२८ मे - स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतीचे धुरीण,हिंदुत्वाच्या तत्वज्ञानाचे गाडे अभ्यासक,विज्ञानाचे पुरस्कर्ते, नामवंत कवी,प्रतिभावंत  साहित्यिक,जहालवादी वक्ते, जातीभेद-अंधश्रद्धेचे कट्टर विरोधक व कडवे देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर उर्फ विनायक दामोदर सावरकर यांना जयंती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली! वीर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगुर येथे २८ मे १८८३ रोजी दामोदर सावरकर यांच्या देशभक्त घराण्यात झाला अन्‌जणू काही क्रांतीकारकांचा मुकुटमणी उदयास आला.वास्तवात सावरकर यांचं घराणं म्हणजे क्रांतीकारकांची खाण म्हणावी.विनायकसह त्यांचे थोरले बंधू बाबाराव अन्‌धाकटे बंधू नारायणराव यांनीही आपलं सारं आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी पणाला लावलं.सावरकरांच्या आईचे नाव राधाबाई सावरकर तर, पत्नीचे नाव यमुनाबाई उर्फ माई. सावरकरांचे माध्यमिक शिक्षण नाशिक येथील शिवाजी विद्यालयात तर, उच्च शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. याशिवाय त्यांनी लंडन येथे बॅरिस्टरची पदवी संपादन करुन ते उच्च विद्याविभूषित बनले होते.

भारतभूमीला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी सावरकरांनी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं. सावरकरांचं घराणं हे देशभक्तांचं केंद्रस्थान होतं.परिणामी विनायकच्या हृदयात लहानपणापासूनच स्वातंत्र्याची ज्योत धगधगत होती.सावरकरांच्या मनावर जोसेफ मॅझिनी यांच्या ग्रंथाचा मोठा पगडा होता.वास्तवात या ग्रंथाच्या प्रेरणेतूनच त्यांनी सशस्त्र क्रांतीचा पवित्रा घेतला. या पुस्तकातील आत्मचरित्र सावरकरांनी मराठी भाषेत शब्दबद्ध केलं. हेच पुस्तक खऱ्या अर्थाने पुढे क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी ठरले. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज अन्‌ लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्तीचा आदर्श घेतला.त्यातूनच त्यांच्यात स्वराज्याची ओढ निर्माण झाली. या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून सावरकरांनी १८५७ चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला.दरम्यान क्रांतीवीर चाफेकर बंधूंना ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा दिल्याचे वृत्त कानी पडल्यावर कुलदेवता अष्टभुजादेवीला साकडे घालत, त्यांनी  मारिता.. मारिता... मरे तो झुंजेन ही प्रतिज्ञा घेतली.महत्वाचे म्हणजे वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांनी स्वदेशीचा फटका अन्‌ स्वतंत्रतेचं स्तोत्र या काव्य रचना लिहून जनमानसात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. एक सच्चा देशभक्त म्हणून भारतीयांच्या हृदयात आजही त्यांना मोठं मानाचं स्थान आहे.यास्तव सावरकरांना त्रिवार मानाचा मुजरा...!

वीर सावरकरांनी रोवली सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ

रोवण्याच्या उद्देशाने १ जानेवारी १९०० रोजी नाशिक येथे मित्रमेळा ही संघटना उभारली अन्‌त्यातील काही जहालवादी युवकांची निवड करून  १९०४ मध्ये अभिनव भारत ही संघटना उभारून त्यातील क्रांतीवीरांना सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली बॉम्ब बनविण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी खास पॅरिसला रवाना केलं.हिंदुत्वाच्या तत्वज्ञानाचा विरोध करणाऱ्यांनी अंधमानची भूमी खणून पहावी अन्‌त्यात सापडलेली हुतात्म्यांची हाडकं तपासून पहावीत,म्हणजे त्यांना हिंदूंच्या बलिदानाचा इतिहास कळून येईल, असं सावरकरांनी ठणकावून सांगितले. कुठल्या अन्‌कोणत्या देशभक्तांनी अंदमानच्या बेटावर काळ्या पाण्याची शिक्षा भोगली? याचं एका शब्दात उत्तर म्हणजे हिंदू असा त्यांनी निर्वाळा दिला.जीवनाच्या शेवटच्या घडीपर्यंत सावरकरांनी हिंदुत्वाची नाळ अटूट ठेवली.युवाशक्तीचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग वाढावा,या दृष्टिकोनातून त्यांनी समर, मॅझिनी,माझी जन्मठेप ही पुस्तके लिहून जांबाज भारतीय युवकांमध्ये वितरित केली.उल्लेखनीय बाब म्हणजे देशभक्तीपर लिहिलेल्या या ग्रंथांतून वीर भगतसिंग व त्यांच्या क्रांतिकारी अनुयायांना प्रेरणा मिळाली,तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेला बळ मिळालं.या पार्श्वभूमीवरच सावरकरांना क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणून भारत भूमीवर भूषविलं गेलं. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेला शह देण्याच्या हेतूने एक साफळा रचून क्रांतिकारी चाफेकर बंधूं यांनी पुण्यात आयुक्त रँडसह आयस्टरचा वध केला.तर नाशिकमध्ये क्रांतीवीर कान्हेरे, कर्वे, देशपांडे या विशीतल्या तरुणांनी कलेक्टर जॅक्सन याला ठार केलं. इतकेच नव्हे तर,क्रांतिकारी मदनलाल धिंग्रा यांनी अँड्रीयू फ्रेझर या जुलूमी अधिकाऱ्याचा गोळ्या झाडून खात्मा केला.  बंगालमध्ये खुदीराम बोस अन्‌ प्रफुल्ल चाकी या क्रांतीवीरांनी बंगालच्या फाळणीविरुद्ध तीव्र उठाव करून फोर्टवर बॉम्बहल्ला केला. अशा लागोपाठ हल्ल्यांमुळे ब्रिटिश गवर्नमेंट पार हादरलं. हाच खरा करिष्मा होता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा...

