महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
पनवेल येथील डोंगराळ भागात भरकटलेल्या 8 जणांची पोलिसांनी केली सुखरुप सुटका
पनवेल : पावसाचा आनंद लुटण्यासाठी पनवेल मधील नांदगाव जवळच्या पाच पीर डोंगर परिसरात रविवारी सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या व मुसळधार पावसात धुक्यामुळे डोंगरात भरकटलेल्या 8 जणांची पनवेल शहर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरुप सुटका करुन त्यांना खाली आणले.
या घटनेत सुटका करण्यात आलेल्यामध्ये सुटका करण्यात आलेल्यामध्ये 4 लहान मुले व एक महिलां व तीन पुरुष अशा 8 जणांचा समावेश होता. एक कुटुंब व त्यांचा मित्र परिवार हे सर्व नेरुळ परिसरात राहण्यास होते. रविवार सुट्टी असल्याने हे सर्वजण सकाळी पनवेल मधील नांदगाव जवळच्या पाच पीर डोंगरावर ट्रेकिंग करण्यासाठी गेले होते. मात्र दिवसभर कोसळणारा मुसळधार पाऊस व त्यामुळे पसरलेल्या धुक्यामुळे ते सर्वजण दुपारी भरकटले होते. आपण भरकटल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आपत्कालीन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर आपत्कालीन विभागाने पनवेल शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली.
त्यांनतर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण भगत, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल केदार, पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस हवालदार किशोर बोरसे, परेश म्हात्रे, मुरली पाटील, पोलीस नाईक भाऊसाहेब लोंढे आदींनी तत्काळ नांदगावच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी नांदगांव मधील संजय पाटील, ऍड.घरत व ग्रामस्थांना मदतीला घेऊन डोंगर पिंजुन काढला. तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास डोंगरामध्ये भरकटलेल्या सर्वांना शोधण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना सुखरुपपणे खाली उतरविले. त्यानंतर सुखरुपपणे खाली आलेल्या आठही जणांनी पनवेल शहर पोलीस आणि ग्रामस्थांचे आभार मानले.