महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
अश्विनी बिद्रे यांच्या हत्येवेळी राजू पाटील कुरुंदकर सोबतच
पनवेल : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या ज्या दिवशी झाली, त्याच दिवशी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजू पाटील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्याबरोबर मीरा-रोडमध्ये होता, असा जबाब ‘भाजपा'चे आमदार संजय सावकारे आणि व्यापारी किरण महाजन यांनी दिला आहे. या जबाबांवर आरोपींच्या बाजुने कोणताही आक्षेप घेण्यात आला नाही, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पनवेल न्यायालयात केला. त्यामुळे आरोपींच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाबाबत वकिलांचा अंतिम युक्तिवाद सध्या पनवेल सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात सुरु आहे. १७ ऑगस्ट रोजी आरोपीच्या वकिलांनी राजू पाटील याला भाईंदर येथे घेऊन जाणारा टॅक्सी चालक ‘दुबे' नव्हता, असा युक्तिवाद केला. उलटतपासणीत विशेष सरकारी वकिलांनी आरोपींच्या वकिलांनी आमदार संजय सावकारे आणि किरण महाजन यांची उलटतपासणी केली पाहिजे होती. ती का केली नाही, असा युक्तिवाद केला. तसेच टॅक्सी चालक ‘दुबे' कसा खरा आहे, ते सत्र न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला.
राजू पाटील अंधेरीतील जिप्सी बार मधून निघून दुबेच्या टॅक्सीने अभय कुरुंदकर राहत असलेल्या बिल्डींगमध्ये गेला. थोड्या वेळाने तो परत आला. त्यावेळेस राजू पाटील बरोबर कुरुंदकर होता. यावरुनच अश्विनी बिद्रेच्या हत्येवेळी तो कुरुंदकर यांच्याबरोबर होता ते सिध्द होते, असे सरकारी वकीलांनी आपल्या युक्तीवादात सांगितले. यावेळी न्यायालयात अश्विनी यांचे पती राजू गोरे, आरोपी आणि आरोपींचे वकील हजर होते.
कुरुंदकरची बनवेगिरी उघड...
हत्याकांडानंतरही कुरुंदकर याने अश्विनी जिवंत असल्याचे भासवण्यासाठी त्यांच्या मोबाईलवरुन मेसेज पाठवला होता. त्यात त्याने ‘यू' या शब्दासाठी ‘यू' अक्षराऐवजी ‘वाय' या अक्षराचा वापर केला. अश्विनी या नेहमी ‘यू' शब्द लिहिण्याऐवजी ‘यू' हे अक्षर लिहीत होत्या. कुरुंदकर मात्र ‘यू' शब्दासाठी ‘वाय' अक्षर वापरत होता. सदर बाब सुध्दा सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
केला खोटा नाईट राऊंड...
ज्या दिवशी अभय कुरुंदकर याने अश्विनी यांची हत्या केली, त्या दिवशी त्याने स्वतः नाईट राऊंड केल्याचे पेपर तयार केले होते. मात्र, सदर नाईट राऊंड खोटा असल्याचे दोन्ही वाहन चालकांच्या जबाबात उघडकीस आले आहे. या जबाबांवर आरोपीच्या वकिलांनी कोणतीही हरकत न घेता ते जबाब मान्य केले आहे. त्यामुळे नाईट राऊंड खोटा होता, यावर शिक्कामोर्तब झाल्याचे घरत यावेळी म्हणाले.