ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी-पालकांतर्फे दिवाळी वस्तू-फराळ प्रदर्शन
शक्तीला भक्तीची जोड असेल, तर विजय निश्चित!
भारत ही शक्ती आणि भक्तीची भूमी आहे. दृष्टांच्या संहारासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी इथे भगवंताने अनेकदा अवतार घेतले आहेत. ऋषीमुनींनी येथील व्यवस्था राखण्याचे काम केले आहे. साधू संतांनी सत्वशील समाज घडवण्यासाठी योगदान दिले आहे. रामायण-महाभारत किंवा कोणत्याही धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल की पूर्वी युद्ध सुरु होण्याअगोदर यज्ञयाग केले जात असत. या यज्ञयागांच्या माध्यमांतून विजयासाठी स्वर्गातील देवतांना आवाहन केले जात असे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची सिद्धता केल्याचे पाहून पाकिस्तानच्या सैन्यदलातील अनेक अधिकारी आणि सैनिकांनी नोकऱ्या सोडल्याचे वृत्त वाचनात आले होते. तर दुसरीकडे भारतात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे कळताच देशाच्या कानाकोपऱ्यातून अग्नीवर आणि सैनिक भारताच्या सीमेवर दाखल झाले होते ज्यामध्ये नुकतेच लग्न झालेले नवविवाहितसुद्धा होते आणि ज्यांच्या घरात कुणाचा तरी मृत्यू झाला होता असे शोकग्रस्तसुद्धा होते. मातृभूमीप्रती अपार आदर आणि भक्ती भारतीयांच्या रक्तातच असल्याने जेव्हा जेव्हा देशावर संकट चालून येते तेव्हा देशातील प्रत्येक नागरिक आपापल्या परीने काहीनाकाही करण्याचा प्रयत्न करत असतो. काहीच नाही, तर सैनिकांच्या प्राणांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना तरी नक्क्कीच करतो. ऑपरेशन सिंदूरचा वेळी आपण सर्वांनीच याचा अनुभव घेतला आहे. प्रत्येक भारतीय नागरिक हा आपला पक्ष, संघटना, जात-पात बाजूला ठेवून एक भारतीय म्हणून सैन्यबळाच्या रक्षणासाठी प्रार्थना करत होता, सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांनाही प्रार्थना करण्याचे आवाहन करत होता. प्रार्थनेत संघटन असते आणि संघटनेत बळ असते, ऊर्जा असते. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना ऊर्जा देण्याचे काम भारतीय नागरिक करत होते.
समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान असले पाहिजे'. कोणत्याही चळवळीला भगवंताचे अधिष्ठान असणे अत्यंत महत्वाचे असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात शिवपिंडीवर आपल्या रक्ताचा अभिषेक घालून घेतली. समर्थ रामदास स्वामी आणि संत तुकाराम महाराज अशा दोन महान विभूतींचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते. वेळोवेळी ते त्यांचे मार्गदर्शन घेत होते. जगदंब जगदंब' असा अखंड जप त्यांचा चालू असे. भवानी मातेचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते. साधुसंतांच्या आशिर्वादातून मिळालेले अध्यात्मिक बळ आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करण्याची सिद्धता असणारे मावळे यांच्या साहाय्याने छत्रपती शिवरायांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शून्यातून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. साक्षात जगद्गुरू भगवान श्रीकृष्णाचे सारथ्य आणि मार्गदर्शन यांच्या बळावर पांडवांनी कुरुक्षेत्रावर शंभर कौरवांना पराभूत करून विजय मिळवला. अर्जुनाचा कृष्ण कृष्ण' असा अखंड जप चालू असे. श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनामुळेच सर्व प्रकारच्या युद्धनीतीचा अवलंब करत १०० कौरवांसह त्यांच्या बलाढ्य सेनेला पराभूत करणे पांडवांना शक्य झाले. यत्र योगेश्वरः श्रीकृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिधर्रुवा नीर्तिमतिर्मम।। अर्थात ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत, जिथे गांडीवधारी धनुर्धर अर्जुन आहे तिथे विजय निश्चित आहे.
