महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
अक्षता म्हात्रेच्या हत्येनंतर तिच्या सासरकडील मंडळीवर छळवणुकीचा गुन्हा दाखल
नवी मुंबई : शिळफाटा येथील श्री गणेश घोळ मंदिरातील पुजा-यांकडुन झालेल्या सामुहिक लैंगिक अत्याचार व हत्येच्या घटनेतील मृत विवाहितेचा तिच्या सासरकडील मंडळीकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचे व त्यामुळे ती कंटाळुनच आपल्या घरातून शिळफाटा येथील श्री गणेश घोळ मंदिरात गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे एनआरआय पोलिसांनी मृत विवाहितेचा छळ करणा-या तिचा पती कुणाल म्हात्रे (36) व सासु मंदा म्हात्रे (56) व नणंद दिपमाला सारंग कडु (40) या तिघांविरोधात छळवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
कोपरखैरणे येथे राहणारी अक्षता हिचा बेलापूर गावात राहणा-या कुणाल म्हात्रे याच्यासोबत 9 मे 2018 रोजी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासूनच तिच्या सासरकडील मंडळींनी तिला छळण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला अक्षताला मुलबाळ होत नसल्यामुळे तिचा मानसिक छळ करण्यात येत होता. त्यानंतर अक्षताने माहेरुन 10 लाख रुपये आणावेत यासाठी तिचा छळ सुरु केला होता. त्यावेळी अक्षताच्या कुटुंबियांनी कर्ज काढुन अक्षताचा पती कुणाल म्हात्रे याला 10 लाख रुपये दिले होते. मात्र त्यानंतर देखील त्यांनी अक्षताचा शारीरीक व मानसिक छळ सुरूच ठेवला होता.
सासरकडील मंडळीकडुन होत असलेल्या त्रासाला कंटाळून अक्षता गत 6 जुलै रोजी सकाळी 6.30 वाजता घर सोडून निघून गेली होती. याबाबतची माहिती अक्षताच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यांनी अक्षताच्या मुलाला आपल्या घरी आणले होते. मात्र त्याच दिवशी रात्री अक्षताचा पती कुणाल म्हात्रे, सासरा सुरेश म्हात्रे व नणंद दिपमाला सारंग कडु हे तिघे अक्षताच्या माहेरी कोपरखैरणे येथे गेले होते. त्यानंतर त्यांनी अक्षताच्या मुलाला जेवणाच्या ताटावरुन जबरदस्तीने आपल्या सोबत घेऊन गेले होते.
अक्षताच्या सासरकडील मंडळीकडून अशा पद्धतीने अक्षताचा छळ करण्यात येत होता. मात्र, अक्षताला तिच्या सासरकडील मंडळींनी त्रास दिला नसता तर ती घर सोडून गेली नसती, तसेच तिची अशा पद्धतीने हत्या देखील झाली नसती, त्यामुळे अक्षताचा छळ करणारे तिच्या सासरकडील मंडळी या घटनेला जबाबदार असल्याची तक्रार अक्षताच्या कुटुंबियांनी एनआरआय पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.
अक्षताला न्याय मिळवून देण्यासाठी राजकीय पक्षांचा पुढाकार
बेलापूर येथील अक्षता म्हात्रे या विवाहितेच्या हत्येनंतर त्याचे पडसाद नवी मुंबईत सर्वत्र उमटत आहेत. अक्षताला न्याय मिळवून देण्यासाठी आता सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिका-यांनी सोमवारी परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांना निवेदन देऊन सदर प्रकरणाची सुनावणी जलद गतीने (फास्ट ट्रक) करण्याची तसेच आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे व इतर पदाधिका-यांनी देखील पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.