महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
३ दिवसांत १५६ रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा
वाशी : नवी मुंबई शहरात आजही अवैधपणे रिक्षा चालविल्या जात असून, काही मुजोर रिक्षा चालक मनमानीपणे जादा भाडे आकारणी, मीटर नुसार भाडे न आकारता प्रवाशांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे विना परवाना, कालबाह्य परवाने असतानाही रस्त्यावर रिक्षा चालविणाऱ्या रिक्षा चालकांवर आरटीओ मार्फत कारवाई केली जात असून, मागील तीन दिवसात १५६ रिक्षा चालकांवर कारवाई ३ लाख ७० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग असल्याने कामाच्या वेळेत घाईत असल्याने नोकरदार रिक्षांचा आधार घेतात. मात्र, काही रिक्षाचालक भाडे नाकारतात तर काही अतिरिक्त भाडे आकारतात. दुसरीकडे काही रिक्षाचालक मीटरनुसार भाडे आकारण्यास नकार देतात. त्यामुळे प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रिक्षा चालकांच्या तक्रारी वाशी आरटीओ कार्यालयाकडे येत असतात. त्यानुसार आरटीओ मार्फत कारवाईचा बडगा उगारला जात असून मागील तीन दिवसात रिक्षा चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या मोहीमेत वाहन परवाना नसणाऱ्या ५७ , कालबाह्य परवाना असलेल्या ४५, वाहन विमा संपलेल्या ३०, वाहन फिटनेस संपलेल्या १५ आणि पियुसी नसललेल्या ९ मिळून एकूण १५६ रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत ३ लाख ७०हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली.