महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
मेट्रो पुलाखाली वाहने उभे करुन वाहतुकीस अडथळा
खारघर : खारघर मधील शिल्प चौकात वाहतूक अडथळा आणणाऱ्या तसेच मेट्रो पुलाखाली वाहने उभी करून वाहतूक कोंडी करणाऱ्या १०३ वाहनांवर वाहतूक पोलिसांनी ई-चलन कारवाई केली आहे. या कारवाईमुळे रस्ता मोकळा केल्याने वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे. तर नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
नवी मुंबई मेट्रो मार्गातील खारघर, सेक्टर-१९ आणि पेठपाडा मेट्रो स्थानक कडून सेक्टर-३४, ३५ मार्गे तळोजाकडे जाणाऱ्या मेट्रो पुलाखाली ‘सिडको'ने दुहेरी रस्ता उभारला आहे. सदर रस्त्यावर नागरिक अनधिकृतपणे दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली करुन पसार होतात. रस्त्यावर अनधिकृतपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असून सदर वाहनांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करुन रस्ता मोकळा करावा, अशा तक्रारी खारघर वाहतूक शाखाकडे आल्या होत्या. त्यानुसार खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काणे यांनी ६ ऑगस्ट रोजी मोहीम राबवून सेक्टर-३४, ३५ मधील मेट्रो पुलाखाली अनधिकृतपणे उभ्या असलेल्या ७१ वाहनांवर, तर सेक्टर-१९/२० मेट्रो पुलाखाली उभ्या केलेल्या २० आणि शिल्प चौकात वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या १२ अशा एकूण १०३ वाहनांवर ई-चलन कारवाई केली. या कारवाईमुळे अनधिकृपणे वाहने उभे करणाऱ्या वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे.
वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रथम दंड ५०० रुपये असून दंडाची रक्कम न भरणा करता पुन्हा अशाच प्रकारे वाहने उभी केल्यास १५०० रुपये ई-चलन कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले.
खारघर, सेक्टर-१९, २० आणि सेक्टर-३४, ३५ येथील मेट्रो पुलाखाली तिहेरी रस्ता आहे. सदर रस्त्यावर नागरिक वाहने उभे करुन पसार होत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. सदर रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. नागरिकांनी वाहतुकीस अडथळा होईल अशी वाहने उभी करु नयेत.
-एस. एस. काणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-वाहतूक शाखा, खारघर.