महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
एका रात्रीत करोडपती होण्याच्या नादात नागरीकांची होत आहे फसवणुक
ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना सतर्क व चौकस राहण्याचे पोलिसांकडुन आवाहन
नवी मुंबई : एकविसाव्या शतकातील शहर म्हणून नावारुपाला आलेल्या नवी मुंबई शहरात सायबर गुन्ह्यात वाढ होत असून सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना लुबाडण्यासाठी नवनवीन शक्कल लढविण्यात येत आहे. नोकरी, पार्ट टाईम जॉब चे आमिष दाखवून,जादा पैशाचे आमिष दाखवून टास्क पूर्ण करण्यास देऊन, लोन ऍप, सेक्स्टॉर्शन, मनी लॉड्रींगची भीती दाखवून नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच आता शेअर मार्केट ट्रेडींगद्वारे फसवणुकीच्या प्रकारात प्रचंड वाढ झाली आहे. एका रात्रीत करोडपती होण्याच्या नादात अनेक नागरीक सायबर टोळीकडून दाखवण्यात येत असलेल्या शेअर मार्केट ट्रेडींगच्या अमिषाला बळी पडुन आपल्याजवळचे कोटयवधी रुपये गमवत आहेत. दर दोन दिवसाआड फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येत आहेत.
लोकांना एका रात्रीत करोडपती व्हायचे आहे, त्यामुळे ते इन्स्टाग्राम, फेसबुक वर येणा-या लर्न ऍन्ड अर्न या स्वरुपाच्या शेअर मार्केट ट्रेडींगच्या जाहिरातीला बळी पडुन त्यात दिलेल्या लिंकवर क्लीक करुन त्यात गुंतवणुक करत आहेत. त्यामुळे सध्या शेअर मार्केट ट्रेडिंग च्या माध्यमातुन फसवणुकीच्या प्रकारात प्रचंड वाढ झाली आहे. सुरुवातीला या सायबर चोरटयाकडुन गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर काही रक्कम नफा मिळाल्याचे बनावट ऍपद्वारे दाखविले जाते. त्यानंतर हे सायबर चोरटे त्यांना लाखो रुपये गुंतवणुक केल्यास मोठा नफा मिळेल असे अमिष दाखवून त्यांना मोठी रक्कम गुंतवणुक करण्यास भाग पाडून त्यांच्याकडुन कोटयवधी रुपये उकळुन त्यांची फसवणुक करत आहेत.
कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या नादात तसेच सायबर गुन्हेगारांकडून दाखवण्यात आलेल्या अमिषाला बळी पडुन अनेक नागरीक शेअर मार्केट ट्रेडींगच्या जाळ्यात फसत आहेत. नागरिकांमध्ये ऑनलाईन गुंतवणुकीसंदर्भात असलेले अज्ञात सायबर गुन्हेगारांच्या पथ्यावर पडत असून या फसवणुकीच्या प्रकाराला फक्त सर्वसामान्य नागरीकच नाही, तर सर्वाधिक उच्चशिक्षित असलेले डॉक्टर, वकील, आयटी इंजिनियर्स, बँकींग क्षेत्रातील उच्च पदावर कार्यरत असलेले लोक सुद्धा फसत आहेत.
दुबईत बसून फसवणुक
भारतातील सायबर गुन्हेगार आता दुबई, कंबोडीया, लावोस, व्हिएतनाम या ठिकाणी बसून सायबर गुन्हे करत आहेत. वेगवेगळ्या स्कीम सांगून ते कोटयवधी रुपयांना फसवत आहेत. नुकतेच नवी मुंबई सायबर पोलिसांनी भारताबाहेर दुबई याठिकाणी राहून शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडुन ऑनलाईन गंडा घालणा-या कौशिक कुमार कल्याण भाई इटालिया या आरोपीला सुरत विमानतळावरुन अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर लुक आउट नोटीस जारी केल्यामुळे हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे.
गरजु व्यक्तींच्या कागदपत्रांचा बँक खाते उघडण्यासाठी वापर
हे सायबर चोरटे गरीब व गरजु लोकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बँक खाते उघडण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तसेच त्यांच्या नावाने सिमकार्ड घेतात. त्यानंतर सदर कागदपत्रांच्या आधारे गुमास्ता व उदयम प्रमाणपत्र तयार करुन एकाच दुकानावर वेगवेगळ्या बँकेमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने चालु खाते उघडतात. त्यानंतर सदर बँक खाते हे दुबई व इतर देशातील आपल्या साथीदारांना पाठविले जाते. त्यानंतर तेथील सायबर चोरटे भारतातील लोकांची फसवणुक करुन त्यांना या बँक खात्यात रक्कम पाठवण्यास भाग पाडुन सदर रक्कम काढुन घेत असल्याचे तपासात आढळुन आले आहे. त्यामुळे पोलीस बँक खाते ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्या गरीब व गरजु व्यक्तीला अटक करतात. मात्र मुख्य आरोपी परदेशात राहुन नामानिराळे राहतात.
