महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
मृत अक्षता म्हात्रेच्या पती व सासुला अटक
नवी मुंबई : शिळफाटा येथील श्री गणेश घोळ मंदिरातील पुजा-यांनी सामुहिक लैंगिक अत्याचार करून हत्या केलेल्या अक्षता म्हात्रे या विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या तिच्या पतीला व सासूला गुरुवारी एनआरआय पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने या दोघा मायलेकांची 20 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणातील आरोपीं नणंदेचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
बेलापूर येथे राहणाऱ्या अक्षता म्हात्रे हिचा तिच्या सासरकडील मंडळींकडून लग्न झाल्यापासून छळ करण्यात येत होता. सुरुवातीला अक्षताला मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून सासरकडील मंडळींनी तिचा मानसिक छळ सुरू केला होता. त्यानंतर अक्षताने माहेरुन 10 लाख रुपये आणावेत यासाठी तिचा छळ सुरु केला होता. त्यावेळी अक्षताच्या कुटुंबियांनी कर्ज काढुन अक्षताचा पती कुणाल म्हात्रे याला 10 लाख रुपये दिले होते. मात्र त्यानंतर देखील त्यांनी अक्षताचा शारीरीक व मानसिक छळ सुरूच ठेवला होता.
सासरकडील मंडळीकडुन होत असलेल्या त्रासाला कंटाळून अक्षता गत 6 जुलै रोजी सकाळी 6.30 वाजता घर सोडून निघून गेली होती. याबाबतची माहिती अक्षताच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यांनी अक्षताच्या मुलाला आपल्या घरी आणले होते. मात्र त्याच दिवशी रात्री अक्षताचा पती कुणाल म्हात्रे, सासरा सुरेश म्हात्रे व नणंद दिपमाला सारंग कडु या तिघांनी अक्षताच्या आई-वडिलांच्या घरी जाऊन अक्षताच्या मुलाला जेवणाच्या ताटावरुन जबरदस्तीने आपल्या सोबत घेऊन गेले होते.
अक्षताच्या सासरकडील मंडळीकडून अशा पद्धतीने अक्षताचा छळ करण्यात येत असल्यामुळेच अक्षता त्या दिवशी घर सोडून शिळफाटा येथील श्री गणेश घोळ मंदिरात गेली होते. ती एकटी असल्याची संधी साधून मंदिरातील पुजाऱ्यांनीं तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप मृत अक्षताच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच या सर्व प्रकाराला अक्षताच्या सासरकडील मंडळी जबाबदार असल्याची तक्रार एन आर आय पोलीस स्टेशनमध्ये केली होती.
त्यानंतर पोलिसांनी दोन दिवसापूर्वी अक्षाताचा पती कुणाल म्हात्रे (36), सासु मंदा म्हात्रे (56) व नणंद दिपमाला सारंग कडु (40) या तिघांविरोधात छळवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एनआरआय पोलिसांनी गुरुवारी अक्षताचा पती कुणाल मात्रे व सासू मंदा मात्रे या दोघांना अटक केली. या दोघांना बेलापूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आगरी समाजातील वकिलांनी न्यायालयात अक्षताच्या कुटुंबीयांकडून बाजू मांडली त्यानंतर न्यायालयाने अक्षताचा पती व सासू या दोघांना 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अक्षताला न्याय मिळवून देण्यासाठी नवी मुंबईतील वकिलांचा पुढाकार
बेलापूर येथील अक्षता म्हात्रे या विवाहितेच्या हत्येनंतर त्याचे पडसाद नवी मुंबईत सर्वत्र उमटत आहेत. अक्षताला न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक संघटनांसह राजकीय पक्ष पुढे सरसावले आहेत. त्याचप्रमाणे आगरी समाजातील वकिल देखील आता अक्षता म्हात्रे हिला न्याय मिळवून देण्यासाठी एकवटले आहेत. न्यायालयात गुरुवारी आगरी समाजातील वकिलांनी अक्षताच्या कुटुंबीयांकडून भक्कमपणे बाजू मांडण्यात आली. यावेळी आगरी समाजातील सर्व वकिलांनी अक्षताला छळणाऱ्या तिच्या सासरकडील मंडळींना कठोर शिक्षा होईपर्यंत अक्षताच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार असल्याचे प्रसार माध्यमांसमोर सांगितले.