नवी मुंबई पोलिसांची अंमली पदार्थाच्या तस्कारांविरोधात धडक कारवाई    

११ ऑफ्रिकन नागरिक अटकेत    

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी दुपारी कोपरी गाव सेक्टर-२६ ए मधील एका इमारतीवर छापा मारुन अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने जमलेल्या ११ आफ्रिकन नागरिकांची धरपकड केली आहे.

तसेच त्यांच्याकडुन तब्बल १ कोटी ८३ लाख रुपये किंमतीचे कोकेन, मेथ्यॉक्युलॉन व एमडीएच्या गोळ्या हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाईत गुन्हे शाखेने तब्बल १६७९ ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले असून या कोकोनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 16 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईत गुन्हे शाखेने ८१ हजाराची रोख रक्कम व १७ मोबाईल फोन देखील जप्त केले आहेत.  

वाशीतील कोपरीगाव सेक्टर-२६ ए येथील कुष अपार्टमेंट मधील दुस-या व तिस-या मजल्यावर ७ रुममध्ये राहणारे आफ्रिकन नागरिक वेगवेगळ्या प्रकारच्या अंमली पदार्थाची देवाण घेवाण करुन त्याची विक्री करण्यासाठी एकत्र जमणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्ष, यनिट-1, आर्थिक गुन्हे शाखा, वाशी व एपीएमसी पोलीस ठाण्यातील १० सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, तसेच ४५ अंमलदारांचा फौजफाटा एकत्र केला.  

त्यानंतर दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने कोपरी गावातील कृष पाटील अपार्टमेंट या इमारतीतील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील ७ संशयीत घरावर एकाचवेळी छापा मारुन त्यात राहणा-या ११ आफ्रिकन नागरीकांची धरपकड केली. यावेळी सदर आफ्रिकन नागरिकांनी पोलिसांसोबत अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करुन त्यांना अटकाव करुन त्यांची झडती घेतली. या तपासणीत त्यांच्याजवळ १ कोटी ६९ लाख रुपये किंमतीचे १६७९ ग्रॅम वजनाचे कोकेन,  ९ लाख ७० हजार रुपये किंमतीचे ९७ ग्रॅम मेथ्यॉक्युलॉन व ६ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे ४६ ग्रॅम वजनाच्या एमडीएच्या गोळ्या असा एकुण १ कोटी ८३ लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ सापडले.

त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याजवळ सापडलेले सर्व अंमली पदार्थ जप्त करुन ११ आफ्रिकन नागरिकांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस नुसार गुन्हा दाखल करुन सर्वांना अटक केली आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आफ्रिकन नागरिकांमध्ये डोनटाऊस चिडोक्वे (४०), ओफोझोर बासिल (३६), एडविन ओबिराह उडैरके (३२), फ्रक नझेकवेसी (३१), विनसन ल्लाबडी उक्वैग्वे (४५), जेम्स कुपर (४१), ओकु ओ लेआउँन (३४), जार्ज ब्लासन (५०), चाल्स टेम ओझोरांन वापोका (३७), ए गुसन कौकौ अलेन (३२) व एनडीवे ओकेचुकवान डोनाटस (३९) या ११ जणांचा समावेश आहे.

गुन्हे शाखेने या कारवाईत तब्बल १६७९ ग्रॅम वजनाचे कोकोन जप्त केले आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत १६ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे बोलले जात आहे. या आफ्रिकन नागरिकांनी सदरचे अंमली पदार्थ कुठून आणले याबाबत पोलिसांकडुन अधिक तपास करण्यात येत आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

तुर्भे विभागात पोलिसांचे काेंबींग ऑपरेशन