ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी-पालकांतर्फे दिवाळी वस्तू-फराळ प्रदर्शन
वर्षानंतर आईला आठवताना...
१ जूनला आईला जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. तिच्या वयाच्या ९४ व्या वर्षी जाणं धक्कादायक नसलं तरी दुःखद नक्कीच होतं. आज वर्षानंतरही रोह्याच्या घरात आणि मनाच्या खोल पोकळीत तिच्याशिवायचं रितेपण हलवून टाकतं. त्यावर शेवटी मग लेखणी हाच उपाय ठरू शकतं. मन मोकळं करणं.
माझी आई म्हणजे पुर्वाश्रमीची शांता कुळकर्णी. रायगड जिल्ह्यातील तळा हे तिचं माहेर. लख्ख गोरा रंग, लांब सडक केस आणि कपाळावर ठसठशीत कुंकू. त्यात आयुष्यभर शिक्षकी पेशा केल्याने बोलण्याचं कौशल्यही आपोआप प्राप्त झालेलं. त्यामुळे आईचं व्यक्तिमत्व कायम आकर्षक व चारचौघात उठून दिसणारं असे. ती अवघी पंधरा वर्षाची असताना तिचे वडील वारले. हिच घरात सगळ्यात मोठी. पाठीमागे विधवा आई व ही चार भावंडं. त्यामुळे जाणतेपणाने तिने लगेच नोकरींसाठी अर्ज केला व सोळा सतराव्या वर्षीच ती नोकरीला लागली. पन्नास साली तिला शिक्षकांच्या दोन वर्षाच्या प्रशिक्षणाला जावे लागले. तो काळ लक्षात घेता हे काहीसे अवघड व जगाच्या पुढे जाऊन होते. (सतरा रुपये स्टायपेंड मिळायचा बाविस तेवीस रुपये खर्च व्हायचा). पुढे ही नोकरीच धाकट्या भावंडांसाठी, पुढे स्वतःच्या आणि त्याहून पुढे मुला-नातवंडाच्या चारितार्थ व शिक्षणाला आधारभूत ठरली.
त्रेपन्न साली आई वडिलांचं लग्न झालं. (त्या काळातला तो नोंदणी विवाह होता). दोघांची सेवादलात ओळख होती. पुढे वडिलही शिक्षकी पेशात आले. पण या दोघांनी आपल्या नोकरीं पेशात जी नैतिकता पाळली ती आज उल्लेखनीय वाटते. (त्या काळात असे बरेच होते. आज कुठे गेले?)
आईची सत्तर साली मेंढ्याला बदली झाली. काळ जुना वाहतुकीची साधनं दुर्मिळ. आई अकराची शाळा गाठायला आधी साडे आठ ला आणि नंतर आठ च्या गाडीने जात असे.. गेलं थोडं उशीराच्या गाडीने, झाला थोडा उशीर. त्यात काय झालं? असं त्यांना कुणालाच चालणारं नसे. मीं उरणला असताना एकदा आई, वडील माझ्याकडे आले होते. गावात काहीतरी जत्रा वगैरे होती. त्यामुळे साडे पाचला बंद होणारी बँक त्या दिवशी मॅनेजरने स्वतःच पाचला बंद करून आम्ही घरी आलो. (कॉम्प्युटर व्यवहार सुरु होण्यापूर्वीचा हा काळ आहे. तेव्हा ते काहीसं शक्यही असे.) पण मला वेळेआधी घरी आलेला पाहुन आईने एव्हढा निषेध नोंदवला की मला वाटलं आपण बँक सुटल्यावर कुठे बागेत वगैरे बसून मग साडे पाचनंतर घरी आलो असतो तर बरं झालं असतं.
पण हे असं तत्वनिष्ठपणे वागल्याने त्या व्यक्तीला एक अपूर्व गोष्ट प्राप्त होते. ती म्हणजे नैतिक बळ. त्याचा प्रत्यय पुढे आलाच. आयुष्यातल्या त्या एका प्रसंगानेच पुढे आई ओळखली जाऊ लागली. त्याची कुठे तरी नोंद व्हावी म्हणून एकदा शेवटचं लिहीत आहे.
कोलाडच्या शाळेत आई मुख्याध्यापक असताना शिक्षक लोकांची कसली तरी मोठी मिटिंग तिथे होती. ज्यात मामलेदार, मुख्य अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि अनेक शिक्षक हजर होते. जिल्हा परिषद अध्यक्ष (आपल्या सवयीप्रमाणे) उपस्थित शिक्षकांशी अतिशय उद्धटपणे वागत होते. अगदी महिला शिक्षकांशीही. सगळे निमूटपणे व असहायपणे पहात होते. कुणाचीही ‘अरे ला कारे' करायची हिम्मत होत नव्हती. एक वेळ आली की आईला मुख्याध्यापिका म्हणून स्वतःच्या कामाचा रिपोर्ट द्यायला उभं राहायची वेळ आली. आईने स्वतः ते सांगून मग तोंड घातलं ‘हे तुमचं काय चाललंय. आम्ही शिक्षिका म्हणजे तुम्हाला काय वाटलं?' पुढे बरंच काही. आणि मग सगळा जिल्हा हादरून गेला. पेपरात गाजावाजा झाला. मदांध सत्यधीशांना खडे बोल सुनावणारी बाई म्हणून आईला सारे ओळखू लागले.
असे अजूनही काही प्रसंग आहेत. नागे नावाच्या शिक्षकाला वरिष्ठानी आकसाने Sespend केलं होतं आणि ते या अन्यायाविरुद्ध उपोषणाला बसले होते. तेव्हढ्यात शिक्षक दिन आला. कार्यक्रम रंगतदार चालला होता. पण उपोषणकर्त्या नागे गुरुजींचं कुणी नावही घेत नव्हतं. सगळ्यांना गुलाब, अत्तर सारं वाटून झालं होतं. भाषणबाजीत कुणी कमी पडत नव्हतं. सभा अर्ध्याहून अधिक पुढे जाऊन संपायच्या दिशेने पुढे चालली होती. मग गडकरी बाई अचानक उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, ‘भाषणं ऐकली; पण उपोषणकर्त्यांचं कुणी नावही घेत नाही. त्याचा निषेध म्हणून मला मिळालेलं हे फूल राधाकृष्ण यांच्या पायाशी ठेवत आहे.' पुढे उपस्थित सर्वच शिक्षकांनी त्याचं अनुकरण केलं आणि प्रमुख पाहुण्यांसह आख्खी सभा आ वासून पहात बसली. पुढे त्या शिक्षकांसाठी चौकशी कमिशन बसल्यावर आईने समितीलाच ‘मीं मुख्याध्यापिका इथे असताना तुम्ही परस्पर त्यांना Sespend करूच शकत नाही' असं सांगून हादरा दिला.
असो.अशा छोट्या मोठ्या अनेक गोष्टी. दीर्घ आयुष्य लाभल्याने वाट्याला वेदना आल्याच. पण भाऊ आणि वहिनीने सेवा केली. शेवटच्या कठीण काळातही आई कंटाळली नव्हती. ‘देवा सोडव रे मला' वगैरे कधीच नाही. असो. आज हे सारं इतिहास होत आहे. तिला विनम्र आदरांजली. - श्रीनिवास गडकरी