प्रेयसीची हत्या करुन आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचा मृतदेह सापडला

नवी मुंबई : सीवुडस्‌ मधील डीपीएस शाळेलगतच्या खाडीजवळ भाविका मोरे (१९) या तरुणीची हत्या करुन स्वतः खाडीमध्ये उडी मारुन आत्महत्या करणाऱ्या स्वस्तिक पाटील (२२) या तरुणाचा मृतदेह अखेर ९ ऑगस्ट रोजी सकाळी एनआरआय वसाहती लगतच्या खाडीमध्ये सापडला. त्यामुळे भाविका आणि स्वस्तिक या दोघांमध्ये प्रेम प्रकरणातून झालेल्या भांडणातून स्वस्तिकनेच भाविकाची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.  

या घटनेतील मृत भाविका मोरे सीवुडस्‌मध्ये राहत होती, तर तिचा प्रियकर स्वस्तिक पाटील मुळचा उरणच्या केळवणे गावातील रहिवासी असून सध्या तो पनवेल येथे राहत होता. तसेच तो पनवेल मधील मेडीकल स्टोअर्समध्ये काम करत होता. भाविका आणि स्वस्तिक या दोघांमध्ये मागील वर्षभरापासून प्रेमसंबंध सुरु होते. चार महिन्यापूर्वी या दोघांमध्ये वाद झाल्याने त्यांच्यामध्ये ब्रेकअप झाले होते. त्यामुळे भाविका स्वस्तिकला भेटण्यास टाळाटाळ करत होती. मात्र, स्वस्तिक तिला भेटण्यासाठी बोलवत होता. घटना घडायच्या ३-४ दिवसापूर्वी देखील ते दोघे भेटले होते. त्यावेळी सुध्दा त्यांच्यामध्ये भांडण झाले होते.  

७ ऑगस्ट रोजी देखील स्वस्तिकने भाविकाला फक्त ५ मिनिटांसाठी भेटण्यासाठी बोलावून घेतले होते. त्यानंतर सायंकाळी ४ च्या सुमारास ते दोघे दुचाकीवरुन सीवुडस्‌ येथील डीपीएस तलावालगतच्या खाडीकिनारी गेले होते. याठिकाणी त्यांच्यामध्ये पुन्हा भांडण झाले. या भांडणामध्ये स्वस्तिकने भाविकाची गळा दाबून आणि डोक्यात दगड मारुन हत्या केल्यानंतर स्वतः देखील खाडीमध्ये उडी टाकून आत्महत्या केली होती. त्यावेळी खाडीमध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना भाविकाचा मृतदेह तेथील खाडीमध्ये आढळून आला होता. त्यावेळी मच्छिमारांनी स्वस्तिकला खाडीमध्ये उडी टाकताना पाहिले होते. त्यामुळे त्यांनी एनआरआय पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भाविकाचा मृतदेह ताब्यात घेतला होता.  

मात्र, त्यावेळस खाडीमध्ये ओहोटी सुरु असल्याने स्वस्तिकचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्यानंतर एनआरआय पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन खाडीत उडी मारलेल्या स्वस्तिकचा शोध सुरु केला होता. अखेर ९ ऑगस्ट रोजी सकाळी त्याचा मृतदेह एनआरआय वसाहती लगतच्या खाडीकिनारी लागल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. स्वस्तिकच्या नातेवाईकांकडून त्याच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. त्यानंतर सायंकाळी त्याचा मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

इंटरनॅशनल कॉल राऊटींग करणारे बेकायदेशीर बोगस कॉल सेंटर सर्व्हर गुन्हे शाखेने केले उध्वस्त