महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक भररस्त्यात झाला पलटी
नवी मुंबई : तब्बल 320 भरलेले गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदरचा ट्रक रस्ता दुभाजकाला धडकून भर रस्त्यात पलटी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ठाणे बेलापूर मार्गावर ऐरोली येथे घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. या अपघातामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. मात्र, रबाळे वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त ट्रक मधील सिलेंडर दुसऱया वाहनात भरुन अपघातग्रस्त ट्रक बाजुला काढुन वाहतूक सुरळीत केली.
या घटनेतील अपघातग्रस्त ट्रक हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस सिलेंडर घेऊन रसायनी येथून पालघर येते जात होता. या ट्रकमध्ये गॅसने भरलेले 270 घरगुती तर 50 व्यावसायिक सिलेंडर होते. बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सदरचा ट्रक ठाणे बेलापूर मार्गावरील ऐरोली येथील सिमेन्स कंपनीसमोर आला असताना, ट्रक चालक मोहम्मद जहीर याचे ट्रक वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे सदरचा ट्रक रस्ता दुभाजकावर धडकुन रस्त्यावर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवीत हानी किंवा गॅस सिलेंडर लिकेज होण्याची घटना घडली नाही, या अपघातात फक्त ट्रक चालक मोहम्मद जहीर हा किरकोळ जखमी झाला.
या अपघातामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱया मार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. या अपघाताची घटनेची माहिती मिळताच रबाळे वाहतूक पोलिसांसह ऐरोली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वाहतुक पोलिसांनी ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवून सदर ट्रक मधील सर्व सिलेंडर दुस-या वाहनात भरले. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रक बाजुला करुन वाहतुक सुरळीत केली. सकाळच्या सुमारास ट्रक चालकाला डुलकी लागली असावी, त्यामुळे हा अपघात घडला असावा, अशी शक्यता रबाळे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांनी व्यक्त केली. या अपघाताची नोंद रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.