कल्याण मधील महाकाय होर्डींग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करा -आ. विश्वनाथ भोईर

कल्याण : घाटकोपर मधील होर्डिंग दुर्घटनेनंतर सर्वच ठिकाणच्या महाकाय होर्डिंगचा आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम मधील सर्व होर्डिंगचे महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट करतानाच भविष्यात कल्याण मध्ये अशी दुर्घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्याला आम्ही अजिबात माफ करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे.  

घाटकोपर येथील दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून ती नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित दुर्घटना आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता विभागाने ज्या ज्या ठिकाणी भलीमोठी होर्डिंग उभारले आहेत, त्या प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी. होर्डिंगची तपासणी करावी. तसेच महाकाय होर्डिंग अधिकृत आहेत की अनधिकृत याचाही तपास करुन महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग उभारणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत.

केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांचा महापालिकेतील इतर अधिकाऱ्यांवर वचक असणे आवश्यक आहे. कल्याण विभागात उभारण्यात आलेल्या भल्या मोठ्या होर्डिंगना कोणत्या आधारे आणि कोणत्या नियमानुसार परवानगी दिली? याचा तपास करणे आवश्यक आहे. तसेच महापालिका आयुक्त डॉ. जाखड यांनी इथल्या होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते अधिकृत आहेत की अनधिकृत ते तपासावे. यामध्ये कोणताही गलथानपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी असेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, कल्याण विभागात अशा प्रकारची घटना घडू नये याची काळजी घ्यावी आणि लोकांनीही त्यांना कुठे असा प्रकार आढळून आल्यास आपल्याला किंवा महापालिका प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 अश्विनी बिद्रे हत्याकांड खटला