अंमली पदार्थ विक्रीला पायबंद घालण्यासाठी विशेष दक्षता पथक  

नवी मुंबई : नवी मुंबईतील विद्यार्थी आणि युवकांना अंमली पदार्थाच्या गर्तेत जाण्यापासून वाचवण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन विशेष उपाययोजना करण्याची मागणी शनिवारी नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे केली. त्यावर पोलिसांची खास गस्तीपथके शाळा, कॉलेजेस आणि सार्वजनिक ठिकाणी कार्यरत करू, अशी ग्वाही पोलीस आयुक्त भारंबे यांनी दिली.

मागील वर्षभरामध्ये नवी मुंबईत अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या गुन्हेगारांना, नायजेरियन टोळ्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. खास करून शाळा, कॉलेजेस आणि सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थी आणि युवकांना अंमली पदार्थाच्या ओढले जाते आहे. संपूर्ण देशामध्ये ड्रग्स विक्रीचे रॅकेट कार्यरत आहे. युवा पिढीला बरबाद करण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात सातत्याने कारवाई करून पोलीस प्रशासनाने या गोष्टीला पायबंद घालावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष नाईक यांनी केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकारातून अंमली पदार्थविरोधी खात्याची मानस ही हेल्पलाइन सुरु असून अंमली पदार्थ विक्रीबाबत नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी या हेल्पलाइनला  किंवा पोलिसांना  त्याची तत्परतेने माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नाईक यांनी यावेळी केले. केवळ पोलीस प्रशासन, अंमली पदार्थ विरोधी पथक यांची जबाबदारी नाही. तर नागरिकांनी देखील जागरूक राहून आपली जबाबदारी पार पाडायला पाहिजे. आपली मुले व्यसनांना बळी तर पडत नाहीत ना, यावरही लक्ष दिले पाहिजे. सर्वांच्या प्रयत्नातून आपण आपल्या युवा पिढीला अंमली पदार्थाच्या विळख्यातून वाचवू शकतो.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पनवेल येथील डोंगराळ भागात भरकटलेल्या 8 जणांची पोलिसांनी केली सुखरुप सुटका