कन्यादान विधी संपला. तेव्हा वाटले आत्ता आपले बौद्ध पद्धतीचे लग्न वेळेत चालू होईल. पण कसले काय?  आयोजकांकडून आमच्याकडे बसण्यापलिकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. उपस्थिंतांसाठी जेवणासाठीची घोषणा केली गेली. तोपर्यंत एक वाजून वीस मिनिटे होऊन गेली होती. जेवणानंतर सावकाश दोन वाजता बौद्ध विधीला सुरूवात झाली. दरम्यानच्या काळात बरीच मंडळी रिप्लेस झाली होती. हिंदू समुदायातील वर्हाडी व निमंत्रित घाईत असलेली मंडळी  निघून गेले होते व बौद्ध धर्मानुसार निमंत्रित मंडळी तेथे दिसायला लागली होती. ह्या पुर्ण वेळात माझ्या डोक्यात मात्र वेगळाच खेळ चालू होता. कारण काही दिवसांपूर्वीची महाराष्ट्र राज्यातील घटना आठवली. महाराष्ट्र राज्य जे स्वतःला फार पुरोगामी समजत आलेले आहे. याच राज्यातील समुदायाकडून आंतरजातीय विवाहातून होणाऱ्या हत्या खोलवर रुजलेल्या जातीच्या समस्यांची एक भयानक आठवण करून देतात.  पुणे जिल्ह्यात स्वतःला उच्चवर्णर्ीय समजणाऱ्या समाजातील मुलीशी लग्न करणाऱ्या एका दलित मुलाची मुलीच्या  कुटुंबातील सदस्यांनी निर्घृण हत्या केली. ही घटना भारतातील आंतरजातीय विवाहांशी संबंधित ऑनर किलिंगच्या चालू समस्येवर प्रकाश टाकते. नागराज मंजुळे यांनी आणलेला सैराट चित्रपट आंतरजातीय कथानकांवर आधारित होता. त्या चित्रपटातील शेवट आजही समाजाला विचार करायला लावणारा आहे. उपलब्ध आकडेवारी नुसार २०१७ ते २०१९ दरम्यान, भारतात ऑनर किलिंगच्या १४५ घटना नोंदवल्या गेल्या आहेत व  त्यापैकी १९ घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत.  झारखंडमध्ये सव्रााधिक ऑनर किलिंगच्या ५० घटना घडलेल्या आहेत. त्यानंतर  उत्तर प्रदेशमध्ये अशा १४ घटना घडलेल्या आहेत.

या सर्व घटनांमध्ये अनुसूचित जाती समुदायातील बळींची संख्या लक्षणीय प्रमाणात  आढळली आहे. भारत सरकारद्वारा संविधानिक  अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९, व्यक्तींना जाती-आधारित अत्याचारांपासून संरक्षण देतो. विशेषविवाह कायदा, १९५६, आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता देतो. पण तरीही या भयानक घटना समाजामध्ये घडत आहेत. मानवी हक्क संरक्षण (सुधारणा) कायदा,२००६, वैयक्तिक हक्कांचे रक्षण करतो आणि मानवी हक्क आयोगांना प्रोत्साहन देतो. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी  देशात डॉ. आंबेडकर योजना अंतर्गत, अनुसूचित जातीच्या वर्गातील किमान एक जोडीदार असलेल्या आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून २.५ लाख रु. प्रदान करते. ( सध्या ह्या योजनेतंर्गत केंद्रशासनाने अनुदान देणे बंद केले आहे.) महाराष्ट्र सरकारने आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सरकारी अतिथीगृहांमध्ये सुरक्षित घरे उभारली आहेत. म्हणजे शासकीय स्तरावर आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली गेली आहे. पण खोट्या प्रतिष्ठेला चिकटलेला समाज बुरसटलेली विचार श्रेणी सोडायला तयार नाही. महाराष्ट्रातील कोकण विभाग या बाबतीत काकणभर उर्वारित महाराष्ट्रातील विभागांना मागे टाकतो. आंतरजातीय विवाहांना विरोध होतो, पण सौम्य प्रमाणात होतो. मुलामुलींची आवड जपण्याचा प्रयत्न होतो. मुंबईत कामधंदा नोकरी निमित्त एकत्र आलेले तरुण तरुणी ओळखीतील जोडीदाराला पसंती देतात. यामुळे सामाजिक सलोखा राखला जात आहे. माझ्या ओळखीतील बरीच जोडपी आहेत, जी गुण्यागोविंदाने संसार करीत आहेत. हे कोकणातील लोकांचे चांगले वैशिष्ट्य म्हणता येईल. अशा लग्नाला विरोध न करता प्रोत्साहन दिले जात आहे. हे शाश्वत परीवर्तन म्हणता येईल. शेवटी नव वधूवरांना स्टेजवर जावून आम्ही वधूवरांना शुभाशिर्वाद देले व परत घरी निघालो. - डॉ. श्रीकृष्ण दि. तुपारे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

संस्कार शिक्षणाचे : सामाजिक अंग अधोरेखित करणारा ग्रंथ