महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
‘महावितरण'चे २ कर्मचारी ‘एसीबी'च्या जाळ्यात
नवी मुंबई : रेस्टॉरंटसाठी नवीन कमर्शिअल वीज मिटर बसविण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या ‘महावितरण'च्या वाशी जुहूगाव कार्यालयातील प्रधान तंत्रज्ञ दिपक मराठे आणि सहाय्यक अभियंता सचिन फुलझेले या दोघांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली आहे. १० मे रोजी सांयकाळी वाशीतील पंजाबी मिल्स आय.एन.सी. या रेस्टॉरंटमध्ये सदर कारवाई झाली.
या प्रकरणातील तक्रारदार इंद्रजीत सिंग (५६) यांचे वाशी, सेक्टर-९ए मध्ये पंजाबी मिल्स आय.एन.सी. या नावाचे रेस्टॉरंट असून या रेस्टॉरंटसाठी नवीन कमर्शिअल वीज मिटर बसविण्यासाठी ‘महावितरण'च्या वाशी जुहूगाव कार्यालयातील प्रधान तंत्रज्ञ दिपक मराठे याने स्वतःसाठी १ हजार रुपये आणि सहाय्यक अभियंता सचिन फुलझेले यांच्यासाठी ४ हजार रुपये अशी एकूण ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे इंद्रजीत सिंग यांनी नवी मुंबई एसीबीच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ‘ॲन्टी करप्शन ब्युरो'च्या पथकाने याबाबत सत्यता पडताळणी केली असता, दिपक मराठे याने इंद्रजीत सिंग यांच्या रेस्टॉरंटला कमर्शिअल वीज मिटर बसविण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निषन्न झाले.
तसेच दिपक मराठे याने इंद्रजित सिंग यांच्या रेस्टॉरंटमध्ये लाचेची रक्कम स्विकारण्याचे कबूल केल्यानंतर १० मे रोजी सायंकाळी एसीबीच्या पथकाने इंद्रजित सिंग यांच्या रेस्टॉरंटमध्ये सापळा लावला होता. यावेळी दिपक मराठे याने इंद्रजित सिंग यांच्याकडुन स्वतःसाठी १ हजार रुपये आणि त्याचे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक अभियंता सचिन फुलझेले यांच्यासाठी ४ हजार रुपये असे एकूण ५ हजार रुपये रेस्टारँटच्या किचनमध्ये स्विकारल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सहाय्यक अभियंता सचिन फुलझेले यांना देखील अटक केली. या दोघांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.