ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी-पालकांतर्फे दिवाळी वस्तू-फराळ प्रदर्शन
शिवराज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राची आन-बान-शान
राजे शिवाजींचा राज्याभिषेक ही भारतीय इतिहासातली एक अभूतपूर्व, अलौकिक व अविस्मरणीय घटना म्हटली जाते. भारतीय इतिहासात अनेक राजे-राजवाडे आले अन् गेले. पण शिवाजी महाराज आणि अन्य राजांमध्ये एक मूलभूत फरक होता. तो म्हणजे बहुतांशी राजे हे आपापल्या पूर्वजांच्या राजगादीवर विराजमान झाले. परंतु शिवाजी महाराज हे त्याला अपवाद होते.कारण ते स्वतःच राज्यनिर्माते होते. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द व धाडस त्यांच्या अंगी होती.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक म्हणजे भारतीय इतिहासातील एक सुवर्णपान असून, राष्ट्राची आन-बान-शान आहे. शिवरायांचा हा राज्याभिषेक रायगडावर ६ जून १६७४ रोजी संपन्न झाला. त्यानिमित्ताने आज ६ जून २०२५ रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. सुमारे साडे तीन शतकांचा सुवर्णकाळ लोटला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर, भारताच्या इतिहासात एका नव्या युगाला प्रारंभ झाला.महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात लावलेले हे स्वराज्याचे रोपटे पहाता पहाता बहरलं. काही काळानं मोठं झालं. त्याचं भव्यदिव्य वटवृक्ष झालं. अन् त्या वृक्षाच्या पारंब्या भारताच्या आठही दिशांना पसरल्या. त्यामुळेच मध्ययुगीन भारताच्या इतिहासात शिव राज्याभिषेकाची घटना सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली. त्यातूनच एक नवे युग अवतरले, याचा मराठी माणसाला सार्थ अभिमान आहे.
शिवरायांनी वयाच्या १६ व्या वर्षीच हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले होते अन्ते त्यांनी शौर्य, मुत्सद्देगिरी व आत्मविश्वासाच्या बळावर साकारही केलं. शिवरायांच्या जडणघडणीत मांसाहेब जिजाऊ यांचे मोठं योगदान होत़. शिवबाचा राज्याभिषेक ह्याची देही ह्याची डोळा पहावा, हीच जिजाऊमातेची अंतिम इच्छा होती. जिजाऊंनी एक स्वप्न पाहिले होते, ते म्हणजे शिवबाला हिंदवी स्वराज्याचा आदर्श राजा बनवायचा. पण त्याआधी जिजाऊंना शिवबाचा राज्याभिषेक करून त्याला छ्त्रपती बनवायचं होतं. शिवबाचे वडील शहाजीराजे हे आदिलशहाकडे मोठे सरदार होते. त्यामुळे शिवबाच्या जडणघडणची पूर्ण जबाबदारी जिजाऊंच्या खांद्यावर आली. राज्याभिषेक होऊ नये, या दुष्ट हेतूने तथाकथित कर्मकांडी पंडित कटकारस्थाने करत होते. त्याची तमा न बाळगत या सर्व अप्रिय गोष्टींवर मात करत जिजाऊंनी अखेर शिवबाचा राज्याभिषेक काशीच्या गागा भट्ट यांच्या शुभ हस्ते करण्यास शिक्कामोर्तब केलं.
१६७४ साल उजाडलं अन् महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं. आपल्या राज्यातल्या अन् आसपासच्या राज्यातल्या कर्मकांडी पंडितांना डावलून जिजाऊंनी काशीच्या गागाभट्टाकडे शिवराज्याभिषेकाचे पौराहित्य सोपविले. राज्याभिषेकासाठी रायगड नटूनथटून सज्ज झाला होता. याप्रसंगी राजगडावर मोठी अभूतपूर्व गर्दी उसळली होती. ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६ हा राज्याभिषेकाचा मुहूर्त निश्चित झाला. देश - परदेशातील राजे राजवाड्यांनी किल्ले रायगडावर आवर्जून हजेरी लावली होती. महत्वाचे म्हणजे कवी भूषण यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी श्रीशिवराजभूषण हा ग्रंथ लिहिला.
परमपूज्य गागा भट्ट आणि त्यांच्या पंडितांनी राज्याभिषेकाच्या विधीचा शुभमुहूर्तावर शुभारंभ केला. त्यानंतर चांदी व अन्य धातू तसेच साखर, फळे यांचीही तुला करण्यात आली. तुलादान झाल्यावर मुंज अन् समंत्रक विवाह विधी करण्यात आली. मंगलस्नान अन् वस्त्रभूषण परिधान केल्यावर शिवरायांनी उपस्थित दिगज्जांना नमन करून सिंहासनरोहन केलं. त्यानंतर गागाभट्ट आणि पंडितांनी मंत्राक्षतांची व सुवर्णरौप्य पुष्पांशी शिवरायांवर वृष्टी केली. पहाटे पाचच्या सुमारास सनई चौघडे, तुतारींच्या निनादात अन्रयतेच्या जयघोषात शिवराज्याभिषेक मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. अन् या सोहळ्याचे महत्व महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं.
