‘ठामपा'चे रेबीजमुक्त ठाणे अभियान

२९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान लसीकरण मोहिम

ठाणे : ठाणे महापालिका आणि मिशन रेबीज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका क्षेत्रात ‘रेबीजमुक्त ठाणेे' अभियान राबविण्यात येत आहे. ‘रेबीज'ची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणे तसेच रेबीज विषाणुच्या प्रसाराचे चक्र तोडणे, यासाठी सदर अभियान राबिवण्यात येणार आहे. या ‘अभियान'मध्ये २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या काळात १० हजार भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. गेल्यावर्षी ७ हजाराहुन अधिक श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात आले होते.

सदर उपक्रमात ठाणे सीपीसीए, इंडियन सोसायटी फॉर व्हेटर्नरी ॲनिमल प्रोटेक्शन, सिटीझन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन, व्हीटीईएएमएस आणि पीएडब्ल्यू आशिया या संस्थाचे सहकार्य मिळणार आहे. भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे ‘रेबीज'ची लागण होऊन संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो. अशा मृत्युचे प्रमाण २०३०पर्यंत शून्यावर आण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विशेष अभियान राबवून त्यात भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात येते. गेल्यावर्षी ठाणे महापालिकेने ७,४०९ भटक्या श्वानांना ‘रेबीज'ची लस दिली होती. यंदाच्या वर्षातही महापालिकेकडून सदर अभियान राबविण्यात येणार आहे.

लसीकरणासाठी २५ पथके...

ठाणे महापालिका क्षेत्रात या वर्षी १० हजार श्वानांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. लसीकरणासाठी एकूण २५ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक डॉक्टर आणि तीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. भटक्या श्वानांकडून चावा घेण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भागांची माहिती शहरातील नागरिक तसेच प्राणी मित्रांकडून जमा करण्यात आली असून त्याआधारे विभागवार लसीकरण मोहिमेचे नियोजन केले आहे, अशी माहिती पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर यांनी दिली. 

Read Previous

क्लाऊड नाईन रुग्णालयाला महापालिकेची नोटीस

Read Next

पंधरा मजली इमारतीत रक्ताच्या कर्करोग्यांवरील उपचारांकरिता वाढीव ४३० खाटा