संस्कार शिक्षणाचे : सामाजिक अंग अधोरेखित करणारा ग्रंथ

अनिल कुलकर्णी ह्यांचे पुस्तकांच्या पलीकडे हे पुस्तक मुले, पालक व कुटुंब यांच्यातील समन्वयाचा सेतू बांधणारे आहे. सद्य परिस्थितीत पालकांनी मुलांना समजून घेतांना ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते. नवी पिढी नव्या उमेदीने पुढे जात असतांना अनेक अडथळे येत असतात. त्या अडथळ्यामुळे मुलांचे आयुष्य बिघडण्याची शक्यता असते. ती शक्यता मुलांना व पालकांना समजून सांगण्याचे हे लेखमाला तंत्र उत्तम झाले आहे. त्यातून आकारास आलेले पुस्तक एक मार्गदर्शक ठेवा म्हणून संग्रही ठेवण्यासाठी उत्तम आहे.

आज जीवनाकडे बघण्याची प्रत्येकाची दृष्टी बदललेली आहे. मनुष्यांच्या गरजा वाढलेल्या आहेत. माध्यमांच्या जाळ्यात अडकलेला आज प्रत्येकजण झटपट श्रीमंत होण्यासाठी धावपळ करत आहे. त्यामुळे मूल्य पायदळी तुडविले जात आहेत. आज प्रत्येक घडीला मूल्याधिष्ठित समाजव्यवस्थेचा ऱ्हास होताना दिसत आहे. नवीन पिढी वास्तववादी सकारात्मक रोल सोडून रिल व दिखाव्याच्या रोलमध्ये अडकलेला आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर कौटुंबिक संस्थेबरोबर सामाजिक संस्थेचे महत्वाची ठरते. त्याचबरोबर पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव देणारे शिक्षण महत्त्वाचे ठरते. नवं, मोठं आणि वेगळं कांही करायचे असेल तर शिक्षणाबरोबरच संस्कार महत्त्वाचे असतात असा संदेश देणारे पुस्तक म्हणजे ‘पुस्तकांच्या पलीकडे' हा डॉ. अनिल कुलकर्णी यांचा ग्रंथ होय.

      लहान वयात मुलांमध्ये मूल्य रुजविण्याचे काम शाळेबरोबर आईवडील यांचेही असते. शिक्षण बदलले आहे. काळाचे संकल्प व संकल्पना बदलल्या आहेत.काळानुरूप शाळा व पालक यांनाही बदलावेच लागेल. समाज व बाहेरील जग माणसाला खूप कांही शिकवून जाते. ते शिक्षण पुस्तकातून मिळत नाही. ते प्रत्यक्ष अनुभवातून मिळते. निसर्ग, समाज, माणूस, मित्र, सण व अनेक संस्कृती यातून अप्रत्यक्ष भरपूर शिकायला मिळते. म्हणून त्या सगळ्या चाकोरीबाहेरील शाळा आहेत. त्या शाळांचे चाकोरीबद्ध शाळेपेक्षा वेगळे वैशिष्ट्य असते. ते चाकोरीबद्ध परावलंबित्व दूर करणाऱ्या सामाजिक संस्था आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन झाले पाहिजे असे वाटते. अब्राहम लिंकन यांचे हेडमास्तरास पत्र आपणाला प्रत्येक शाळेतून वाचायला मिळते. त्यात मुलांच्या अनेक पैलू समजून घेऊन त्यास चाकोरीबद्ध शिक्षणाबरोबरच चाकोरीबाहेरचे शिक्षण देण्याचे आवाहन लिंकन यांनी केले आहे. तसेच सानेगुरुजी यांनी श्यामच्या आईने शामला दिलेले संस्कार शिकवण ही अजरामर आहे. तसे अनुभवातून दिलेले पुस्तकाच्या पलीकडचे शिक्षण श्यामच्या आईसारखे अनेक पिढ्या समृद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरते.असा एकंदरीत संदेश या पुस्तकांतून पुढे येतो.

वेळेचा महिमा फार मोठा आहे. वेळ ही प्रत्येकाला शिकवत असते. अनुभवातून मिळालेला धडा अविस्मरणीय असतो. ते शिक्षण चिरकाल टिकणारे असते. असं म्हणटलं जातं की, "आपण मेल्याशिवाय देव दिसत नाही. काम केल्याशिवाय आयते कांहीही मिळत नाही. जसे कराल तसेच उभराल.” ही सगळी सत्य अनुभवातून पुढे आलेले आहे. पुस्तकाच्या पलीकडे जे कांही मिळते ते फक्त आणि भक्त अनुभवाच्या शाळेतून मिळते. पुस्तकाच्या पलीकडे जी शाळा आहे त्या शाळेतून मुलं घडत असतात,त्यांचा उत्कर्ष होत असतो. त्यांच्या अनुभवविर्श्व समृद्ध होत असते. म्हणूनच अनिल कुलकर्णी यांनी मांडलेले विश्व पालक व बालक यांच्यासाठी प्रबोधनपर आहे. हे ह्या पुस्तकाचे मोठे बलस्थान आहे. कांही माणसाने समाजात रूजवलेली मूल्य खूप प्रभावी असतात. त्या मूल्यांवर अनेक पिढ्या जगत असतात.  स्वतःचे जीवन हेच एक संदेश असला पाहिजे हाच भाव अनेक पिढ्यांना समृद्ध करुन जातो.

आपण कोण आहोत? हे जर आपणाला लवकर कळले तर आपण आपल्या आयुष्यात निश्चित यशस्वी होतो. मनात ज्या कांही अनावश्यक गोष्टी आहेत त्या काढून आवश्यक गोष्टींकडे लक्ष दिले तर आपण लौकिकतेकडे पोहचू शकतो. मनोव्यापारातून मनोविकार जन्माला येतात. तेच मनोविकार माणसाला अपयश देऊन जात. मनाने मनाशी मनमोकळेपणाने केलेला उन्नतीचा संवाद म्हणजे यश होय. असा संदेश मन कल्लोळ या लेखातून लेखकांनी दिलेला आहे. पुस्तके वाचून उपचार करता येत नाहीत.

 भरकटलेल्या माणसांच्या मनाला संवादातून व मनोवादळातून जाग्यावर आणावे लागते. त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा करून अनेक वेदनादायी गोष्टींचा निचरा करावा लागतो. या सगळ्या गोष्टी पुस्तकातून करता येत नाहीत असे मनोविकार हॉस्पिटलचे डॉ. ज्ञानराज चौधरी म्हणतात हे ‘संवाद या लेखातून वाचायला मिळते. ते सत्य आहे. गणित हा विषय बऱ्याच मुलांना नकोसा वाटतो. त्यामुळे मुले शिक्षणापासून दूर जातात. अशा मुलांसाठी अंकनाद गणिताची सात्मीकरण प्रणाली विद्यार्थ्यांना गणिताशी घट्ट मैत्री बनवते. गणित हा विषय सर्व शाखांची जननी आहे. जीवनातील प्रत्येक व्यवहार गणिताशिवाय पूर्णत्वास जात नाही. देवाण घेवाण, आकडेमोड, दूर-जवळ, लहान मोठे, तुलना, रास, खंडी, पेंढी, पायली व मन यासारखे गणित व्यवहारात आपण शिकलेले असते. पण आपण शालेय गणितापासून दूर पळतो आहोत.त्यासाठी गणित व्यवहारातून, मनोरंजक पद्धतीने, उदाहरण यातून अंकनाद सात्मीकरण प्रणालीद्वारे मुलांपर्यंत पोहचले पाहिजे असे मत अंकनाद या लेखातून लेखकांनी मांडले आहे.  एकंदरीत मेंदूचा व्यायाम फक्त गणितातूनच होतो. म्हणून गणिताचे लेखकांनी अधोरेखित केलेले महत्त्व मोलाचे वाटते.

 या पुस्तकात अनेक लेख आहेत. त्या प्रत्येक लेखातून कांहीतरी वेगळं शिकायला मिळते. मुलांचे आयुष्य घडविण्यासाठी प्रेरक गोष्टी प्रेरणादायी ठरतात. अनेक उदाहरणे नवीन उमेद टाळण्यासाठी प्रोत्साहित करतात. आयुष्यात शिक्षणापेक्षा यशस्वी होण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यासाठी डोळस साक्षात्कार महत्वाचा आहे. तो साक्षात्कार या पुस्तकातून मिळतो. हे पुस्तक बालकाबरोबर पालकांसाठी महत्वाचे आहे.डॉ. अनिल कुलकर्णी यांच्या या ग्रंथाचे संस्कारी शिक्षणाचे चाकोरीबाहेरील मार्ग सांगणारा ग्रंथ म्हणून वाचकाला महत्वाचा वाटतो.

 पुस्तकांच्या पलिकडचे लेखकः डॉ अनिल कुलकर्णी
प्रकाशनःशब्दान्वय , मुंबई मुखपृष्ठः चंद्रशेखर बेगमपुरे
पृष्ठेः१७५ किंमतः३५०/-
-व्यंकटेश सोळंके 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वाढदिवस आणि बायकोकडून सरप्राईज गिपट