ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी-पालकांतर्फे दिवाळी वस्तू-फराळ प्रदर्शन
प्रौढ होणाऱ्या मुलास, बापाचे अनावृत्त पत्र
मानसशास्त्र म्हणते की, मुलाच्या व्यक्तिमत्व विकसनात साठ टक्के वाटा हा बाह्य परिसराचा, सभोवतालच्या वातावरणाचा असतो. म्हणून तू समाजात वावरताना राजहंसाप्रमाणे असावे. दूध आणि पाणी वेगळे करून योग्य ते जवळ ठेवावे; फोलपट फेकून द्यावे. जीवनात तुला मित्र असावे. मित्रांमुळे जीवन सुसह्य होते. परंतु त्यांना पारखता आलं पाहिजे. अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धाने सांगितलेली मित्राची व्याख्या तुला माहीत असावी. जेणेकरून तुझी फसवणूक होणार नाही.
प्रिय बाळा, आज तुझा जन्मदिवस. तू आज वयाची १८ वर्षे पूर्ण करून प्रौढावस्थेत प्रवेशित आहेस. त्यानिमित्त तुला भरभरून मंगल कामनासह शुभाशिष. आज तुझ्या जन्मदिवसानिमित्त बोलून दाखवत असलो, तरी बापाचे आशीर्वाद सदैव मुलाच्या पाठी असतातच यात मात्र शंका नाही. आज तू प्रौढ होत आहेस; याचा आनंद तर आहेच. परंतु काहीसे मनावर भीतीयुक्त दडपणसुद्धा आहे. त्याचे कारण असे की, आता तू प्रौढ झाला म्हणजे नाबालिक राहिला नाहीस. हे समजून घेण्यास तू थोडा जरी कमी पडलास, तर काही प्रश्न निर्माण होऊन, तुझं जीवन उध्वस्त आणि वेळप्रसंगी कुटुंबाचीही राखरांगोळी करू शकतात. नाबालिक नसणे म्हणजे प्रौढ होणे. प्रौढ होणे म्हणजे तुझ्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाला समाज मान्यता मिळणे. स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणजे देशाचा नागरिक म्हणून तुला संविधानिक दर्जा प्राप्त होऊन मतदार यादीमध्ये तुझे नाव समाविष्ट होईल. मतदार यादी म्हणजे देशाचा सातबारा होय. त्यामध्ये नाव म्हणजे तू देशाचा मालक. याचा अन्वयार्थ असा की, मालकांनी मताधिकाराच्या माध्यमातून जे प्रतिनिधी कायदेमंडळात पाठवले ते लायक (योग्य) आहेत की नाही? याची चाचपणी तुला उघड्या डोळ्यांनी करता आली पाहिजे. अन्यथा पुनर्संधी नाकारून त्यांना घरचा रस्ता दाखवता आला पाहिजे. असे जर झाले नाही, तर लोक तुला अंधभक्त म्हणून हीणवतील आणि बाप म्हणून ते मला अजिबात चालणार नाही.
कदाचित तू नेमकाच प्रौढ झाल्यामुळे तुला लायकीची कसोटी करणार नाही. त्यासाठी भारतीय संविधान तुला मदत करेल. त्यामधून तुझे अनेक संबोध स्पष्ट होतील. संविधान सर्वच समजून घेता आलं नाही, तरी सुरुवातीला तिसऱ्या, चौथ्या प्रकरणातील नागरिकांचे मूलभूत हक्क-अधिकार व नीती निर्देशक तत्व हा त्याचा गाभा तू समजून घ्यावा. त्यानुसार आपले प्रतिनिधी नागरिकांचे हक्क अधिकार शाबुत ठेवून त्यामध्ये त्यांनी किती वृद्ध केली? त्यांच्या व्यक्तिमत्त्व उत्थानासाठी व आदर्श जीवनमान उंचावण्यासाठी किती काटेकोर व धाडसी पाऊले उचलून निर्णय घेतले? याचे मोजमाप करता आले, म्हणजे इतर बाबी तुला समजून समजून घेण्यास वेळ लागणार नाही.
माझ्या लाडक्या मुला, मला भीती याही गोष्टीची वाटते की, तू प्रौढ झाल्यामुळे भारतीय दंड संहिता आणि न्यायसंहितेचे कायदे तुझ्यावर तंतोतंत लागू होतील. आधी मोटर सायकल चालवताना चूक झाली, तर गुन्हा बापावर दाखल होण्याचा नियम आहे. इतर काही चुकांसाठी नासमज' किंवा एका प्रतिष्ठित बापाचा मुलगा म्हणून दुर्लक्ष होत होतं. परंतु आता तसं होणार नाही. चूक ही अनवधानाने झाली, तरी ती चूकच ठरणार आहे. तिथे बापाची प्रतिष्ठा कामी न येता उलट तीच पणाला लागणार आहे. आतापर्यंत तुझ्या बापाच्या यशाचं स्वतंत्र मोजमाप होत होतं. त्याचं श्रेय बापाच्या बापाला जात होतं. परंतु आता त्याचं मूल्यमापन तुझ्या यशावर अवलंबून असणार आहे. तू जर नैतिकता जोपासून यशस्वी झाला तर बापाचे सत्कर्म फळाला आले, अन्यथा स्वतः मोठे झाले आणि मुलांना संस्कार देण्यात कमी पडले. काय गरज आहे समाजकार्याची? असे बोलताना समाजाची जीभ थोडीही कचरणार नाही. समाज चुकीचा असतो असे मी म्हणणार नाही. ती पूर्वापार रीत आहे. ती बदलता येणार नाही. परंतु जगात बापच असा असतो की, त्याला वाटते माझा मुलगा माझ्यापेक्षा कितीतरी मोठा व्हावा आणि त्या दिशेनेच त्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठाही असते.
