महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नवी मुंबईतून वयात आलेल्या मुलींच्या अपहरणात वाढ
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या हद्दीतून १४ ते १७ या वयोगटातील अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गत ७ महिन्यांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या हद्दीतून १९५ अल्पवयीन मुली अशा पध्दतीने बेपत्ता झाल्याचे उडकीस आले आहे. यातील १७२ मुलींना शोधण्यात नवी मुंबर्ई पोलिसांना यश आले असले तरी अल्पवयीन मुलींना विशेषतः वयात आलेल्या मुलींना फुस लावून, तसेच लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पोलिसांसह सर्वच थरातून चिंता व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या हद्दीत जानेवारी २०२३ पासून जुलै २०२३ या दिड वर्षाच्या कालावधीत सुमारे ६०० अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली आहे. यात ४०० पेक्षा अधिक अल्पवयीन मुलींची संख्या आहे. यातील सुमारे ५६० मुला-मुलींचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष तसेच स्थानिक पोलिसांना यश आले आहे. अपहरण झालेल्या मुलींपैकी बहुतेक मुली या १४ ते १७ या वयोगटातील असून बहुतांश मुलींना प्रेमप्रकरणातून तसेच लग्नाचे आमिष दाखवून त्यांना फुस लावून पळवून नेण्यात आल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले आहे. यातील अनेक अल्पवयीन मुलींनी प्रेम प्रकरणातून लग्न देखील केल्याचे आढळून आले आहे.
मुलींप्रमाणेच मुले बेपत्ता होण्याच्या घटना देखील वाढत असून गत साडे पाच वर्षांमध्ये सुमारे ५०० मुले बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. यातील ४७० मुलांचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष तसेच स्थानिक पोलिसांनी शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात केले आहे. यातील बहुतांश मुले आई-वडील अभ्यासावरुन रागावल्यामुळे, गेम खेळू न दिल्यामुळे, परीक्षेत नापास होण्याच्या भितीने तर काही मुले इतर किरकोळ कारणावरुन रागाच्या भरात घर सोडून गेल्याचे तर काही मुले मौज-मस्ती म्हणून, घर सोडून निघून गेल्याचे तपासात आढळून आले आहे.
मागील ५ वर्षामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्यातील शंभरहुन अधिक गुन्हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अल्पावधितच उघडकीस आणून अपहृत मुलांना शोधण्याचे काम केले आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने जानेवारी ते १२ ऑगस्ट २०२३ या साडे सात महिन्याच्या कालावधीत दाखल झालेल्या एकूण २८२ अपहरणाच्या गुह्यांपैकी २४८ गुन्हे उघडकीस आणून त्यातील १७२ मुली आणि ७६ मुलांना शोधून काढले आहे. तसेच त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. यातील १९ गुन्हे पोक्सोसाठी वर्ग करण्यात आले आहेत. या वर्षातील उर्वरीत ३४ अपहरणांच्या गुह्यातील अपह्रत मुला-मुलींचा शोध घेण्याचे काम अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून सुरु आहे.
झोपडपट्टी भागात सर्वाधिक अपहरणाचे प्रकार...
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या हद्दीत ज्या भागात झोपडपट्टी आणि मध्यमवर्गीय वस्ती आहे, अशा भागात अल्पवयीन मुले आणि मुलींच्या अपहरणाचे प्रकार सर्वात जास्त घडत असल्याचे आढळून आले आहे. यातील रबाले, कोपरखैरणे, पनवेल शहर, रबाले एमआयडीसी, तुर्भे एमआयडीसी आणि तळोजा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वात जास्त मुला-मुलींच्या अपहरणाचे प्रकार घडत आहेत. इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना कमी घडत असल्याचे आकडेवारी वरुन दिसून येत आहे.
विशेष कक्षाकडून क्लिष्ट गुह्यांचा तपास...
नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गेल्या ५ वर्षामध्ये दाखल झालेल्या अपहरणाच्या अनेक क्लिष्ट गुह्यांचा तपास करुन अपहरण झालेल्या मुला-मुलींचा शोध घेतला आहे. अपहरण झालेल्या आणि परराज्यात जाऊन राहणाऱ्या मुला-मुलींची कुठल्याच प्रकारची माहिती नसताना, त्यांचा ठावठिकाणा शोधणे जिकरीचे असल्याने सदर अपह्रत मुला-मुलींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षासमोर आहे. अपहरण झालेल्या मुला-मुलींचे समुदेशन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने शोध घेण्यात आलेल्या मुला-मुलींचे समुपदेशन देखील पोलिसांनाच करावे लागत आहे.
अल्पवयीन मुले-मुली वेगवेगळ्या कारणामुळे घर सोडून निघून जात असल्याचे आढळून आले आहे. यातील अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या बहुतेक घटना या प्रेमप्रकरणातून घडल्याचे आढळून आले आहे. यासाठी पालकांनी आपल्या मुलांसोबत संवाद साधणे तसेच त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गत साडे सात महिन्यात घडलेल्या अशा प्रकारच्या २८२ घटनेतील १७२ मुली आणि ७६ मुलांना शोधून काढण्यात यश आले आहे. उर्वरीत ३४ गुन्ह्यातील मुला-मुलींचा शोध घेण्याचे काम अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाकडून सुरु आहे. -पृथ्वीराज घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष.