ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी-पालकांतर्फे दिवाळी वस्तू-फराळ प्रदर्शन
कथा जैवविविधतेची (प्रवास जीवसृष्टीचा..)
जैवविविधतेचा अभ्यास व संवर्धनाचे प्रयत्न करणाऱ्यांसाठी शास्त्रीय लेखन हे बऱ्याच वेळा क्लिष्ट व समजण्यास कठीण असते. अशी पुस्तकं वाचताना सामान्यांना ती रटाळ वाटू शकतात. परंतु डॉ. संजय जोशी यांनी आपले लेखन हे सहज, सोपे, रंजक केलेले आहे. त्यांनी विज्ञानातल्या संकल्पना, उदाहरणं सोपी करून सांगितली आहेत. त्यांनी पुस्तकात नुसती माहिती दिलेली नाही, तर ती कथन केलेली आहे. जणू काही ते जीवसृष्टीचा प्रवास करायला वाचकांना सोबत घेऊन निघाले आहेत व प्रत्यक्षात त्या त्या गोष्टीचा अनुभव घेत माहिती देत आहेत अशी मांडणी पुस्तकात केलेली आहे.
आपलं अस्तित्व ज्या पृथ्वीवर निर्माण झालं, त्या वसुधेची निर्मिती कशी झाली असावी? त्यात नांदणाऱ्या विविध परिसंस्था व त्यातल्या जैवविविधता कशा निर्माण झाल्या असाव्यात? असे अनेक प्रश्न प्रत्येक शतकात माणसाला पडलेले आहेत. या औत्सुक्यापोटीच आतापर्यंत अनेक शास्रज्ञांनी विविध संशोधनं केली आहेत, विविध शोध लावले आहेत. आजही पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या उत्पत्तीचे गूढ समजून घेण्यास माणसं उत्सुक असलेली आपल्याला दिसतात. डॉ. संजय जोशी यांचे ‘कथा जैवविविधतेची (प्रवास जीवसृष्टीचा...)' हे पुस्तक वाचल्यावर त्यांची ही उत्सुकता नक्की पूर्ण होऊ शकते.
जीवशास्त्राचे अध्यापक व निसर्ग अभ्यासक असणाऱ्या डॉ. संजय जोशी यांनी २०१०मध्ये मुंबई सकाळ वर्तमानपत्रात ‘जैवविविधता' या विषयावर वर्षभर लेखमाला लिहिली होती. त्या लेखांमध्ये विषयानुरूप अधिक सविस्तर माहिती समाविष्ट करून त्यांनी त्याचे ‘कथा जैवविविधतेची (प्रवास जीवसृष्टीचा...)' हे पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकात पृथ्वीच्या उगमापासून ते जैवविविधतेच्या सांप्रत परिस्थितीचा आलेख मांडलेला आहे. पृथ्वीची निर्मिती कशी झाली असावी? जीवसृष्टीचा उगम वेगवेगळ्या परिसंस्थांमध्ये कसा होत गेला असावा? जैवविविधता कशी निर्माण झाली? असंख्य प्रजातींचे परस्परावलंबन कसे आहे? माणूस या जैवविविधतेचा एक भाग असूनही त्याच्या हस्तक्षेपामुळे जैवविविधता कशी संकटात आली आहे? अशा अनेक प्रश्नांची सखोल व व्यापक विश्लेषणात्मक उत्तरं आपल्या या पुस्तकात वाचायला मिळतात. त्याचबरोबर मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आलेली जैवविविधता, तिच्या संवर्धनासाठी होणारे वैयक्तिक, संस्थात्मक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रयत्नांचा लेखाजोखाही आपल्याला पुस्तकात वाचायला मिळतो.
