ईटीसी केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी-पालकांतर्फे दिवाळी वस्तू-फराळ प्रदर्शन
वाढदिवस आणि बायकोकडून सरप्राईज गिपट
जाणकार आणि अनुभवी मंडळी नेहमीच सांगतात की लग्न झाल्यानंतर ते आनंदात जगायचं असेल, तर बायकोला कुठल्याही गोष्टीकरता नाही' म्हणू नका. बायको समोर असली की फक्त हो.. हो.. हो... हो.... म्हणत राहायचं आणि मी नेहमीच तसंच करत असतो.
नुकताच म्हणजे २० मे ला माझा वाढदिवस सगळ्यांनी सुंदर सुंदर शुभेच्छा देऊन साजरा झाला. आता गिपट हा प्रकार हळूहळू मागे पडत चालला आहे. आणि खरंतर ते छानच आहे. माझ्या वाढदिवसाला बायकोने मात्र यावेळेस चक्क मला भलेमोठे असे सरप्राईज गिपट दिले आणि मला नाहीपण म्हणता येईना. कारण बायकोला नाही कसं म्हणणार?
आता बायकोने काय सरप्राईज गिपट दिले असेल, हे कोणालाही ओळखता येणे मात्र अशक्य आहे. कोणाला वाटलं, शर्ट आणला असेल/पॅन्ट आणली असेल/घड्याळ, मोबाईल असेल/योगा मॅट असेल /वगैरे वगैरे. पण यामधले काहीही नव्हते.
त्याचे झाले असे..वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सकाळी चहा पिताना बायको म्हणाली,
बायको : मला एकाला गुगल पे वर काही पैसे पाठवायचे आहेत. तुम्हाला नंबर दिला तर तुम्ही पाठवाल का?
कुणाला पाठवायचे आहेत ?
कशाला पाठवायचे आहेत?
आणि एवढे कशाकरता?
यापैकी काहीही विचारणार नसाल तर सांगते. गुगल पे वर ॲड नोटच्या खाली माझं नाव टाकायचं.
मी (मनात) : बायकोला खुश करण्याकरता याच्याहून सोपा मार्ग काय असणार आहे ! तज्ञ नेहमीच सांगत असतात की बायकोला खुश करण्याची कुठलीही संधी सोडू नका. त्यामुळे मीपण कुठलीच संधी सोडत नसतो.
मी : नंबर सांग
बायकोने नंबर सांगितला आणि अमाऊंट सांगितली.. १८,३००. मी बायकोने सांगितल्याप्रमाणे पेमेंटची प्रोसिजर पूर्ण केली आणि विषय संपला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २० तारखेला वाढदिवस असल्यामुळे सकाळपासून फोन आणि मेसेजेस सुरू होते. त्यामुळे घरात इकडे तिकडे बघायला वेळच नव्हता. आंघोळी आटोपल्यानंतर नेहमीप्रमाणे वॉशिंग मशीन सुरू करायला मी धुण्याचे कपडे घेऊन वरच्या मजल्यावर गेलो आणि बघतो तर जुन्या मशीनच्या ठिकाणी गोदरेजचे टॉप लोडिंग चकाचक नवीन वॉशिंग मशीन. मला समजेना. काल इथे आधीचं मशीन होतं आणि मी घरात असूनही मला काहीही पत्ता न लागता आज इथे एकदम नवीन मशीन कसं काय !
मी बायकोला वरती येण्याकरता हाक मारली. मी वर बोलावणार आहे ही कल्पना बायकोला असणार ! त्यामुळे लगेचच बायको वर आली
मी : मशीनकडे बघत - अगं, हा काय चमत्कार आहे?
बायको : चमत्कार काहीही नाही. तुम्हाला हे वाढदिवसाबद्दल माझ्याकडून गिपट आहे.
Happy birthday my dear Sudhir.
(बायको कडून चक्क इंग्रजीमध्ये शुभेच्छा, आणि आणि त्या पण सुधीर या एकेरी नावाने, हे ऐकून मी शुद्धीत आहे, ही खात्री करण्याकरता मी स्वतःला चिमटा काढला)
बायको : आजपासून नवीन मशीनमध्ये कपडे वॉश करत चला. छान वाटेल आणि मजा येईल.
मी अगं, आपलं आधीचं मशीन छानच होतं. काहीही प्रॉब्लेम नव्हता.
बायको : आधीच मशीन छान होते हे मान्य आहे. पण त्याला घेऊन आता १५ वर्षे झाली होती. आपली स्कूटर जुनी झाली, की, ती चांगली असली, तरी आपण ज्ेाुनी काढून नवीन घेतोच ना ! का ? तर नवीन स्कूटर चालवताना एक वेगळाच आनंद मिळतो. तुम्ही रोज कपडे धुण्याकरता वॉशिंग मशीन वापरता. जुनी मशीन बदलून नवीन घेतली तर तुम्हाला रोज मशीन लावताना वेगळाच आनंद घेता येईल. म्हणून मी तुमच्या वाढदिवसाचा योग साधून तुमच्याकरता हे नवीन मशीन मागवलं.
मी : अगं, पण मशीन मागवलं कधी आणि आलं कधी ! आणि हे ऑर्डरचं काम कोणी केलं ? आणि मशीनचा बॉक्स कुठे आहे, थर्मोकोल, प्लास्टिक पिशव्या वगैरे कुठे आहे. कारण ते डिस्पोज ऑफ करणे हा पण एक प्रॉब्लेमच असतो.
