महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
पाऊस : अवकाळी आणि...हंगामी
पाणी हे पावसापासूनच मिळते. हायड्रोजनचे दोन व ऑविसजनचा एक अणू मिळून पाणी बनते. मानवी जीवनाला नित्यनेमाने भरपूर प्रमाणात लागणारे पाणी हे असे प्रयोगशाळेत हायड्रोजन, ऑविसजन मिसळून तयार करता येत नाही. पावसाळ्यात आभाळात गडगडते, विजा चमकतात आणि पर्जन्य बरसतो त्यातून आपल्याला पाणी मिळते जे नद्या, तलाव, विहीरी, धरणे यांच्यामार्फत आपण टिकवून ठेवत वर्षभर वापरतो. जगात अंदाजे तीन चतुर्थांश जागेवर पाणी आहे व केवळ एक चतुर्थांशच जमिन आहे. पण ते सारेच तीन चतुर्थांश पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी आकाशाकडेच डोळे लावून बसावे लागते.
सदर लेख असलेला अंक वाचक वाचत असतील तेंव्हा कदाचित धो धो पाऊस असेलही किंवा नसेलही. उन्हाळ्याचा सालाबादप्रमाणेचा यंदाचा कोटा तसा ७ जूनपर्यंत बाकी असल्याने अवतीभवती कडक उनही पडलेले असू शकते. गेल्या सोळा वर्षातील मुदतीआधी पाऊस पडण्याची आणि त्याने सरकारी यंत्रणांना मोठ्या प्रमाणावर उघडे पाडण्याची ही पहिलीच मोठी घटना आहे. ‘अक्वालाईन' या मुंबई मेट्रोच्या भूमीगत रेल्वेच्या प्लॅटफार्मवर आणि रेल्वेच्या डब्यातही पाणी शिरण्याचा प्रकार घडून आला आहे. या दुर्घटनेच्या केवळ दोनच दिवस आधी मी पाहिले की पत्रकार ज्ञानदा कदम डोंबिवली ते आचार्य अत्रे चौक-वरळी हा प्रवास मुंबई उपनगरी रेल्वे, मेट्रो आणि मग ॲववालाईन रेल्वेने कसा केला ते वृत्तवाहिनीवरुन छायाचित्रणासह तपशीलवार सांगत होती. ही रेल्वे स्थानके कशी आहेत, या रेल्वेचे डबे किती मस्त आहेत, दोन गाड्यांमधील वेळेचे अंतर, वारंवारिता, सुरक्षा, प्रवासाच्या वेळेची बचत, गारेगारपणा वगैरे वगैरे मुद्दे तिने मांडले. त्या सगळ्यावर या पावसाने ढगभर पाणी ओतले. मेट्रो ३ च्या आचार्य अत्रे भुयारी रेल्वेस्थानकात पाणी साचून प्लॅटफार्मवरच जणू पूर आल्याची व त्यातून प्रवासी कसेबसे बाहेर येत असल्याची दृश्ये साऱ्यांनीच पाहिली.
त्यावर मग मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी प्रसारमाध्यमांवर दाखवण्यात येत असलेल्या दृश्यांवर शंका उपस्थित करुन यापैकी कोणत्याच स्थानकात पावसामुळे अडथळा आला नाही, पाणी साचले..पण तरीही योग्य ती काळजी घेतली गेली, या मार्गावरुन ४० हजार प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असा दावा करणारा व्हिडिओही जारी केला. पण तरीही भुयारी मार्गातून प्रवास करण्याचा धसका हा अनेकांनी घेतलाच. अनेक प्रवाशांना घेऊन प्रवास करणारी मेट्रो रेल्वेगाडी अशी भुयारातून भूमिगत मार्गातून धावत असताना सगळी मुंबई हीच मुळी पाण्यावर वसलेली असल्याने अचानक कुठल्यातरी बोगद्यातून पाणीगळती सुरु झाली आणि आख्खी रेल्वेगाडी त्यात अडकूनन पडली तर त्यांच्यापर्यंत पोहचणारी सुटकेची कोणती यंत्रणा कशी व किती परिणामकारकतेने राबवणार? या शंकेनेही छातीत धस्स होते. ती वेळ कधीही येऊच नये हीच प्रार्थना! मुंबई ही समुद्रकिनाऱ्यानजिक वसलेली नगरी आहे. खरे तर माहिम, वरळी, परळ, माझगाव, मुंबई, कुलाबा, छोटा कुलाबा या सात बेटांची बनलेली ही मुंबापुरी येथील आगरी, कोळी व भंडारी या भूमिपुत्रांचीच. मासेमारी, मीठ पिकवणे हेच त्यांचे पारंपारिक व्यवसाय. त्या सात बेेेटांचे एकत्रीकरण करुन ही महानगरी वसवली गेली. या बेटांदरम्यानचा समुद्र उथळ होता व ठिकठिकाणी खाजणे होती ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. जेराल्ड आंजिअर या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटीश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजवण्याचा व समुद्र हटवण्याचा (रिक्लमेशन?) निर्णय घेतला. त्याच्यानंतर तो टप्प्याटप्प्याने अंमलात येऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होत मुंबई बेटाची निर्मिती झाली, असे वर्णन वाचायला मिळते. भारतावर दीडशे वर्षे राज्य करुन भारताला लुटुन १५ ऑगस्ट १९४७ नंतर ब्रिटीश इंग्लंडला निघून गेले खरे; पण खाड्या/समुद्र बुजवणे, हटवणे याचे चटके आणि फटके मुंबईकर आजही सोसत आहेत. २६ जुलै २००५ रोजी याचा कठोर पडताळा मुंबईकरांनी घेतला. भारतीय देशी सत्ताधाऱ्यांनी इंग्रजांचीच री ओढत मुंबईतील समुद्र, खाड्या, नद्या, विहीरी, तलाव यांना बुजवून तेथे बांधकामे करण्याचा सिलसिला सुरु ठेवला. मग खाजणाच्या जागेवरचे, खाडीतले, समुद्रातले पाणी भरतीच्या वेळी जाणार तरी कुठे ? विविध बहुमजली इमारतींवर पडणारे पावसाळी पाणी साठवण्याच्या सोयी नसल्यास ते जाणार कुठे ? धो धो पाऊस पडला तर त्याचे पाणी शोषून घ्यायला मोकळ्या जमिनी नाहीत, शेते उरली नाहीत, मीठागरांच्या जमिनीसुध्दा बिल्डरांच्या घशात घालण्याची कारस्थाने सुरु झाली, जलाशय बुजवले, सिमेंट काँक्रीटची जंगले उभी केली, रस्तोरस्ती पेव्हर ब्लॉवस बसवले, झाडे तोडली, जंगले कापली, मोकळ्या जागा पाहुन तेथे परप्रांतीयांना झोपड्या बांधल्या. शहरातल्या झाडंासभोवती महापालिकेने काँक्रीटचे चौथरे बांधले. मग पावसाचे पाणी मुरावे कुठे ? ते पाणी मग घराघरांत शिरु लागले, रेल्वेस्थानके, बस स्थानके, इमारती, कार्यालये, व्यापारी संकुले यांना विळखा घालू लागले आणि त्यात जीव बुडुन मरु लागले. इंग्रजांनी त्यांच्या काळात कुर्ला ते रे रोड हा हार्बर रेल्वेमार्ग १२ डिसेंबर १९१० रोजी सुरु केला. त्यानंतर १९२५ साली डॉकयार्ड रोड ते सॅण्डहर्स्ट रोड असा उन्नत मार्ग उभारुन तो व्हीटी अर्थात आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसशी जोडला आणि १९५१ च्या सुमारास हा हार्बर रेल्वेमार्ग मानखुर्दपर्यंत विस्तारीत करण्यात आला. त्याला वाशीला पोहचण्यासाठी जून १९९२ पर्यंत प्रतिक्षा करावी लागली व जून १९९८ मध्ये तो पनवेलपर्यंत पोहचला.
हार्बर मार्गावरचे सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानक हे उन्नत (एलिव्हेटेड) आहे. मस्जिद बंदरपासून निघून वर चढलेला हार्बर रेल्वे मार्ग पुढे खाली उतरताना दिसत नाही. त्याची डॉकयार्ड रोड, रे रोड, कॉटन ग्रीन ही स्थानकेही उन्नतच आहेत. पुढची शिवडीपासूनची सारी स्थानके समुद्रसपाटीच्या उंचीवर असूनही जिथे चुनाभट्टी, कुर्ला या रेल्वेस्थानकांत दरवर्षी पावसाळ्यात पाणी साठून काही काळ रेल्वेसेवा बंद ठेवावी लागते हा इतिहास असताना मुंबईत भूमिगत, भुयारी, पाण्याखालील रेल्वेमार्ग बांधणे, अद्ययावत तंत्राने रेल्वे स्थानके बांधणे व ती कार्यान्वित ठेवणे हे एक मोठे आव्हानच आहे.
