असंच हवं नवरा-बायकोचं नातं...

नवरा-बायको म्हणजे खरंतर एक सुंदर नातं. वयात आल्यानंतर घरच्यांनी मुलगा-मुलगी बघून त्यांचं लग्न लावून देणं ही एक परंपरा असली, तरी त्यामागे दोन जीव एकत्र येऊन संसार नावाच्या सुंदर गोफात गुंफावेत, हा खरा हेतू असतो.

मुलगी लहानपणापासून वडिलांच्या छायेत वाढते. पण लग्नानंतर ती आपलं सर्व काही मागे ठेवून एका नवीन घरात - परक्या माणसांत येते. एक अपरिचित पुरुषच तिचं सर्वस्व होतो. ती त्याला आपला संसारसखा मानते, खांद्याला खांदा लावून उभी राहते. तिच्या आयुष्यात सर्वात श्रेष्ठ नातं बनतं - तिच्या पतीचं.

पती-पत्नीचं नातं प्रेम, समजूत आणि एकमेकांच्या भावनांचा आदर यावर टिकतं. एकमेकांच्या मनाचा विचार केला जातो, सुख-दुःख समान वाटून घेतलं जातं. संसार सुखाचा ठेवायचा असेल, तर राग, मतभेद आले तरी समजूतदारपणे हाताळणं गरजेचं असतं. एकाला राग आला, तर दुसऱ्याने तो सावरावा - हाच खराखुरा आधार असतो.

    पत्नीला पतीकडून प्रेम, काळजी, सन्मान आणि समजून घेणं याची अपेक्षा असते. नवऱ्याने चांगल्या गोष्टींचे थोडेसे कौतुक करावे ही अपेक्षा असते. भांडण झालं तरी रात्र झाली की नवऱ्याने प्रेमाने, दोन गोड शब्दांनी तिचा राग दूर करावा, हेच तिचं खरं सुख असतं. ती स्त्री - जिला आई-वडील, भाऊ-बहीण यांचं सर्व काही मागे टाकून यावं लागलेलं असतं - तिचं सगळं जग तिच्या नवऱ्यात सामावलेलं असतं. नवरा तिच्यासाठी सर्वात श्रेष्ठ, सारेकाही असतो.. नवऱ्याने बायकोलाही थोडा वेळ देऊन अलगद मनाला प्रेमस्पर्श व्हावा हीच तर इच्छा असते.

"संपूर्ण जग विरोधात असलं, तरी माझा नवरा माझ्या पाठीशी आहे,” ही भावना तिला जगण्याची प्रेरणा देते. तिला धन-दौलत नको असते, फक्त त्याचं प्रेम हवं असतं  निरपेक्ष, निस्सीम प्रेम. हेच पतीलाही वाटतं. त्यालाही पत्नीने आपल्यावर प्रेम करावं, आदर द्यावा, आपल्या भावना समजून घ्याव्यात, अशी अपेक्षा असते.

त्यामुळे हे नातं अधिक दृढ व्हावं, यासाठी संवाद आवश्यक असतो. एकमेकांना विश्वासात घेऊन सगळं मोकळेपणाने सांगितलं पाहिजे. संवादातूनच मतभेद मिटतात, विश्वास वाढतो आणि नातं घट्ट होतं.

पती-पत्नीमध्ये वाद झाल्यास तिसऱ्या व्यक्तीला त्याचा गैरफायदा घेता येऊ नये, याची जाणीव दोघांनी ठेवली पाहिजे. छोटे मोठे मतभेद प्रत्येक नात्यात होतात, पण त्यातून "घटस्फोट” हा पर्याय लगेच समोर येतो, ते चुकीचं आहे. एखादा प्रसंग, एखादा क्षण  तो नातं तोडण्याचा आधार होऊ नये.

घटस्फोटानंतर खरंच सर्व काही सुरळीत होतं का? की केवळ संवादाअभावी नातं मोडलं, याचं दुःख अधिक खोल जातं? प्रत्येक अडचणीचा उपाय प्रेम, समजूत आणि संवादातच असतो. एकमेकांच्या भावना समजून घेतल्या, तर कोणतीही समस्या लहान वाटते. संपूर्ण जग विरोधात असलं, तरी जर नवरा किंवा बायको एकमेकांच्या पाठीशी उभे असतील - तर तोच खऱ्या अर्थाने ‘जग जिंकल्याचा' क्षण असतो!!  - सौ. नेहा विलास मनुचारी 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आपले हीत न करी लोकिकी । तो जाणावा आत्मघातकी