सायबर फ्रॉडमध्ये बँक खाते गोठवून कारवाई
एखाद्याने सायबर फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडुन तत्काळ ज्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम गेली आहे, ते बँक खाते तसेच त्या खात्यातून ज्या-ज्या बँक खात्यात सदर रक्कम वळती झाली आहे, ती सर्व बँक खाती व त्यातील रक्कम बँकेद्वारे पोलीस गोठवतात. यात एखाद्याच्या खात्यात चुकून सायबर फ्रॉड मधील रक्कम गेली असल्यास त्याचे बँक खाते देखील पोलिसांकडुन गोठवले जाते. त्यामुळे त्याला त्याच्या खात्यात आलेल्या रकमेचा तपशील द्यावा लागतो. तसेच न्यायालयाकडुन ऑर्डर घेऊनच सदरचे बँक खाते पुन्हा सुरु करता येते. त्यामुळे नागरिकांना विनाकारण या सर्व प्रकाराचा मनस्ताप सहन करावा लागतो.
पोलिसांकडुन आवाहन
सायबर गुह्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्यामुळे नागरीकांनी डिजीटल स्वरूपातल्या गोष्टी वापरताना सतर्क व चौकस राहणे गरजेचे आहे. आपले बँक अकाऊंट, आपले सीम कार्ड कुणालाही वापरायला देऊ नये, तसेच आपला मोबाईल देखील कुणाकडे देऊ नये, तसेच आवश्यक नसताना फेसबुक, इन्स्टाग्राम वापर बंद करावा, मोबाईलचा वापर फक्त कामापुरता करावा. इन्स्टाग्राम व फेसबुकवर येणा-या सर्व जाहिराती या खोटया असतात, त्यामुळे इन्स्टाग्राम व फेसबुक कुणीही वापरु नये, तसेच त्यावर येणा-या जाहिरातींच्या अमिषाला बळी पडू नये.
गजानन कदम (वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे)
नागरीकांनी ऑनलाईन गुंतवणुकीच्या नफ्याच्या आमिषाला बळी पडु नये, तसेच कोणत्याही अज्ञात लिंकला प्रतिसाद देऊ नये, आर्थिक व्यवहार, गुंतवणूक करताना, खात्री करुनच आर्थिक व्यवहार करावेत. नागरिकांची ऑनलाईन फसवणूक झाल्यास नागरीकांनी 1930 या टोल फ्रि नंबरवर संपर्क साधावा, अथवा cybercrime.gov.in यावर तक्रार दाखल करावी.
नवी मुंबई आयुक्तालयातील २०२२ ते २६-०६-२०२४ रोजीपर्यंत सायबर संदर्भात दाखल गुन्ह्यांची माहिती.
सन ऑनलाईन फसवणुकीचे दाखल गुन्हे अटक आरोपी फसवणुकीची रक्कम जप्त रक्कम
२०२२ १५७ ७२ ६४ ५६,५१७/- ३८,९५७/-
२०२३ ३८३ ९४ ४५,२२,९२,९६३- ३९,८६,२६,७३३/-
२६ जून २४ २४० १९ ६१,५९,८१,९१९/- २२,८९,६९,८८९/-
एकूण ७८० १८५ १,०७४,७३१,३९९ ६२७,६३५,५७९
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार
डिजीटल अरेस्ट फेडेक्स फ्रॉड / स्काईप कॉल
शेयर्स मार्केट ट्रेडींग
टेलीग्राम टास्क फ्रॉड / जॉब फ्रॉड
क्रिप्टो करेंसी / बिट कॉईन
क्रेडीट कार्ड / डेबिट कार्ड फ्रॉड
केवायसी अपडेट फ्रॉड कॉल
इलेक्ट्रिसिटी बिल फ्रॉड
OLX फ्रॉड / No Broker
APK File/ Teamviewer/Quicksupport App
गिफ्ट पार्सल
मनी लॉड्रींग
सेक्सटॉर्शन
Loan App
मेट्रोमोनियल App
पॉलिसी फ्रॉड / इन्शुरन्स फ्रॉड
ओटीपी शेअरींग