तर ते असो. प्रगतीची, विकासाची, आधुनिकतेची किंमत ही कुठेतरी चुकवावी लागणारच म्हणा! अनेकजण अनेक प्रकारच्या व्यवसायांवर आपले जीवन व्यतीत करीत असतात. तुम्ही कोणत्याही पेशात, व्यवसायात, नोकरीत, अर्थार्जन करण्याच्या कोणत्याही मार्गात असा. जीवन जगण्यासाठी हवा, पाणी आणि निवारा या गोष्टी लागतातच लागतात. त्यातील पाणी हे पावसापासूनच मिळते. हायड्रोजनचे दोन व ऑविसजनचा एक अणू मिळून पाणी बनते. पण मानवी जीवनाला नित्यनेमाने भरपूर प्रमाणात लागणारे पाणी हे असे प्रयोगशाळेत हायड्रोजन, ऑविसजन मिसळून तयार करता येत नाही. पावसाळ्यात आभाळात गडगडते, विजा चमकतात आणि पर्जन्य बरसतो त्यातून आपल्याला पाणी मिळते जे नद्या, तलाव, विहीरी, धरणे यांच्यामार्फत आपण टिकवून ठेवतो व वर्षभर वापरतो. या जगात अंदाजे तीन चतुर्थांश जागेवर पाणी आहे व केवळ एक चतुर्थांशच जमिन आहे. पण ते सारेच तीन चतुर्थांश पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी आकाशाकडेच डोळे लावून बसावे लागते. यंदा दोन दिवसात अवकाळी पावसाने राज्याची दैना करुन टाकली. मी वाशीमधील फुटपाथवरुन चालत असताना तेथे धंदे लावून बसलेल्या काही फेरीवाल्यांना पावसाला शिव्या देताना ऐकले. एक ओळखीचा फुलं-हारवाला पावसाला बोल लावत होता. ‘साला काय अधीच्या मधीच पाऊस टपकला. आमच्या रोजीरोटीची वाट लावून टाकली.' मी त्याला म्हटले...‘हे तू हार, फुलं विकतोस ना, ते इथं नवी मुंबईत फुटपाथवर उगवत नाहीत. ती फुलं लांब पार वसई, विरार, मुरबाड, बदलापूर येथे बागेत होतात. ती होण्यासाठी पाणी लागतं. ते पाणी या पावसामुळे मिळतं. त्या पावसाला शिव्या देशील तर उपाशीच मरशील की!' माझे हे बोल ऐकून तो हारवाला वरमला व स्वतःच्याच थोबाडीत मारुन घेत गप्प बसला. पुढे गेलो तर जांभूळ, फणसाचे गरे, अळू, लिची अशी फळे विकणारे फेरीवाले उभे होते. अवकाळी पावसामुळे ते बसण्याच्या नेहमीच्या जागेवर पाणी साठले होते. त्यामुळे ते पावसाचा उध्दार करत होते. त्यांनाही मी टोकले. ‘अरे बावळटांनो, ज्या झाडांची फळे विकून तुम्ही पोटं जाळता.. ती झाडं जगली, मोठी झाली, फळे देऊ लागली, सर्वांना सावली देऊ लागली. कशामुळे? तर हा पाऊस या धरित्रीवर पडतो त्याच्यामुळेच. तुमचे धंदे चालावेत यासाठी पावसाने रजा घेतली तर तुमच्यावर टाचा घासण्याची वेळ येईल. असे रस्त्यावर उभे राहुन धंदे करण्यापेक्षा स्वतःला लायक बनवा. जागा घ्या, व्यवस्थित दुकान थाटा, तिथे तुम्ही व्यवसाय करा. पावसाला त्याचे काम करु द्या. तुम्ही अनाड्यासारखी कामे करता, कसलेच वेळापत्रक पाळत नाही, कुठेही कचरा करता, कुठेही प्लॅस्टिक टाकता, महापालिकेचे नियम पाळत नाही, लोकांच्या येण्याजाण्याच्या वाटा अडवून धंदे थाटता आणि पावसाने मात्र ठराविक महिन्यातच पडावे आणि ठराविक महिन्यात गायब व्हावे ही अपेक्षा करता हे चूकच आहे की! तोही त्याचा दणका कुठेतरी दाखवून देणारच.'
हा अवकाळी पाऊसच नव्हे, तर ग्लोबल वार्मिंग, पर्यावरणाचा असमतोल, प्रदूषणाचा भस्मासूर हे सारे माणसांच्याच गैरवर्तनाचे, बेजबाबदारपणाचे परिणाम आहेत आणि आपण सुधारत नाही तोवर ते भोगावेच लागणार आहेत. ही सुधारण्याची बुध्दी साऱ्यांना लवकर होवो हीच सदिच्छा.
राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई