महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नमुंमपाच्या नेरूळ रूग्णालयातील कॅन्सर डे केअर सेंटरमध्ये पहिल्या रूग्णावर केमोथेरपी उपचार
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना कॅन्सर संबधित उपचारांकरिता खाजगी रुग्णालयांमध्ये अथवा टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे उपचारार्थ जावे लागते. त्यामुळे अनेकदा रहिवाशांची अडचण होते. ही बाब लक्षात घेत महापालिकेच्या वतीने कॅन्सर रूग्णांकरिता अत्यंत महत्वाची अशी केमोथेरपी सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे हे आग्रही होते.
त्या अनुषंगाने नमुंमपाच्या आरोग्य विभागाने गतीमान पावले उचलत टाटा ॲक्ट्रेक (TATA ACTREC) यांच्या समन्वयातून नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयात 10 रूग्णखाटांची डे केअर केमोथेरपी युनीट (Day Care Chemotheropy Unit ) सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
या कॅन्सर डे केअर सेंटरमध्ये पहिला रूग्ण संदर्भित होऊन या रूग्णावर केमोथेरपी उपचार करण्यात आला आणि या सेंटरमध्ये प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरूवात झाली. यावेळी महापालिकेच्या वैद्यकिय समुहासह टाटा ॲक्ट्रेक यांचाही वैद्यकिय समुह उपस्थित होता.
डे केअर केमोथेरपी ही सध्याची प्रभावी आणि रुग्णकेंद्रित उपचार पद्धती असून ज्यामुळे केमोथेरपीसाठी नियमित हॉस्पिटलायझेशनची गरज कमी करते. त्यामुळे रुग्णाच्या वेळेची व साधनांची बचत होते. याच उद्देशाने नमुंमपाच्या आरोग्य विभागांतर्गत माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरुळ येथे टाटा ॲक्ट्रेक यांचे समन्वयाने 10 रुग्णखाटांचे डे केअर केमोथेरपी युनीट सुरु करण्यात आले आहे.
नेरूळ रूग्णालयामध्ये हे डे केअर सेंटर सकाळी 8 वाजल्यापासून कार्यान्वित राहील. रुग्णांवर उपचाराकरिता येथे फिजीशिअन, स्टाफ नर्सेस व आवश्यकतेनुसार इतर विशेषज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत. हे डे केअर सेंटर सुरु करणेकरिता कॅन्सर उपचार संबधित सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना टाटा ॲक्ट्रेक, खारघर येथे प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात आले होते. सॉलीड ट्युमर्स (Solid Tumors) च्या रुग्णांवर या डे केअर सेंटर (Day Care center) मध्ये उपचार करण्यात येणार आहेत.
सदर उपचाराचे निदान व केमोथेरपीचा पहिला डोस टाटा अँक्ट्रेक येथे देण्यात येईल व रुग्ण हायमोडायनॅमिकली स्टेबल (Haemodynamically stable) असल्यास व ज्या रुग्णांना अतिदक्षता विभागाची (ICU) आवश्यकता नसेल अशा नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांना केमोथेरपीच्या (Chemotherapy) दुस-या डोसपासून या डे केअर सेंटरमध्ये उपचार दिले जातील.
यामुळे नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवाशांना टाटा रुग्णालयापर्यंत जावे न लागता नवी मुंबईतच नमुंमपाच्या नेरूळ येथील सार्वजनिक रुग्णालयात औषधोपचाराचा लाभ घेता येईल. त्यामुळे टाटा रुग्णालयात दीर्घ काळाच्या प्रतिक्षेनंतर अपॉईंटमेंट मिळाल्यावर उपचारांकरिता अगदी पहाटेसुध्दा उठून जाण्याची व दिवसभर रांगेत थांबण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे नवी मुंबईतील कर्करोगाच्या रुग्णांना होणारा शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास कमी होणार आहे.