‘अटल सेतू'वरुन पडणाऱ्या महिलेचा बचाव

नवी मुंबई  ः ‘अटल सेतू'वरून उडी टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आणि ब्रिजच्या रेलिंगला लटकलेल्या ५६ वर्षीय महिलेला कॅब चालकाने आणि न्हावाशेवा वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदारांनी वाचविल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. खाडीमध्ये फोटो टाकताना तोल गेल्यामुळे पडल्याचे सदर महिलेने पोलिसांना सांगितले आहे.

या घटनेतील ५६ वर्षीय महिला मुलुंड येथे राहण्यास असून १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ती कॅब ओला स्विपट डिझायर टॅक्सीने अटल सेतू ब्रिजवरुन मुंबईकडून शेलगर टोल नाक्याकडे जात होती. याचवेळी सदर महिलेने चालकाला कार थांबवण्यास सांगितले. त्यानंतर ती ‘अटल सेतू'च्या रेलिंगवर चढली असता ती खाली पडली. मात्र, याचवेळी कॅब चालक संजय द्वारका यादव (३१) याने वेळीच तीला पकडले. यावेळी सदर महिला ब्रिजच्या रेलिंगला लटकून राहिली.

सदर बाब अटल सेतू टोल नाक्यावरील सीसीटिव्ही कमांड सेंटर मधील कर्मचाऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ याची सूचना न्हावा-शेवा वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदाराना दिली. त्यानंतर न्हावाशेवा वाहतूक शाखेतील पेट्रोलिंग-१ वाहनावर कार्यरत असलेले पोलीस नाईक ललित शिरसाठ, किरण मात्रे आणि पोलीस शिपाई यश सोनवणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस अंमलदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कसोशीने प्रयत्न करीत सदर महिलेला सुरक्षितपणे वर काढले. त्यांनतर पोलिसांनी या महिलेची चौकशी केली असता, खाडीमध्ये देवाचे फोटो टाकण्यासाठी गेली असताना तिचा तोल गेल्यामुळे ती पडल्याचे आणि त्यावेळी तिने रेलिंग पकडल्याचे पोलिसांना सांगितले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 अश्विनी बिद्रे यांच्या हत्येवेळी राजू पाटील कुरुंदकर सोबतच