निवडणूक कालावधीत २.०९ कोटींची रोकड जप्त  

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नियुक्त करण्यात आलेल्या फिरते निगराणी पथक आणि स्थिर देखरेख पथक यांनी दिड महिन्यामध्ये बेकायदेशीररित्या वाहनातून नेली जाणारी तब्बल २.९ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. त्याशिवाय नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाची तस्करी करणारे, बेकायदा मद्य बाळगणारे-विकणारे, तसेच बेकायदा शस्त्र बाळगणारे-विक्री करणाऱ्यांवर देखील धडक कारवाई केली आहे.  

मुंबई, ठाणे परिसरामध्ये ५ व्या टप्प्यासाठी येत्या २० मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या कालावधीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘निवडणूक आयोग'कडून लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या हद्दीत १२ फिरते निगराणी पथक (एफएसटी) तसेच १४ स्थिर देखरेख पथक (एसएसटी) नियुक्त करण्यात आले आहेत.  

या पथकाच्या माध्यमातून बेकायदा नेली जाणारी मोठी रोकड, अंमली पदार्थ, अवैध मद्यसाठा आणि मद्याची वाहतूक करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. या पथकाने १६ मार्च ते ७ मे २०२४ या कालावधीत स्थिर देखरेख पथकाने ६ कारवायांमध्ये तब्बल २.०९ कोटी रुपयांची रक्कम पकडली आहे. यात नुकतीच ऐरोली येथे रिक्षातून नेली जाणारी तब्बल १.६० कोटींच्या रक्कमेचा देखील समावेश आहे.  

अंमली पदार्थ विरोधी कारवाई...

नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि पोलीस ठाणे स्तरावर अंमली पदार्थाची तस्करी तसेच सेवन करणाऱ्यांविरुध्द देखील मोठी कारवाई केली असून आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांनी आतापर्यंत अंमली पदार्थ तस्करीच्या २८ कारवाया केल्या आहेत. यात १.८८ कोटी रुपये किंमतीचे २०७६ ग्रॅम वजनाचे कोकेन, ६१.६३ लाख रुपये किंमतीचे ५९८.४५ ग्रॅम एमडी तसेच ५५.६८ लाख रुपये किंमतीचे १८५६ ग्रॅम वजनाचे चरस, ९.५० लाख रुपये किंमतीचा ५६ किलो १८७ ग्रॅम वजनाचा गांजा, तर ९.८० लाख रुपये किंमतीचे १.२४ ग्रॅम एलएसडी असे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.  

बेकायदा शस्त्र जप्तीची कारवाई...

नवी मुंबई पोलिसांनी निवडणूक आचारसंहिता काळात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची देखील पोलिसांनी धरपकड केली असून आतापर्यंत पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुध्द ३६ गुन्हे दाखल करुन वेगवेगळ्या प्रकारचे ३७ शस्त्र जप्त केले आहेत. यामध्ये पिस्टल, गावठी कट्टा, रिव्हॉल्वर-९ तसेच २५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे तलवार, चॉपर, सुरा, चाकू या सारखी २८ हत्यारे जप्त केली आहेत.

बेकायदा मद्य विक्रेत्यांवर कारवाई...

निवडणुकीच्या काळात दारुची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री केली जाते. दारुच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाया सुरु आहेत. आतापर्यंत नवी मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन दारु विक्रेत्यांवर तसेच गावठी हातभट्टीची दारु गाळणाऱ्यांवर १९३ कारवाया केल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी छापेमारी करुन ४.८७ लाख रुपये किंमतीची ४२२०.३८ लिटर दारु जप्त केली आहे. त्याचप्रमाणे गुटखा आणि पानमसाला विक्री-वाहतूक करणाऱ्यांविरोधात ९ कारवाया करुन ३२.२६ लाख रुपये किंमतीचे १०,६०५ गुटख्याचे पाऊच जप्त केले आहेत. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 ‘महावितरण'चे २ कर्मचारी ‘एसीबी'च्या जाळ्यात