महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
पंधरा मजली इमारतीत रक्ताच्या कर्करोग्यांवरील उपचारांकरिता वाढीव ४३० खाटा
नवी मुंबई : टाटा मेमोरियल संचालित खारघर येथील सेन्ट्रल पार्क जवळ असणाऱ्या ACTREC मध्ये २०२५ च्या अखेरपर्यंत नवीन पंधरा मजली इमारत उभारण्यात येत असून त्यात वाढीव ४३० खाटा रक्ताच्या कर्करोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना लाभणार आहेत. तसेच कर्करोग हा आपल्यासोबत इतर अनेक विकारांना घेऊन येत असल्याने त्यांच्यावरही उपचार एकाच जागी करता यावेत यासाठी बारा मजली मल्टिस्पेशालिटी ब्लॉकचीही उभारणी सुरु असून २०२७ पर्यंत तेही वापरात आणण्याचे प्रस्तावित आहे.
४ फेब्रुवारी रोजी असणाऱ्या कॅन्सर दिनानिमित्त ACTREC कडून सांगण्यात आले की कॅन्सरचा तपास, निदान, उपचार हे सारे टप्पे रुग्णांसाठी अत्यंत महत्वाचे असतात; त्याचप्रमाणे ते त्यांच्या नातेवाईकांसाठीही. परळ येथे टाटा मेमोरियल हॉस्पिटल, त्यानंतर १९५२ मध्ये इंडियन कॅन्सर रिसर्च सेन्टर, मग २००१ मध्ये खारघर येथे ACTREC ची स्थापना, २००५ मध्ये तेथे ५० खाटांचे हॉस्पिटल, २०१३ मध्ये ५०० खाटांचे हॉस्पिटल असा टप्पा गाठणारे हे हॉस्पिटल केवळ भारतातच नव्हे तर आशिया खंडात नावाजले असून विविध ठिकाणांहुन येथे कर्करोगी व त्यांच्या नातेवाईकांचे येणे होत असते. वर्षाला साधारणपणे येथे ३५ हजार कर्करुग्ण दाखल होतात. त्यातील ८० % रुग्ण हे आर्थिकदृट्या कमकुवत गटातील असतात. एका वर्षाच्या कालावधीत येथे ७००० मेजर ऑन्को सर्जरी पार पडतात तर १००च्या आसपास बोन मॅरो ट्रन्स्पलान्ट केल्या जातात. २०२४ या वर्षात येथे ब्रेस्ट कॅन्सरच्या १६८० तर डोके व मानेच्या १४६४, मोठ्या आतड्याच्या १०१२ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आर्थिक दुर्बल घटकांसाठी या हॉस्पिटलमध्ये विविध माध्यमांतून सवलती देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी डॉ. नितिन शेट्टी, डॉ. अजय अगरवाल, डॉ. तेजपाल, डॉ. भट, डॉ. सुधीर नायर, डॉ.अरुण देशपांडे हजर होते.