मध्यवर्ती रुग्णालयातील डायलेसिस विभागाला घरघर

शासनाच्या दुर्लक्षामुळे डायलेसिस विभाग बंद होण्याची भिती

उल्हासनगर : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील डायलेसिस या अत्यंत संवेदनशील विभागात पिण्याच्या पाण्याच्या आरओ फिल्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे रुग्णांना कधी ठाण्यातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये तर कधी अंबरनाथ एमआयडीसी मधील आनंद परिसरातील विजय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्ण ने-आण करण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, आरओ फिल्टरची टाकी दुरुस्त न केल्यास सदर विभाग कधीही बंद होऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात डायलेसिस मशीनमध्ये आरओ फिल्टरचे पाणी वापरले जाते. त्यासाठी २०१४-२०१५ मध्ये हॉस्पिटलमध्ये टाकी बसवण्यात आली होती. त्याद्वारे ८ डायलेसिस मशिनच्या सहाय्याने तीन शिपटमध्ये दररोज २४ ते २५ किडनी रुग्णांचे डायलेसिस केले जाते. आतापर्यंत २ वेळा मशिन बंद पडल्याने रुग्णांना एकदा ठाणे सिव्हील हॉस्पिटलमध्ये तर दुसऱ्या वेळी अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी मधील विजय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. त्यामुळे किडनीच्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये वेळ, पैसा, येण्या-जाण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.  

आरओ फिल्टर टाकी वेळीच दुरुस्त केले असते तर किडनीच्या रुग्णांना एवढा त्रास आणि त्रास सहन करावा लागला नसता.  डायलेसिस रुग्णांच्या आजारांबाबत रुग्णालय प्रशासन आणि राज्य शासनाचा आरोग्य विभाग किती जागरुक आणि गांभिर्याने बघतो आहे, ते नादुरुस्त असलेल्या आरओ फिल्टरच्या टाकीतील बिघाडावरुन कळू शकते, अशी खंत स्थानिक समाजसेवकाने व्यक्त केली आहे.

यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशिवाय स्थानिक आमदार कुमार आयलानी यांना १ जानेवारी २०२५ रोजी लेखी स्वरुपात आम्ही माहिती दिली आहे. तर आ. कुमार आयलानी यांनी २ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना योग्य ती सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत पत्र दिले आहे.
-डॉ. मनोहर बनसोडे, सिव्हील सर्जन, मध्यवर्ती रुग्णालय, उल्हासनगर. 

Read Previous

क्लाऊड नाईन रुग्णालयाला महापालिकेची नोटीस

Read Next

‘अशाने एक दिवस भारत कॅन्सरची कॅपिटल बनण्याची भिती'