मानसशास्त्र म्हणते की, मुलाच्या व्यक्तिमत्व विकसनात साठ टक्के वाटा हा बाह्य परिसराचा, सभोवतालच्या वातावरणाचा असतो. म्हणून तू समाजात वावरताना राजहंसाप्रमाणे असावे. दूध आणि पाणी वेगळे करून, योग्य ते जवळ ठेवावे; फोलपट फेकून द्यावे. जीवनात तुला मित्र असावे. मित्रांमुळे जीवन सुसह्य होते. परंतु त्यांना पारखता आलं पाहिजे. अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धाने सांगितलेली मित्राची व्याख्या तुला माहीत असावी. जेणेकरून तुझी फसवणूक होणार नाही. बुद्ध फक्त मित्रापुरताच तुला मार्गदर्शन करतो असे नाही, तर प्रत्येक पावलागणिक तो तुझ्यासोबत असावा. आदर्श जीवनाचा मापदंड त्याच्याशिवाय जगात कोणाकडेच नाही. अभ्यासाबद्दल मी तुला एवढे सांगेल की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू समजून घेताना तू विद्यार्थी बाबासाहेब' नक्की अभ्यासावे. त्यामुळे ज्ञानलालसा आजन्म तुझी साथ सोडणार नाही.
जीवनात पैसाच सर्व काही नसला, तरी बरेच काही आहे. याची जाण तुला असावी. त्याची किंमत तुला कळली पाहिजे. बापाच्या कमाईत भर टाकता आली नाही तरी चालेल. परंतु ती सुरक्षित ठेवण्याइतपत कौशल्य तुझ्याकडे असावे. जेणेकरून तुला सुपुत्र होता आले नाही, तरी तू कुपुत्र न होता, पुत्र होशील. समाजात वावरताना प्रत्येक पावलागणिक तुला लुबाडणारी, फसवणारी, जोपासणारी तसेच जीव लावणारी लोकं भेटतील. फसवी लोक फारच हुशार असतात. त्यांच्या तोंडात साखर आणि पोटात आग असते. त्यांच्या पोटातील आगीची भनक तुला त्यांच्या श्वासातून झाली पाहिजे, अन्यथा होरपळल्याशिवाय गत्यंतर नसते.
बाळ, तुला आदर्श जीवनाची वाटचाल करायची आहे. त्यासाठी तू आपल्या उद्धारकर्त्या महापुरुषांचे कष्ट, त्याग, समर्पण तुला समजून घ्यावे. त्यांच्याकडून तुला सद्गुण व निर्व्यसनी जीवनाचे धडे मिळतील. त्यामुळे तुला सुखी जीवनाचे रहस्य आणि सार कळेल. पर्यायाने तुझ्यात कृतज्ञता निर्माण होईल. ती सर्वव्यापी असेल, त्यामध्ये कुटुंबासह सर्व समाज सामावलेला असेल. खूप मोठी नोकरी किंवा पॅकेज म्हणजे यशस्वी जीवनाची मोजपट्टी नसते. ते जीवन जगण्याचे एक साधन आहे. त्यासोबत तुला समाजामध्ये ताठ मानेने शुर सैनिक म्हणून जगता आलं पाहिजे.
बाळा मला माफ कर, प्रौढावस्थेच्या पायरीवर आरूढ होताच, मी तुला खूप साऱ्या सूचना करत आहे. खूप अपेक्षाही तुझ्याकडून ठेवत आहे. परंतु काय करू? शेवटी माझं काळीज हे बापाचं आहे. बाप हा नारळासारखा वरून टणक आणि आतून मऊ व पोषक असतो. आज जर तुला सूचना केल्या नाही, तर हे शल्य शेवटपर्यंत बोचत राहील. पूर्वी केलेल्या सूचना तुझ्या अल्लडपणामुळे ती तुला कटकट वाटली असेल. म्हणून त्याचं गांभीर्य तुला कळलं नसेल. यापुढे तुझे पंख विस्तारतील, त्यामुळे कदाचित तुझ्याकडे तेवढा वेळ नसेल. म्हणून आजची योग्य वेळ साधून मन, मोकळे करण्याचा प्रयत्न मी केला आहे. हे फक्त माझं रुदन नव्हे, तर जगातील प्रत्येक बापाचं आक्रंदन आहे. ते तू समजून घेऊन आपल्या बापाच्या आयुष्याच्या मरणकळा सुसह्य करशील, अशी अपेक्षा बाळगतो आणि तूर्तास थांबतो.
तुझा बाप
-भिमराव परघरमोल