ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी-पालकांतर्फे दिवाळी वस्तू-फराळ प्रदर्शन
नरहरीरायाचे दर्शन
नरहरी राया यायला निघाले बघ तुझ्या दर्शनाला..
मनातूनच अशी ओढ लागते
तुझी तीव्रतेने आठवण येते
आणि यायला निघतेच....
तशी सगळ्याच देवांवर श्रद्धा आहे पण तू.... कुलदैवत आहेस ना.. म्हणून तुझ्यावर जरा जास्त माया आहे ...त्या ओढीनेच निघते. मला तर वाटते... कुलदैवत ही संकल्पना यातूनच आली असावी. हा देव माझा आहे.....ही भावना मनात रुजते..त्या देवी..दैवता विषयी मनात भक्तीबरोबरच आपलेपणा वाटतो...तो जवळचा वाटतो.. तो देव हक्काचा वाटतो ...टेंभुर्णी फाट्याला वळून वीस-बावीस किलोमीटर गेलं की येतं तुझं नरसिंगपुर....नीरा नदीच पाणी संथ वाहतं असतं पुलावर गाडी गेली की लांबूनच कळसाचं दर्शन होतं . अरे देऊळ जवळ आलं की......
थोड्याच वेळात तुझ्या पायऱ्यांपाशी येऊन पोहोचते. तुझे ते भव्य बुरूज त्यावर उडणारे पोपट पहात क्षणभर उभी राहते .नंतर पायऱ्या चढायला सुरुवात करते. हल्ली अर्ध्या पायऱ्या चढून गेलं की जरा वेळ थांबते ...सत्तरी झाली रे आता.. पूर्वी कसं भरंभरं चढून येत होते. आसपास बघते थांबते.
आजकाल असं थांबणंपण ... आवडायला लागलं आहे. न पाहिलेलं दिसायला लागलं आहे....आधी प्रल्हादाला भेटते. त्या लेकराचं दर्शन घ्यायचं.. त्याच्या थोर भक्तीमुळे तु आम्हाला मिळालास.
आरतीत म्हटल्याप्रमाणे..
"प्रल्हादाच्या इच्छेसाठी
देव प्रगटे स्तंभापोटी
ऐसा ज्याचा अधिकार
नमु त्यासी वारंवार....”
त्याला वंदन करून मग तुझ्याकडे यायला निघते. तुझ्यासमोर बसलं की मन आनंदुन जातं....प्रेमभराने तुझ्याकडे बघत राहते. लाल पगडी, पिवळा पितांबर, शेला पांघरलेला ,गळ्यात हार..तुझं रूप मनात साठवते.. मंद समई तेवत असते. धूप, उदबत्ती फुलांचे हार, यांचा संमिश्र वास आसपास दरवळत असतो. समोर बसून काय बोलू रे तुझ्याशी....आता तेपण कमी झालं आहे..तुला सगळं कळतं.. आता मागणं तर काहीच नाही .आहे त्यात समाधानी आहोत. तुझी सेवा घडू दे. अंतरंगाला तुझा ध्यास असू दे. तेवढ्यानी मन शांत होणार आहे... तूच एक त्राता आहेस हे समजले आहे.
"दया येऊ दे आमची मायबापा
करी रे हरी दूर संसार तापा
अहर्निश लागो तुझा ध्यास आम्हा
नमस्कार माझा नरहरी राया...”
प्रेमाने परत डोळे भरून बघते.. आणि निघते लक्ष्मीआईंना भेटायला... एक सांगू ....तुझा थोडा धाक वाटतो रे.. बापासारखा ...लक्ष्मी आई मात्र भोळी भाबडी .. साडी चोळी घालून . साधंसं मंगळसूत्र घालून उभी असते. तिला काही भपका नाही .. मला तर ती आई, मावशी, काकूसारखीच वाटते.. आमची वाट बघत तुझ्या बाजूला उभी असते बघ...तिच्याजवळ दारात बसून मनमोकळं बोलते. बापाशी बोलता येत नाही ते आईलाच सांगणार ना रे लेक.....तिला सगळं सांगून झालं की मन भरून येत.. शांत वाटतं .तिचा आश्वासक चेहरा बघून मन तृप्त होतं...प्रदक्षिणा पूर्ण करून तुझ्याकडे येते. परत दर्शन घेते...तू भक्कम पाठीशी आहेस म्हणून काळजीच नाही रे....
देवळात येऊन आसपास हिंडून तुला बघून खूप आनंद होतो बघ...म्हणूनच आठवण आली की येते तुला बघायला ....
आता मात्र निघते रे... खूप कामं पडली आहेत.काही नाही रे.....आज सकाळीच तुझी आठवण आली म्हणून आले होते भेटायला......लागते आता कामाला... दूध आलं आहे. ते तापवायच आहे ..चहा करायचा आहे ...पेपर आत घ्यायचा आहे.. सुरू झाला आमचा संसाराचा गाडा.....तुम्हाला मनातलं सांगू का..... पूर्वीसारखं वरचेवर त्याला भेटायला जाणं होत नाही.. मग अशीच जाते.. ... हल्ली तेच आवडायला लागलं आहे. कुणी नसतं देवळात... नरहरी राया आणि मी ...त्या निरामय शांततेत त्याच्याशी मनानी जोडली जाते ...ते काही क्षणचं खरे असतात सच्चे असतात....निर्मळ असतात हे आता कळलेले आहे... त्यामुळे ते फार हवेसे वाटतात....
तुम्हीपण अनुभव घेऊन बघा... तुम्हाला पण येईल ही प्रचिती ...आपल्या मनातल्या देवाची....मग तो देव कुठलाही असु दे...
-नीता चंद्रकांत कुलकर्णी