नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी नवी मुंबई पोलिसांचे व्हॉटस्‌ॲप चॅनल

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी समाज माध्यमाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी नवी मुंबई पोलीस नावाचे व्हॉटस्‌ॲप चॅनल सुरु करण्यात आले आहे. या चॅनेलवरुन सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, अंमली पदार्थ विरोधी गुन्हे, महिला सुरक्षा संदर्भात जनजागृती करण्यात येणार असुन नवी मुंबई पोलिसांच्या या व्हॉटसॲप चॅनेलचे येत्या १४ ऑगस्ट रोजी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुवला यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. त्यानंतर या चॅनलवर दररोज जनजागृतीपर माहिती पाठवली जाणार आहे.

नवी मुंबई शहरातील वाढते सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, अंमली पदार्थ विरोधी गुन्हे, महिला सुरक्षा संदर्भातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई पोलिसांनी समाज माध्यमांचा आणि डिजीटल माध्यमांचा वापर करुन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. व्हॉटस्‌ॲप माध्यम मोठया प्रमाणात वापरले  जात असल्याने नवी मुंबई पोलिसांनी स्वतःचे नवी मुंबई पोलीस या नावाचे व्हॉटस्‌ॲप चॅनेल सुरु केले आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या या व्हॉटस्‌ॲप चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचुन त्यांच्यामध्ये सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, अंमली पदार्थ विरोधी गुन्हे, महिला सुरक्षा यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.

त्याशिवाय या व्हॉटस्‌ॲप चॅनलवर  वेगवेगळ्या क्षेत्रातील सुप्रसिध्द व्यक्ती, हिंदी-मराठी चित्रपट क्षेत्रातील अभिनेते, अभिनेत्री यांचे सायबर सुरक्षा, आर्थिक फसवणूक, अंमली पदार्थ विरोधी गुन्हे, महिला सुरक्षा संदर्भात तयार करण्यात आलेले जनजागृतीपर व्हिडीओ, मिमस्‌ डिजीटल पोस्टर्स पाठविले जाणार आहेत. या पोस्ट आणि व्हिडीओ नवी मुंबई पोलिसांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर देखील टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी नवी मुंबई पोलिसांच्या व्हॉटस्‌ॲप चॅनल, फेसबुक आणि इन्स्टाग्रामला फॉलो करण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 ‘अटल सेतू'वरुन पडणाऱ्या महिलेचा बचाव