महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
अंमली पदार्थ विरोधी कक्षाची पुन्हा अंमली पदार्थाच्या तस्कारांविरोधात धडक कारवाई
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने सोमवारी मध्यरात्री सायन पनवेल मार्गावर वाशी गाव येथे धडक कारवाई करुन तब्बल 2 कोटी 80 लाख रुपये किंमतीचे मेफॅड्रोन हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या कारवाईत अंमली पदार्थ घेऊन जाणा-या दोन तरुणांना त्यांच्या स्कुटीसह अटक केली आहे. पोलिसांनी आता अंमली पदार्थाचा पुरवठा करणा-या आरोपीचा शोध सुरु केला आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेल्यामध्ये फजल जाफर खान (21) व सलाउद्दीन अल्लाउद्दीन शेख (21) या दोघांचा समावेश असून हे दोघेही मुंबईतील माहिम येथे राहण्यास आहेत. हे दोघेही सोमवारी मध्यरात्री सुझुकी एक्सेस या स्कुटीवरुन अंमली पदार्थ घेऊन पनवेलच्या दिशेने जाणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी व त्यांच्या पथकाने सायन पनवेल मार्गावर सोमवारी मध्यरात्री सापळा लावला होता.
पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास फजल खान व सलाउद्दीन शेख हे दोघेही सुझुकी एक्सेस या स्कुटीवरुन पनवेलच्या दिशेने जात असताना सायन पनवेल मार्गावर वाशी गाव येथे सापळा लावून थांबलेल्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने या दोघांची स्कुटी अडवुन त्यांची झडती घेतली असता, फजल खान याच्याजवळ 700 ग्रॅम वजनाचा तब्बल 1 कोटी 40 लाख रुपये किंमतीचा मेफॅड्रोन हा अंमली पदार्थ सापडला. तर सलाउद्दीन शेख याच्याजवळ 304 ग्रॅम वजनाचे 60 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मेफॅड्रोन हा अंमली पदार्थ सापडला.
त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने या दोघांजवळ सापडलेले 1 किलो 4 ग्रॅम वजनाचे तब्बल 2 कोटी 80 लाख रुपये किंमतीचे मेफॅड्रोन हे अंमली पदार्थ जफ्त केले. त्यानंतर या दोघांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमानुसार गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन व त्यांची स्कुटी देखील जफ्त केली आहे. हे दोघेही कुणाला अंमली पदार्थ विकण्यासाठी चालले होते? याचा तसेच त्यांना अमली पदार्थाचा पुरवठा करणा-या मुख्य आरोपींचा पोलिसांकडुन तपास करण्यात येत आहे.