याप्रसंगी गागा भट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्यांची झालर ठेवत शिवछत्रपती हा शब्द उच्चारला. यावेळी पुरोहित पंडितांना तसेच उपस्थित जनांना मोठ्या प्रमाणात धनधान्य वाटण्यात आले. त्याप्रसंगी सोळा प्रकारचे महादान करण्यात आले.या मंगलमय प्रसंगी गागा भट्ट अन्अन्य पंडितांना नवरत्नादिक, सुवर्णकमळे व मौल्यवान वस्त्रे दानरूपात देण्यात आली.याप्रसंगी सर्वजणं मनोमनी तृप्त झाल्याचे दृष्टोत्पत्तीस आले.दरम्यान सिंहासनावर आरूढ होण्याआधी शिवरायांनी गुरुजनांचे, गागा भट्ट अन्मातोश्रींचे चरणस्पर्श करून आशिर्वाद घेतले. त्यानंतर छत्रपती हत्तीवर स्वार होऊन त्यांची किल्ले रायगडावर मिरवणूक निघाली.यावेळी सोबत अष्टप्रधान मंडळ व सैन्यदल चालत होते.मिरवणूक प्रस्थान करत असताना लोक फुले उधळत महाराजांचा जयघोष करत होते. किल्ले रायगड वरील विविध मंदिरांमध्ये जाऊन देवांचे दर्शन-आशिर्वाद घेतल्यावर शिवछत्रपती हे आपल्या महालात परतले.
राज्याभिषेकाच्या दिवसापासून स्वराज्यातील राजपत्रावर क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती असे नमूद करण्यास सुरुवात झाली. इतकेच नव्हे तर,त्या दिवसापासून नवीन शक सुरू होऊन शिवराय हे शककर्ते राजे झाले. त्यासह हिंदवी स्वराज्यात महाराजांच्या नावाची नाणी चलनात आली. परकीय सत्ता व संस्कृतीचे सावट दूर करून, मराठी साम्राज्याच्या राजकीय, सामाजिक व पारमार्थिक संस्कृतीची मूल्ये रुजविण्यात आली. खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची मूल्ये साकार झाल्याचे प्रतिबिंबित होत होतं. बंधू भगिनींनो,सर्वात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे शिवरायांचा राज्याभिषेक ह्याची देही ह्याची डोळा पाहिल्याने जिजाऊ माँसाहेब धन्य झाल्या. त्या तृप्त झाल्या.त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांना आकाशसुद्धा ठेंगणं वाटत होतं. त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं होतं. या मंगलमय प्रसंगी शिवछत्रपतींची दृष्ट काढत मां जिजाऊ मोठ्या आवेशात म्हणाल्या, शिवबा तुम्ही महाराष्ट्राचे राजा झालात.रयतेचे राजा झालात.महत्वाचे म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज झालात...विजयीभवः
या शुभप्रसंगी श्रीकांत शिंदे आपल्या मुलाखतीत म्हणतात, "महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गे दुर्गेश्वर किल्ले रायगड येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अखंड पुष्पहार अर्पण करण्याचा नवोदित उपक्रम सुरू केला आहे." त्यास आज ५ वर्षे पूर्ण होत असून,पुढेही हा उपक्रम असाच अखंडपणे चालूच राहील. सदर उपक्रम डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचं चिवटे बंधूंचे मुक्ताई गारमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने काय्रान्वित केला जात आहे. मंगेश चिवटे सर हे या उपक्रमावर लक्ष ठेऊन असतात. इतकेच नव्हे तर, तेथील विविध धार्मिकस्थळांना पुष्पहार अर्पण करणे अन् परिसराची स्वच्छता ठेवणे ही कामेदेखील तनमनधनाने केली जात आहेत. या अद्वितीय संकल्पनेची कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराजांनी मुक्तकंठाने प्रशंसा केल्याचे यावेळी शिंदेंनी आवर्जून सांगितले. या उपक्रमामुळे शिवरायांच्या वैभवात आणखी एक मानाचा शिरपेच खोवला गेला आहे,याचा मनस्वी अभिमान वाटतो.
त्याप्रमाणेच शिवराज्याभिषेकचे औचित्य साधून माझ्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील डोंबिवली पूर्व येथील शिवसेनेच्या मध्यवती शाखेजवळील शिवस्मारकावर मेघडंबरीसह शिवछत्रपतींच्या सिंहासनरूढ पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाल्याने मला विशेष आनंद होतो.
जय जिजाऊ माँसाहेब
जय शहाजीराजे भोसले
जय शिवछत्रपती
जय छत्रपती शंभुराजे
जय हिंद
जय महाराष्ट्र
- खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, कल्याण लोकसभा