यशश्री हत्या प्रकरण : लग्न करण्यास, बंगळुरुला येण्यास नकार दिल्याने यशश्रीची हत्या

नवी मुंबई : उरण मधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद बसुद्दीन शेख (२३) याने यशश्रीच्या पाठीमागे लग्नासाठी आणि त्याच्यासोबत बँगलोर येथे येण्यासाठी तगादा लावला होता. मात्र, यशश्री त्याला प्रतिसाद देत नव्हती. याच कारणावरुन त्यांच्यामध्ये भांडण झाल्यानंतर आरोपी दाऊद शेख याने यशश्रीवर चाकुने वार करुन तिची हत्या केल्याचे तपासात निषन्न झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त अमित काळे यांनी दिली. ३१ जुलै रोजी सकाळी आरोपी दाऊद शेख याला पनवेल सत्र न्यायायलात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याची ७ ऑगस्ट  पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केल्याचेही पोलीस उपायुवतकाळे यांनी सांगितले.

आरोपी दाऊद शेख आणि यशश्री दोघेही शाळेमध्ये एकत्र शिकत होते. दाऊदने दहावीपर्यंत शिक्षण घेऊन त्याने शाळा सोडली होती. मात्र, यशश्री पुढे शिक्षण घेत होती. दाऊदने त्यानंतर चालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. २०१९ मध्ये यशश्री अल्पवयीन असताना, त्याने यशश्रीसोबत छेडछाडीचा प्रकार केल्याने यशश्रीच्या कुटुंबियांनी दाऊद विरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात दाऊद दिड महिने जेलमध्ये होता. त्यानंतर जामीन मिळवून बाहेर आल्यानंतर तो कोव्हीडच्या काळात बंगळुरुला गेला होता. त्यानंतर तो यशश्रीला कॉल करुन तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान तो यशश्रीला भेटण्यासाठी उरणमध्ये २-३ वेळा कर्नाटक येथून आल्याचेही तपासात आढळून आले आहे.  

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन भेटण्यासाठी तगादा...

२३ जुलै रोजी दाऊद कर्नाटक येथून उरणमध्ये आला होता. त्यानंतर त्याने यशश्रीने त्याला भेटण्यासाठी यावे यासाठी तो जबरदस्ती करत होता. तसेच ती भेटायला न आल्यास त्याने तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे २४ जुलै रोजी यशश्री जुईनगर रेल्वे स्थानकात दाऊदला भेटली होती. त्यावेळी त्याने यशश्रीला लग्न करुन त्याच्यासोबत बंगळुुरु येथे कायमचे राहण्यासंदर्भात विचारणा केली होती. मात्र, यशश्री त्याला नकार देत होती. त्यामुळे दाऊदने २५ जुलै रोजी पुन्हा यशश्रीला भेटण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी यशश्री त्याला भेटण्यास न गेल्याने त्याने तिचे काही फोटो फेसबुकवर अपलोड केले होते.  

बंगळुरु येथे जाण्यास नकार दिल्याने यशश्रीची हत्या...

दाऊदने दिलेल्या धमकीमुळे २५ जुलै रोजी दुपारी ३ च्या सुमारास यशश्री त्याला भेटण्यासाठी गेली होती. त्यानंतर दाऊदने फेसबुकवर अपलोड केलेले तिचे फोटो डिलीट केल्याचे तपासात आढळून आले आहे. यशश्री २५ जुलै रोजी दाऊदला उरण परिसरातील कोट नाका येथील पेट्रोलपंपाच्या पुढील बाजुस असलेल्या झुडपामध्ये भेटली. यावेळी त्याने पुन्हा यशश्रीला बंगळुरु येथे त्याच्यासोबत येण्याबाबत विचारणा केली. मात्र, यशश्रीने त्याच्यासोबत येण्यास नकार दिला. यावरुन त्यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणानंतर दाऊदने आपल्या सोबत आणलेल्या चाकुने यशश्रीच्या पोटावर आणि पाठीवर वार करुन तिची हत्या केल्याचे तपासात आढळून आले आहे.  

गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या...

यशश्रीच्या हत्येनंतर दाऊदने पनवेल रेल्वे स्टेशन गाठून मित्राकडून पैसे मागवले. ते पैसे त्याने पनवेल रेल्वे स्टेशनवरील एटीएमवरुन काढून घेतले. त्यांनतर त्याने कळंबोली मॅकडोनाल्ड येथून बस पकडून कर्नाटक येथे पलायन केले. २७ जुलै रोजी यशश्रीचा मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दाऊद शेख यानेच यशश्रीची हत्या करुन पलायन केल्याचे आढळून आल्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे, गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय रेड्डी, पोलीस हवालदार अनिल यादव, किरण राऊत, पोलीस नाईक अयज कदम आदिंच्या पथकाने फरार दाऊद शेख याचा ५ दिवस शोध घेऊन त्याला कर्नाटकातील गुलबर्गा येथील अलर गावातील डोंगराळ भागातून ताब्यात घेतले.  

आरोपी विरुध्द ॲट्रोसिटीनुसार गुन्हा...

मृत यशश्री शिंदे अनुसूचित जातीची असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात आता ॲट्रोसिटीचे कलम वाढवण्यात आले आहे. त्यानुसार आरोपी दाऊद शेख याला ३१ जुलै रोजी सकाळी पनवेल येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोर्ट विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून करण्यात येत आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 ३ दिवसांत १५६  रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा