महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
इंटरनॅशनल कॉल राऊटींग करणारे बेकायदेशीर बोगस कॉल सेंटर सर्व्हर गुन्हे शाखेने केले उध्वस्त
नवी मुंबई : बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशातील कॉल्स बेकायदेशीररीत्या भारतीय मोबाईल, फोन क्रमांकावर वळवुन शासनाची कोटÎवधी रुपयांची फसवणुक करणारे बोगस कॉल सेंटर सर्व्हर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-1 ने उध्वस्त केले आहे. सदर बोगस कॉल सेंटर सर्व्हरमुळे भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ टेली कम्युनिकेशनची सुमारे 5 कोटी रुपयांची फसवणुक झाल्याचे आढळुन आले आहे. दरम्यान, अशा बोगस कॉल सेंटर सर्व्हर प्रणालीचा उपयोग दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जाण्याची शक्यता असल्याने सदर बोगस कॉल सेंटर सर्व्हर सुरु करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेकडुन शोध घेण्यात येत आहे. तसेच त्यांनी केलेल्या सर्व गैरकृत्यांचा तपास करण्यात येत आहे.
पश्चिम बंगाल येथील मे.ह्युमॅनिटी पाथ टेक्नॉलॉजी प्रा.लि. या कंपनीच्या प्रोप्रायटर शारदा विनोद कुमार व झारखंड येथील श्रीवंश कन्स्ल्टींग सर्व्हीसेस प्रा.लि. या कंपनीचे डायरेक्टर अमीतकुमार व पिंकी राणी यांनी आपसात संगनमत करुन रबाळे एमआयडीसीत सिग्मा आयटी पार्कमध्ये वेब वर्क्स इंडिया प्रा.लि. नावाने बोगस कॉल सेंटर सर्व्हर स्थापन केले होते. त्यानंतर या टोळीने बेकायदेशीररीत्या परदेशातील कॉल्स भारतीय मोबाईल अथवा फोन क्रमांकावर वळवून शासनाची फसवणुक करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे परदेशातून भारतातील नातेवाईकांकडे येणारे कॉल हे इंटरनॅशनल कॉल न दिसता ते भारतातीलच नंबर असल्याचे दिसून येत होते.
काही व्यक्तींना हा फसवणुकीचा प्रकार वाटल्याने महाराष्ट्रासह इतर राज्यातील अनेक नागरिकांनी डीओटीकडे तक्रारी केल्या होत्या. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दुरसंचार विभागाने नवी मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील, निलेश बनकर व त्यांच्या पथकाने भारत सरकारच्या दुरसंचार विभागाचे अधिकारी अनिल हुले, जीओ कंपनीचे अभियंता व सायबर तज्ञ यांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरु केला होता.
या तपासात रबाळे एमआयडीसीत वेब वर्क्स इंडिया प्रा.लि. या कंपनीच्या वतीने सुरु असलेल्या कॉल सेंटरमधुन इंटरनॅशनल व्हिओआयपी कॉल राऊटींग करण्यात येत असल्याचे आढळुन आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करुन रबाळे एमआयडीसीत सिग्मा आयटी पार्कमध्ये वेब वर्क्स इंडिया प्रा.लि. या नावाने सुरु असलेल्या बोगस कॉल सेंटर सर्व्हरवर छापा टाकुन दोन सर्व्हर जफ्त केले. पोलिसांनी आता सदर बोगस कॉल सेंटर सर्व्हर चालविणाऱया टोळीचा शोध सुरु केला आहे.