डॉ. संजय जोशी यांनी मानवाला जैवविविधतेचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मिळणारे फायदे तर सांगितले आहेतच, त्याचबरोबर त्याचे महत्त्व सांगताना ते म्हणतात की ही गरीबांसाठी निसर्गाची बँक आहे. निसर्गाचं अमाप धन या बँकेतल्या ठेवी आहेत. या ठेवींना हात न लावता, ठेवींचा क्षय न करता फक्त मिळणाऱ्या सेवांचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि इतर सजीवांना त्यांचा त्यांचा वाटा मिळू द्यावा यातचं आपलं कल्याण आहे. जीवसृष्टीच्या ३५० कोटी वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत पाच वेळा नैसर्गिक घडामोडींमुळे सजीवांच्या लाखो प्रजाती पूर्णपणे नामशेष झाल्या, लुप्त झाल्या व नवीन जन्मालाही आल्या. पण आता नैसर्गिक घडामोडींच्या जोडीला मानवी कृत्यांची भर पडल्याने निसर्गातल्या घडामोडी जास्त विध्वंसक होत आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यात पृथ्वीवरील प्रजातींचा सहावा महाविनाश - मास एक्सटिंशन होण्याकडे आपली वाटचाल सुरू झाल्याची माहिती डॉ. संजय जोशी देऊन आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
भविष्यात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी माणसाला जैवविविधता म्हणजेच जीविधता वाचवावीच लागणार आहे. जैवविविधतेचं महत्त्व जाणल्यामुळेचं आपल्या पूर्वजांनी त्यांच्या पद्धतीने जीविधतेचे संवर्धन केले होते. त्यांच्या प्रयत्नांचा मागोवा व आता जीविधतेचे महत्त्व पटल्यामुळे स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत चालणारे संवर्धनाचे प्रयत्न पुस्तकात दिलेले आहेत. जैवविविधतेसंदर्भात जागतिक पातळीवर आणि आपल्या देशात झालेले विविध करार, कायदे यांची माहितीही पुस्तकात वाचायला मिळते. जैवविविधतेच्या संरक्षण व संवर्धनासाठी कायदा करणारा आपला भारत देश जगातला पहिला देश ठरला आहे. तो कायदा म्हणजे ‘द बायॉलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट, २००२.' या कायद्याची सर्वसामान्यांना ओळख व्हावी या उद्देश्याने त्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती पुस्तकात दिली आहे.
शास्त्रीय लेखन हे बऱ्याच वेळा क्लिष्ट व समजण्यास कठीण असते. अशी पुस्तकं वाचताना सामान्यांना ती रटाळ वाटू शकतात. परंतु डॉ. संजय जोशी यांनी आपले लेखन हे सहज, सोपे, रंजक केलेले आहे. त्यांनी विज्ञानातल्या संकल्पना, उदाहरणं सोपी करून सांगितली आहेत. त्यांनी पुस्तकात नुसती माहिती दिलेली नाही, तर ती कथन केलेली आहे. जणू काही ते जीवसृष्टीचा प्रवास करायला वाचकांना सोबत घेऊन निघाले आहेत व प्रत्यक्षात त्या त्या गोष्टीचा अनुभव घेत माहिती देत आहेत अशी मांडणी पुस्तकात केलेली आहे. वाचकांशी संवाद साधत सांगितलेली ही जीविधतेची कथा त्यामुळे वाचणाऱ्याला जवळची वाटते. उत्कृष्ठ बांधणी असणारं हे पुस्तक सृजनसंवाद प्रकाशनाने प्रकाशित केले असून मंदार नेने यांनी पुस्तकाची कल्पक मांडणी व समर्पक मुखपृष्ठ साकारले आहे. पुस्तकातली माहिती वाचकाना सुलभतेने समजण्यासाठी माहितीपूरक चित्रे पुस्तकात दिलेली आहेत. विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. संजय देशमुख यांचा संक्षिप्त अभिप्राय पुस्तकाच्या गुणवत्तेची साक्ष देणारा आहे.
शहाण्या माणसांनी निसर्गाच्या जीविधतेचा ठेवा जपला नाही तर पुढील पिढ्यांवर जीविधता फक्त संग्रहालयात पाहायला मिळेल असा इशारा डॉ. संजय जोशींनी पुस्तकातून आपल्याला दिला आहे. पुस्तकात शेवटी छत्रपती शिवाजीमहाराजांचं आज्ञापत्र देऊन महाराजांचे निसर्गावरचे प्रेम, काळजी व संरक्षण करण्यासाठी घेतलेली दक्षता दाखवून सामान्यांना निसर्गाप्रति संवेदनशिलतेने विचार करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न लेखक करताना दिसतो आहे. जैवविविधतेवर इंग्रजी भाषेत जेवढं मुबलक साहित्य उपलब्ध आहे तेवढं मुबलक साहित्य आपल्याला मराठी भाषेत मिळत नाही. त्यामुळे जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी व संवर्धनाचे प्रयत्न करणाऱ्यांसाठी डॉ. संजय जोशींचे ‘कथा जैवविविधतेची (प्रवास जीवसृष्टीचा...)' हे पुस्तक नक्कीचं मार्गदर्शक ठरू शकेल...
-मंगल कातकर
‘कथा जैवविविधतेची (प्रवास जीवसृष्टीचा...)' लेखक - डॉ. संजय जोशी
प्रकाशक सृजनसंवाद प्रकाशन पृष्ठे -२३२ मूल्य ५००रू