आपले हीत न करी लोकिकी । तो जाणावा आत्मघातकी

महानुभाव संत सज्जनांच्या शब्दाकडे दुर्लक्ष करणारा व नामस्मरण टाळणारा मनुष्य अत्यंत क्षुद्र आहे असे समर्थ म्हणतात.कारण त्याला आपल्या बहुमोल नरदेहाची किंमत कळलेली नाही. महाभाग्याने मिळालेला मानवदेह मोक्षाचे द्वार आहे.जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचे साधन आहे. भगवंत प्राप्तीसाठी तो वापरावा हेच अपेक्षित आहे. तसे न करता संसारातील पदार्थांच्या प्राप्तीसाठी आणि उपभोगासाठी वापरला तर तो नरदेहाचा आत्यंतिक दुरूपयोग आहे आणि नरजन्माचा नाशही आहे.

न ये राम वाणी तया थोर हाणी।
जनी वेर्थ प्राणी तया नाम काणी
हरिनाम हे वेदशास्त्री पुराणी।
बहू आगळे बोलिली व्यासवाणी । श्रीराम ९०।

भगवंताच्या प्राप्तीसाठी अंतःकरण शुद्ध हवे. आहाराच्या शुद्धतेचा अंतःकरणावर सरळ सरळ परिणाम होतो. भोजनसमयी केलेल्या नामस्मरणाने आहारशुध्दी होते. हा मुद्दा मागच्या श्लोकात समर्थांनी सांगितला. दिवसरात्र प्रपंचात गुंतलेल्या माणसाला नामस्मरण हा फुकटचा, कोणतेही नियम-बंधन नसलेला सुलभ उपाय सांगून समर्थंनी मोक्ष प्राप्तीचा सोपा मार्ग सांगितला. भगवंताचे नामस्मरण कोणत्याही वेळी, कोणत्याही स्थळी, कोणत्याही परिस्थितीत, मोठ्याने अथवा मनात कसेही करता येते. इतकी सगळी सुलभता, लवचिकता असुनही जर मनुष्याच्या मुखात रामाचे नाम येत नसेल तर त्याच्या आयुष्याची फार मोठी हानी होत आहे हे त्याने लक्षात घ्यायला हवे.

 तो व्यर्थच मानवाच्या जन्माला आला. कोणत्याही क्षुद्र कीटकाच्या जन्माला आला असता तरी काही फरक पडला नसता. स्वामी वरदानंद भारती म्हणतात, "केवळ श्वासोच्छ्‌वास करतो म्हणून त्याला प्राणी म्हणायचे असेल तर म्हणावे. लोहाराचा भाताही श्वासोच्छ्‌वास करतो. तो प्राणी नाही. पण उपयुक्त असतो. नामोच्चार न करणाऱ्या मनुष्याची काही उपयुक्तताही नाही. त्याला प्राणी ऐवजी ‘काणी' म्हटले पाहिजे. ‘काणी' म्हणजे जंतूसंसर्गाने विषारी होऊन काळा पडलेला जोंधळा. जो कामाचा तर नसतोच, उलट अपायकारक असतो.” ज्या माणसाच्या मुखात भगवंताचे नाम येत नाही तो अत्यंत क्षुद्र, कुचकामाचा, अती हीन असून व्यर्थ जन्माला आला असे समर्थ ह्या श्लोकांत म्हणतात. नामाचे महात्म्य सर्व वेद, शास्त्रे, पुराणे यांतून सांगितले आहे. हरिपाठात ज्ञानेश्वरमाऊली म्हणतात,

"चहूवेदी जाण षट्‌शास्त्री कारण। अठराही पुराणे हरिसी गाती”(२-१) स्वानुभव सांगताना माऊली म्हणतात, "हरी हरी हरी हा नित्यपाठ मी केला, त्यामुळे सगुण साकार हरी हाच वैकुंठ परमात्मा आहे याचा मला अनुभव आला. अणुरेणूत श्रीहरीच भरून राहिला आहे हे मला प्रत्यक्ष दिसू लागले”. भगवान व्यास महर्षिंनी अपौरुषेय वेदांतील ज्ञान आणि ज्ञान प्राप्तीचे मार्ग पुराणांमधून सुलभ करून सांगितले. तीच व्यासवाणी पुढे अनेक संतांनी त्या त्या काळच्या भाषेत अधिक सोपी करून लोकांपुढे मांडली. दुधावर संस्कार करून, त्याचे दही झाले की ते घुसळून जसे साररूप लोणी काढले जाते तसेच वेदांतील सर्व ज्ञानाचे विचारमंथन करून संतांनी त्याचे सार म्हणजे लोणी आपल्यासमोर ठेवले. ते नवनीत म्हणजेच ”नाम”. सर्व काळातील सर्व संत महात्म्यांचे हे एकमत आहे की एकच परमात्मा सर्व रूपांनी नटलेला आहे. चित्तशुध्दीने ही खात्री होते. आणि सतत नामस्मरणाने चित्त शुद्ध होते. त्यासाठी यज्ञयाग, हठयोग, पंचाग्नीसाधन, तप, इ. अवघड साधनांची काहीही गरज नाही. महानुभाव संतांच्या शब्दाकडे दुर्लक्ष करणारा, नामस्मरण टाळणारा मनुष्य समर्थाच्या दृष्टीने अत्यंत क्षुद्र आहे . त्याला आपल्या नरदेहाचे मूल्य कळलेले नाही. महद्भाग्याने मिळालेला मानवदेह हे मोक्षाचे द्वार आहे. जन्म-मरणाच्या चक्रातून सुटण्याचे साधन आहे. त्याचा उपयोग भगवंत प्राप्ती करून घेण्यासाठीच आहे. तसे न करता संसारातील पदार्थ प्राप्त करून घेण्यासाठी आणि विषयांचा उपभोग घ ण्यासाठी वापरला तर तो नरदेहाचा आत्यंतिक दुरूपयोग आहे आणि त्याचा नाशही आहे. ही आपणच आपल्या आयुष्याची केलेली अक्षम्य हानी आहे.

समर्थांनी अशा माणसाला आत्मघातकी, आत्महत्यारा म्हटले आहे. आत्महत्या हे महापातक आहे. दासबोधात समर्थ कठोर शब्दांत म्हणतात, "आपले हीत न करी लोकिकी। तो जाणावा आत्मघातकी। या मूर्खायेवढा पातकी। आणिक नाही” श्रीराम (१५-३-२७) तात्पर्य : ज्या नामात आपली अनंत जन्मांची महापापे भस्म करण्याचे सामर्थ्य आहे ते अति पावन नाम न घेण्याचे महापातक माणसाने करू नये. मनुष्यजन्माची एवढी मोठी हानी करू नये. संतांचे सांगणे ऐकावे. नामसाधनेने आत्महीत साधून धन्य व्हावे.
जय जय रघुवीर समर्थ  
-सौ. आसावरी भोईर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मराठी नाईर्टिंगेल : मीना घोडविंदे