पर्यटनाच्या माध्यमातून..
कोकणातील लेखक, कवी, पत्रकार, छायाचित्रकार, चित्रकार अशा विविध क्षेत्रातील नामवंतांची ओळख पुस्तकांद्वारे का होईना, आलेल्या पर्यटकांना होऊ शकते एवढीच अपेक्षा. तिकडे देशावर स्ट्रॉबेरी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजक जर का तेथेच पुस्तकांच्या दालनास आकार देऊ शकतात व ते पुस्तक प्रदर्शन यशस्वी होत असेल तर कोकणातील विविध समुद्र किनारी असे पुस्तकी दालन आकार का घेऊ नये? यावर केवळ चिंतन नको, ॲक्शन घ्यावी, ही अपेक्षा.
विचार जरा वेगळा आहे. शीर्षक वाचूनच तसे वाचकांस वाटले असावे, पर्यटन शब्द कळला...त्याच्या माध्यमातून पुढे काय?
कोविडनंतर बऱ्याच तरुणांनी आपले वेलसेट शहरी जॉब्ज सोडून नाईलाजाने का होईना गावाकडली पायवाट धरली. पुढे काहींनी जुळवून घेतले काहींना नाही जमले... गावठी जीवन जगण्यासाठी जो मनाचा सशक्तपणा लागतो त्यांत काहीजणांना अपयश आले. ऑनलाईन काम करण्यासाठी प्रथम वीज अपेक्षित असते, नेमका त्याचाच अभाव जाणवत होता गावाकडे! वीजपुरवठा मुद्दाम कुणी घालवत नव्हता; तर कोकणातील समुद्री भागात वादळ यायला निमित्त लागत नाही. पोफळीची एक झावळी जरी विजेच्या तारेवर पडली तरीही खंडित झालेला वीज पुरवठा पुनस्थ्राापित करण्यासाठी म्हणून किमान चोवीस तास तरी लागायचे. हे मी ३५ वर्षांच्या प्रत्यक्ष अनुभवाने सांगत आहे. अजूनही त्यांत विशेष बदल आला आहे, असे नाही वाटत. असो.
विषय आहे पर्यटनाच्या माध्यमातून पुस्तक वाचन संस्कार पुनरुज्जीवित करता येतील का? विषय जरा क्लिष्ट वाटत असावा. पण विचार करता येऊ शकेल असा हा विषय आहे. बरेचसे पर्यटक अशा ठिकाणी जात असतात, जेथे मोबाईल रेंज शून्य असते. मोबाईल नाही, तर शहराशी कनेक्टिव्हिटी जाते! म्हणून काहींना अशा जागांकडे जाणे टाळत असावेत. मात्र काही पर्यटकांना शून्य रेंज ही पर्वणीच वाटत असावी. डोकेदुखी गेली. चार-दोन दिवस शहर, ऑफिस या गुंत्यातून अलिप्त राहून आंनद अनुभवता येतो का ते अनुभवायला मिळावे, एवढेच!
काही वर्षांपूर्वी माझ्या मुलाचे कॉलेज मित्र आमच्या गावी आले होते. त्यांची ती तरुणाई... छान भटकंती करत होते, रानांत, गावांत, पुळणीत ते मनमुरादपणे बागडत होते. खिशात महागाडे फोन असूनही त्यानां कुणाचाही फोन येत नव्हता. ते सारे खूप भारावून गेले. इन्कमिंग आणि आऊटगोईंग दोन्ही शांत! मात्र आमच्या घरातील लँडलाईन फोन सुरु होता. त्यांनी शहरांत असलेल्या त्यांच्या पालकांना आपली खुशाली दिली व पुन्हा खूप मजा करु लागले.
संध्या होताच सारे घरी परतले, गार पाण्याने आंघोळी घेतल्या. व माझ्याशी काही विशेष ठिकाणां विषयी विचारपूस करु लागले. आमच्या गावातल्या घरांत एक दोनशे स्क्वेअर फुटाची खोली (रुम) आहे. ज्यांस काचेचा दरवाजा आहे. त्या काचेवर इंग्रजीत STUDY असे लिहिलेले आहे. आत भरपूर पुस्तके शिवाय एक टेबल आणि एकच खुर्ची ठेवलेली होती! मुलाचे मित्र आत गेले आणि आपापल्या आवडीची पुस्तकें निवडून तेथेच खाली जमिनीवर बसून वाचू लागले. डिनर तयार होईपर्यंत त्यांनी पुस्तकांचा बऱ्यापैकी आस्वाद घेतला. एकाने विचारले "या दारावर स्टडी" असे का लिहिलेले आहे? इतरत्र ‘लायब्ररी' असे लिहितात!”
