असा वळवाचा पाऊस नकोसाही असतो...
त्या प्रसंगानंतर पूर्वीइतका वळीव माझ्या दृष्टीनी आनंदाचा राहिलेला नाही....असा पाऊस आला की आता आठवतो तो....कष्ट करणारा शेतकरी, त्यांची मुलंबाळं, त्याचं शेतं...आडवी झालेली पीकं..तीचा रडवेला चेहरा..आणि खूप काही...आपण निश्चित विचार करूया.. थोडं बदलूया....स्वतःला...
रणरणतं कडकं ऊन पडलं होत. त्या भाजणाऱ्या उन्हात बाहेर जावंसचं वाटत नव्हतं.पारा चढलेला..अंगाची लाहीलाही होत होती. जोरात फॅन सुरू केला तरी उकडत होतं. काही वेळानंतर थोडं थोडं वातावरण बदलायला सुरूवात झाली. हळूहळू वारा वहायला लागला. अचानक काळे ढग दिसायला लागले. अंधारून आल्यासारखं झालं .आता तर वाऱ्याचा जोर फारच वाढला....वळीव बरसणार वाटतं....या विचारांनी मन सुखावलं..
तेवढ्यात वादळच सुरू झालं.... झाडांच्या फांद्या हलायला लागल्या. धप्प धप्प आवाज करत दोन नारळ पडले. एक झावळी पण सुसू आवाज करत पडली..झाडांची पानं पडायला लागली.. फांद्या पुढे पुढे येत होत्या ..त्या पावसाला आनंदानी हसत हसत "ये ये म्हणत आहेत असंच मला वाटायला लागलं ...थोड्या अवधीत सगळं चित्र बदलूनचं गेलं...आलाच पाऊस वळवाचा... कोसळायलाच लागला..बराच वेळ धो धो पाऊस बरसला. काही वेळातच आला तसा निघूनही गेला...वातावरण शांत झाले. पावसाचे पाणी रस्त्यावरून वहात होते. खिडकीतून मी बघत होते.
अशा सुखद क्षणी...बाहेर पडायचा मोह झालाच..खाली गेले.. ..बरीच मुलं जमली होती .त्यांचा आरडाओरडा चालु होता.शेजारच्या बिल्डींगमधल्या आंब्याच्या झाडाच्या खाली खूप साऱ्या कैऱ्या पडल्या होत्या. पोरांना भलतीच मज्जा वाटत होती. मुलं कैऱ्या गोळा करायला लागली. काही कैऱ्या फुटल्या होत्या, काही पाण्यात चिखलात पडल्या होत्या, रस्त्यावर सोसायटीच्या झाडांमध्ये पडल्या होत्या.
मुलं दंगा करत... गंमत अनुभवत होती.
"मला मिळाली”, ”मला पण सापडला”
"अरे ही एक बघ केवढी मोठी आहे.”
"अरे ही तर पिवळी झाली आहे. गोडं असेल”
"बाजूला ठेव नंतर आपण कापून खाऊ.”
पोरं ओरडतच होती. एकाने चार कैऱ्या मला दिल्या. आजूबाजूचे लोकही जमा झाले होते. त्यांनाही त्या मुलांनी कैऱ्या दिल्या .खूप धमाल चालली होती. गार हवा आता फार सुखकारक वाटत होती.काही वेळापूर्वी कडक उन्हाने वैतागलेलो आम्ही एकदम आनंदून गेलो होतो...एक रीक्षा आली. त्यातुन ती ऊतरली. माझं लक्ष तिच्याकडे गेलं. शेजारच्या बिल्डिंगमध्ये नुकतेच ते लोकं राहायला आले होते. काही दिवसांपूर्वीच तिची ओळख झाली होती. ती समोर दिसल्यावर मुलांना म्हटलं, "तीला पण कैऱ्या द्या रे” मुलांनी तिलाही चार कैऱ्या दिल्या.पोरांनी दिलेल्या कैऱ्या तिच्या हातात होत्या. त्यांच्याकडे बघत ती उभी होती. तिचे डोळे भरून आले होते. पदराने ती ते पुसतं होती. हीला अचानक काय झालं कळेना..
जवळ जाऊन विचारलं ..
"काय झालं ग?”
तिचा चेहरा रडवेला झाला होता. ती म्हणाली ..."सासऱ्यांचा सकाळीच फोन आला होता. असाच पाऊस काल गावाकडे आमच्या शेतातही पडला म्हणे. आंब्याचं खूप नुकसान झालं आहे. पीकं तर पार आडवी झाली आहेत.”
आता तर तिचा बांधच फुटला. ती फारच जोरात रडायला लागली ...मी निःशब्द झाले ..काय बोलायचं याच्यावर? सांत्वन तरी कसं करायचं? मला काही समजेना..
ती पुढे म्हणाली.."नको तेव्हा हा वळीव येतो आणि काही तासातच हातातोंडाशी आलेला घास घेऊन जातो.”
तीचं बोलणं ऐकत मी नुसती ऊभीच....
"चांगलं छान कडक ऊन पडलं की मध्येच हा येतो..” वैतागून ती म्हणाली
"नकोत मला या कैऱ्या.” असं म्हणून तिने त्या कैऱ्या माझ्या हातात दिल्या आणि शेजारच्या जीन्याने वर निघून गेली. मी स्तब्ध झाले....इतका वेळ मी वरवर झाडाकडे पाहत होते...आता खाली बघितलं...अर्धवट फुटलेल्या मातीतल्या कैऱ्या आत्ता नीट नजरेला दिसल्या.. तुटलेल्या फांद्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. एका फांदीवर छोटीशी कैरीपण होती...मगाशी ती पुढे येणारी फांदी कदाचीत पावसाला "थांब थांब म्हणत असावी का?...” असं आता मला वाटायला लागलं... प्राप्त परिस्थितीचा आम्हाला हवा तो अर्थ आम्ही काढतो. वास्तव वेगळं असतं का?अर्धा किलो कैरी मंडईतून आणणारे आम्ही...तेवढाच आमचा संबंध..त्याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचे दुःख आमच्यापर्यंत पोहोचतच नाही...हे आज स्पष्टपणे कळलं..मोठ्या ब्रॅण्डेड दुकानात वस्तूंची जी किंमत असेल ती आम्ही निमूटपणे देतो आणि भाजी घेताना मात्र दहा वीस रुपयांसाठी घासाघीस करतो. कांदा महाग झाला की पेपरात मोठी बातमी येते.."कांद्याचे दर भरमसाठ वाढले” ते का वाढले, कशामुळे वाढले याचा आम्ही विचारच करत नाही. इतरही शेतमालाच्या बाबतीत आम्ही असंच करतो....आज तिच्या शब्दांमुळे थोडी तरी भावना मनात जागी झाली. असाही एक वळवाचा पाऊस विचार करायला लावणारा.. खरं सांगू...तेव्हापासून पूर्वीइतका वळीव माझ्या दृष्टीनी आनंदाचा राहिलेला नाही....असा पाऊस आला की आता आठवतो तो....कष्ट करणारा शेतकरी, त्यांची मुलंबाळं, त्याचं शेतं...आडवी झालेली पीकं..तीचा रडवेला चेहरा..आणि खूप काही...आपण निश्चित विचार करूया.. थोडं बदलूया....स्वतःला... - नीता चंद्रकांत कुलकर्णी