या पार्श्वभूमीवर देशांतर्गत अराजकता पसरविणे, ब्रिटिश अधिकाऱ्यांचा खून करणे,बॉम्बस्फोट घडविणे, प्रक्षोभक भाषणं करणे या गंभीर आरोपांखाली सूत्रधार म्हणून वीर सावरकरांना अटक होऊन त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. दरम्यान त्यांना लंडनहून सागरीमार्गे मोरिया बोटीतून मुंबईकडे नेतांना १ जुलै १९१० रोजी फ्रान्सच्या मोर्सेल्स बंदरावर सावरकरांनी मोठ्या शिताफीने पाण्यात उडी घेऊन पसार झाले.खरं तर,सावरकरांची ही उडी त्रिखंडात प्रचंड गाजली असून,आजही जनमानसात त्यावर चर्चा होत असताना दिसतं.वास्तवात हीच खरी शौर्यगाथा आहे.  दरम्यानच्या काळात ब्रिटिश अन्‌फ्रान्स सरकारच्या संयुक्त कारवाईत सावरकरांना अटक होऊन त्यांना विविध गुन्ह्यांखाली ५० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यातली १० वर्षे त्यांनी अंदमानच्या बेटावर काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. तथापि, या जुलुमी व अन्यायी शिक्षेविरुद्ध प्रचंड जनप्रक्षोभ उठल्याचे पाहून, ब्रिटिश सरकारने नरमाईची भूमिका घेत २ मे १९२१ रोजी सावरकरांची सुटका केली.या शिक्षेच्या सुनावणीदरम्यान सावरकरांना काही काळ ठाणे कारागृह मध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी ठाण्याहून प्रस्थान करतेप्रसंगी सावरकरांच्या दर्शनासाठी ठाणेकरांची रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी उसळली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे दर्शन घडण्यासाठी ठाणेकर रस्त्यावर सैरावैरा धावत होते.

भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी विविध देशांचे राष्ट्रप्रमुख, क्रांतिकारी संघटना अन्‌ तेथील अनिवासी भारतीयांकडून मदतीचा हात मिळावा, या उद्देशाने वीर सावरकरांनी फ्रान्स, जर्मनी, रशिया, हॉलंड, अमेरिका, जपान या देशांचे भूमिगत दौरे केले. तर दुसऱ्या बाजूने अभिनव भारत ही संघटना देशांतर्गत स्वातंत्र्य चळवळीसाठी सशस्त्र मोहीम राबवायची. सावरकरांना स्वातंत्र्य चळवळीत खुला पाठिंबा देणारे तसेच सावरकरांसह जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्यांमध्ये केशव चांदवडकर, गोपाळ पाटणकर, कृष्णाजी खरे,पुरुषोत्तम दांडेकर, गोपाळ धारप, सखाराम गोरे, श्रीधर शिंदे, वि.म.भट, दामोदर परांजपे, बळवंत बर्वे, विष्णू केळकर,सखाराम काशीकर, विनायक तिखे, दामोदर चंद्रात्रे, त्रिंबक मराठे, विनायक आमडेकर, व्यंकटेश नागपूरकर, गणेश सावरकर, नारायण सावरकर, बाबा सावरकर आदी क्रांतिकारकांचा समावेश होता. भारतमातेच्या या समस्त सपुतांना आम्हा मराठी भूमिपुत्रांचा त्रिवार मानाचा मुजरा! स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्राणपणाने लढलेल्या क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ वीर सावरकरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अभिनव भारत मंदीर चे १४ मे १९५३ रोजी त्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. महत्वाचे म्हणजे जाज्वल्य राष्ट्रप्रेम व निस्सीम देशभक्तीचं प्रतिक असलेल्या  स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित, ने मजसी ने परत मातृभूमीला...सागरा प्राण तळमळला...तळमळला सागरा! आणि जयो स्तुते श्रीमहामंगले शिवास्पदे सुखदा ! स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे! हे स्वातंत्र्य  स्तोत्र आजही आम्हा भारतीयांना प्रेरणादायी आहे.

भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेल्या महान योगदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना  मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करावा,अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अन्‌ शिवसेनेतील खासदारांनी केली आहे. वास्तवात हीच खरी त्यांना जयंती दिनानिमित्त मानवंदना ठरेल, अशी भावना लोकसभेचा खासदार या नात्याने मी व्यक्त करत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. वंदे मातरम! भारत माता की जय!जय महाराष्ट्र!
- नरेश म्हस्के, खासदार ठाणे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

सुवर्णमंदिर राखणारे सेनानी!