त्यांस उत्तर देण्याचे मी मुद्दाम टाळले. मोबाईल रेंज शून्य झाली आणि मुलांना पर्याय म्हणून का होईना पुस्तकी वातावरणात रमता आले! यापेक्षा दुसरे समाधान ते काय? पुस्तक वाचन हा पर्याय नसून तो संस्कार असावा. ARAMCO या मल्टिनॅशनल कंपनीत काम करत असताना हेल्थ सेंटरमध्ये जावे लागले. मेल नर्सकडून तसे अपॉईंटमेंट घेतले. त्या कागदावर स्पष्ट टीप लिहिलेली होती...‘अपॉईंटमेंट निश्चित आहे मात्र येताना आपले आवडते पुस्तक सोबत आणावे' त्याची आजही मला आठवण येते. माझी नात नुमाया हिच्याकडे स्वतःची लायब्ररी आहे ज्यामध्ये तिच्या आवडीची इंगजी भाषेतील निवडक पुस्तके आहेत!
माझे कॉलेज मित्र केव्हा घरी आले की नुमाया आपली लायब्ररी त्यांना आवर्जून दाखवते! त्यावेळीं तिच्या चेहऱ्यावरील आनंद छटा स्पष्ट जाणवल्या. दि. १६ मेच्या दैनिक महाराष्ट्र टाइम्समधील ‘पुस्तकांच्या गावाला सहा लाख वाचनप्रेमींची भेट' अशा मथळ्याची बातमी वाचनात आली आणि आजचा हा लेख आकार घेऊ लागला. महाराष्ट्रातील पुस्तकाचे पहिले गाव असलेल्या भिलारला गेल्या सहा वर्षात पांच ते सहा लाख पर्यटकांसह मान्यवरांनी भेट दिली आहे.
ही सचित्र माहिती वाचून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी ज्या-ज्या जागी पर्यटकांना ज्यास्त जावेसे वाटते त्या-त्या ठिकाणी आंबा महोत्सव आयोजित करुन त्याच ठिकाणी पुस्तक प्रदर्शन आयोजित करावे. जेणेकरून फळप्रक्रिया लघु उद्योग, वृक्षारोपण म्हणजे काय? शेतीपूरक उद्योग कसे असावेत? कोकणी रानमेवा म्हणजे प्रत्यक्ष काय? अशा निसर्ग, शेती आणि इतर विषयांवरील छापील पुस्तके त्या दालनांत आवर्जून असावीत. मार्च ते मे अखेरपर्यँत अशा महोत्सवात राज्याबाहेरील पर्यटक येतात त्यांना पुस्तकांचे प्रदर्शन नक्कीच आवडेल. अलीकडेच अक्षरधारा पुस्तक प्रदर्शनात गेलेले एक सद्गृहस्थ यांनी कालच एक Youtube वर आपला छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे, जो इच्छुकांनी अवश्य पहावा असा आहे. आपले छोटेसे बाळ घेऊन ते पुस्तकप्रेमी सपत्निक अक्षरधारा पुस्तक प्रदर्शनात गेले. मुलाच्या वयाच्या अकरा महिन्यापासून ते सहकुटूंब आजवर प्रदर्शनात सहभागी होत आलेत. आता त्यांचे बाळ सात-आठ वर्षांचे झाले असणार. मात्र ते आपल्या आवडीची पुस्तकें निवड करण्यांत व्यस्त दिसले. लोक मोबाईलला शिव्या घालतात. पण खिशात अर्धा लाखी सेलफोन असतोच असतो! मोबाईल हा जगण्याचा एकमात्र पर्याय असू शकत नाही. हे सर्वांना कळतंय. मात्र पुस्तक हे संस्कार घडवू शकते! प्रिंट मिडिया सध्या जरी कासव मोडवर आला असेल, म्हणून इतर क्षणिक सुविधा ‘ससा' बनून चमत्कार घडवू शकतील...हे निव्वळ कल्पित विधान होय. माणूस अक्षरामुळं सजग झाला. त्यातंच माणूस रमणारा. डिजिटल झालो म्हणून प्रगत झालो असे नाही. कागद, पेन, पन्सिल, खोड रबर आणि कंपास बॉक्स हा खजिना होता आणि आजही आहे.
कोकणातील लेखक, कवी, पत्रकार, छायाचित्रकार, चित्रकार अशा विविध क्षेत्रातील नामवंतांची ओळख पुस्तकांद्वारे का होईना, आलेल्या पर्यटकांना होऊ शकते एवढीच अपेक्षा. तिकडे देशावर स्ट्रॉबेरी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजक जर का तेथेच पुस्तकांच्या दालनास आकार देऊ शकतात व ते पुस्तक प्रदर्शन यशस्वी होत असेल तर कोकणातील विविध समुद्र किनारी असे पुस्तकी दालन आकार का घेऊ नये? यावर केवळ चिंतन नको, ॲक्शन घ्यावी, ही अपेक्षा.
पर्यटन क्षेत्रातील मान्यवर, अभ्यासक तसेच प्रत्यक्ष उद्योग म्हणून कार्यरत असतील अशा संस्थानी याकडे लक्ष द्यावे, ही केवळ एक सूचना आहे. धन्यवाद.
-इक्बाल शर्फ मुकादम