बायको : ते मला माहित होतं. म्हणून मी तो प्रॉब्लेमपण आधीच सोडवला आहे. काल मशीन ऑर्डर करताना मी तिथल्या मॅडमना सांगितले होते, की नवीन मशीनच्या बॉक्समध्येच जुने मशीन घेऊन जायचं आणि त्यामध्ये सर्व थर्माकोल वगैरेपण घेऊन जायचं आणि त्यांनी तसं केलं, त्यामुळे we have only new machine in the house and nothing else
मी (मनात) : आज बायको एकदम इंग्रजी मध्ये कशी काय ? इतक्या वर्षांमध्ये बायको इंग्रजी मध्ये कधीच बोलली नव्हती. काय प्रकार असावा !
मी : तू ऑर्डर कशी केली वगैरे सांगणार होतीस.
बायको : सगळं सांगते. आजच्या दिवस मी मशीन सुरू करते. कारण तुम्हाला या नवीन मॉडेलची बटनं वगैरे काहीच माहिती नसणार आणि मग खाली चहा पिताना सगळे सांगते आणि मशीन च्या बटनांबद्दलपण सगळी माहिती सांगते.
बायकोना तिला मशीनची सगळी माहिती आहे अशा थाटात निरनिराळी बटन दाबून मशीन सुरू केले आणि आम्ही खाली आलो.
मी (मनात) : मशीन खरच सुंदर आहे. आत्ता मशीन सुरू आहे, पण आवाज अगदी नाहीच्या बरोबर आहे.
चहा पिताना -
बायको : दोन दिवसांपूर्वी गोदरेज कंपनीचा माझ्या मोबाईलवर फोन आला. माझा नंबर त्यांना कसा मिळाला माहित नाही. तिकडच्या मॅडम म्हणाल्या - तुमचं मशीन २००८ सालचं आहे. आमच्याकडे छान एक्सचेंज ऑफर आहे. तुमचं मशीन आम्ही बाय बॅक करू. आणि त्याच स्टाईल मधलं लेटेस्ट मॉडेल तुम्हाला देऊ. वॉरंटी चार वर्षांची राहील.
मशीन घरी पोहोचल्यानंतर आमचे इंजिनियर येऊन तुम्हाला डेमो देतील. तुम्हाला पाहिजे असल्यास आम्ही तुम्हाला उद्याच डिलिव्हरी देतो. तुम्ही फक्त आम्हाला १८३००रु. गुगल पे वर पाठवायचे. मशीन एकदम उत्तम आहे, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही ही गॅरंटी.
मला त्यांचे बोलणे पटले. मी लगेच ओके म्हटले आणि आणि सांगितले की उद्या दुपारी दोन ते पाच या दरम्यानचं मशीन घरी आली पाहिजे आणि पूर्ण डेमोपण झाला पाहिजे. मला नवऱ्याला सरप्राईज द्यायचे आहे. मशीन वेळेमध्ये येणे आणि इंजिनीयर पण त्याच वेळेला येणे हे मात्र महत्त्वाचे आहे. उद्या सकाळी पैसे पाठवते गुगल पेवर. तिकडून ओके आला.
काल सकाळी तुमच्याकडून पेमेंट झाले, दुपारी दोन ते पाच या तुमच्या झोपेच्या वेळेत मशीन घरी येऊन डेमोपण झाला. मला मशीन खूपच आवडले.
लग्न झाल्यानंतर इतके वाढदिवस झाले पण तुम्हाला असे सरप्राईज गिपट देण्याची ही पहिलीच संधी मला छान मिळाली.
सुंदर आणि आगळीवेगळी गिपट दिल्याबद्दल मी बायकोचे आभार मानले आणि मशीन खरोखरच सुंदर आहे हेपण तिला सांगितले.
आणि महत्त्वाचे म्हणजे ही संपूर्ण डील एका आलेल्या फोन कॉलच्या आधारावर आणि तिथे लगेच पैसे पाठवून, तिने एकटीने कोणाचीही मदत न घेता फोनवर पाच एक मिनिटात केली/मी घरात असूनही मला मशीनबद्दल काहीही पत्ता न लागू देता केली/घरात मशीन येईल पण त्याबरोबरचे थर्माकोल, खोके वगैरे असे वेस्ट घरात राहणार नाही, हेपण प्लॅनिंग तिने केले, याबद्दल तिचे मी खास कौतुक केले आणि तिच्या करता टाळ्या वाजवल्या.
बायको : thank you very much my dear for yout appreciation and compliments.
मी बायकोला : तू रोज भजनाच्या क्लासला जातेस. हे मला माहित आहे. पण रोज भजनाचाच क्लास असतो, का एक दिवसाआड तू कुठे हाऊस मॅनेजमेंटमध्ये MBA पण करते आहेस का ! आणि स्पोकन इंग्लिशचापण कुठला क्लास लावला आहेस का ?
बायकोने हसत हसत यावर उत्तर इंग्रजीमध्येच दिले - wait and watch. नंतर बायकोने माझा मशीनबरोबर फोटो काढला आणि मशीन मला हॅन्ड ओव्हर केले. - सुधीर करंदीकर