भगवंताच्या अस्तित्वामुळे न्याय नीती आणि धर्माचा विजय झाला. रामायण-महाभारत किंवा कोणत्याही धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल की पूर्वी युद्ध सुरु होण्याअगोदर यज्ञयाग केले जात असत. या यज्ञयागांच्या माध्यमांतून विजयासाठी स्वर्गातील देवतांना आवाहन केले जात असे. हिंदू धर्मातील देवतांच्या मूर्ती किंवा चित्र पाहिल्यास लक्षात येईल की प्रत्येक देवतेचा एक हात आशीर्वाद देणारा असला तरी अन्य हातांमध्ये देवतांनी कोणते ना कोणते शस्त्र आहे. या शस्त्रांचा वापर देवतांनी वेळप्रसंगी केल्याचे दाखले आपल्याला धर्मग्रंथांतून मिळतात. त्यामुळे हिंदू धर्म सहिष्णुतेची शिकवण देत असला तरी क्षात्रधर्म हासुद्धा हिंदू धर्माचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे युद्धाआधी देवतांना आवाहन करून त्यांचे आशीर्वाद घेण्याची, युद्धासाठी बळ पुरवण्याकरिता त्यांचे आशीर्वाद घेण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे.
पहलगाम हल्यानंतर ऑपरेशन सिंदुरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली. तीन दिवसांत पाकिस्तानला नामोहरम करून सोडले त्याचबरोबर पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईल यांद्वारे केलेले हल्लेही यशस्वीरीत्या परतवून लावले. दोन्ही देशांत सुरु झालेले युद्ध उग्र स्वरूप धारण करेल असे वाटत असतानाच अमेरिकेने हस्तक्षेप करून युद्धबंदी करण्यास लावली. त्याचवेळी कंगाल झालेल्या पाकिस्तानला नाणेनिधीकडून १ अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर करण्यात आले. पाकिस्तानचा आजतागायतचा इतिहास पाहता पाकिस्तानच्या कुरापती काही थांबणाऱ्या नाहीत. मिळालेल्या कर्जाचा वापर पाकिस्तान अस्त्र शस्त्र खरेदीसाठी करून बलशाली बनण्याचा प्रयत्न करेल आणि भारताच्या विरोधात भविष्यात युद्ध पुकारेल अशी शक्यता तज्ञ मंडळींकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भारतावरील युद्धाचे सावट काही दूर झालेले नाही. भविष्यात दोन्ही देशांत युद्ध झालेच तर आंतराराष्ट्रीय पातळीवर त्याचे मोठ्या प्रमाणात पडसाद उमटतील हे निश्चित आहे. भविष्यात अशा प्रकारचे युद्ध झाले तर त्यामध्ये भारताचा विजय व्हावा, सैनिकांचे रक्षण व्हावे यासाठी गोव्यात नुकताच शतचंडी यज्ञ पार पडला. विलासभुमी म्हणून ख्याती असणाऱ्या गोव्यात देश विदेशातून पर्यटक येतात ते मौजमजेसाठी. येथील समुद्रकिनारे नेहमीच गजबजलेले असतात. त्यासोबत ठिकठिकाणी मद्याच्या बाटल्यांचा खचही पडलेला असतो. अशा या विलासभुमीला गेल्या काही दिवसांपासून मात्र वेगळी ओळख मिळाली आहे. १७ ते १९ मे या कालावधीत गोव्याच्या फर्मागुडी परिसरात भव्य दिव्य असा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव संपन्न झाला ज्याकरिता देशविदेशातून सुमारे ३० हजार साधक आणि हिंदुत्वनिष्ठ गोव्यात आले होते. गोव्यातील समस्त हॉटेल्स, हॉल्स, मंदिरे या ठिकाणी हे भक्तगण तीन दिवस निवासाला होते. गोव्याचे मुख्यमंत्री मान. प्रमोद सावंत यांसह काही केंद्रीय मंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री या कार्यक्रमाला जातीने उपस्थित होते. देशभरातून अनेक संत महंत, कथावाचक, प्रवचनकार यांनी या महोत्सवाला उपस्थिती लावून मार्गदर्शन केले. तीन दिवस संपूर्ण गोवा भक्तिसागरात डुंबत होता. या महोत्सवाचाच एक भाग म्हणून २० ते २२ मे या कालावधीत या ठिकाणी शतचंडी यज्ञ पार पडला. शौर्याला भक्तीची जोड मिळाली की विजय निश्चित असतो त्याप्रमाणे भारताच्या विजयश्रीसाठी केलेल्या या शतचंडी यज्ञामुळे भारतीय सैन्याला नक्कीच ऊर्जा आणि बळ प्राप्त होऊन भविष्यात युद्ध झालेच तर भारताचा विजय निश्चित असेल यात शंका नाही ! -जगन घाणेकर